कारगिल संघर्ष किंवा कारगिल कारवाई हा भारताच्या राजकीय, लष्करी इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. भारत आणि पाकिस्तान लष्करी संघर्षाच्या पातळीवर आमने-सामने येण्याची वेळ आतापर्यंत चार वेळा येऊन गेली आहे – १९४७-४८, १९६५, १९७१ आणि १९९९. यांतील पहिल्या आणि चौथ्या संघर्षांना किंवा कारवायांना थेट युद्ध असे सहसा संबोधले जात नाही. कारण भारताच्या दृष्टीने सार्वभौम असलेल्या भूभागातून घुसखोर पाकिस्तान्यांना हुसकावून लावणे असे त्या कारवायांचे स्वरूप होते. परंतु कारगिल घुसखोरी ही पाकिस्तानच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आणि व्यूहात्मक होती. भारताला घुसखोरी झाल्याचा अंदाज काही अवधीनंतर आला. यानंतर घुसखोरांना वेचून आणि हुसकावून लावण्यासाठी जवळपास युद्धसदृश मोहिमा आखाव्या लागल्या. या मोहिमेत भारतीय लष्कराबरोबर नंतर भारतीय हवाईदलही सहभागी झाले. अंतिमतः घुसखोरांना यशस्वीरीत्या हाकलून देऊन, अनेक शिखरांवरील भूभागांवर भारताने पुन्हा ताबा मिळवला आणि एक महत्त्वाचा विजय मिळवला. 

घुसखोरीची चाहूल…

बटालिक पर्वतरांगांमध्ये राहणारा ताशी नांग्याल नावाचा एक मेंढपाळ आपल्या हरवलेल्या याकच्या शोधात दुर्गम ठिकाणी पोहोचला, त्यावेळी तेथे बंकर खणत असलेले, पठाणी वेशातले काही जण त्याच्या दृष्टीस पडले. हे गावातले नाहीत ते त्याने तात्काळ ताडले. ते गावकरी नव्हते तर पठाणी वेशातील पाकिस्तानी सैनिक होते. ही घटना ३ मे रोजी घडली. त्याची खबर स्थानिकांमार्फत तेथे तैनात लष्करी यंत्रणेला मिळाली. त्या भागात घुसखोरांचा हुडकून काढून त्यांना बंदोबस्त करण्यासाठी अनके पथके विविध ठिकाणी पाठवण्यात आली. अनेक ठिकाणी पाकिस्तानकडून नियोजनबद्ध घुसखोरी सुरू असल्याचे हळूहळू लक्षात येऊ लागले. पठाणी वेशातील ते निव्वळ टोलीवाले वा घुसखोर नव्हते, तर पाकिस्तानी ठाणी प्रस्थापित करायला आलेले पाकिस्तानी सैनिक आणि निमलष्करी रेंजर्स होते.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा >>> न्यायाधीशांसमोर आरोपीला खरंच कायदेशीर वागणूक मिळते का? अभ्यास काय सांगतो?

सौरभ कालिया प्रकरण

चौथ्या जाट बटालियनचे नेतृत्व करत असलेले लेफ्टनंट सौरभ कालिया आणि इतर पाच जणांनी १५ मे रोजी काकसार भागातील बजरंग पोस्टजवळ गस्त सुरू केली. त्यावेळी प्रत्यक्ष ताबारेषेजवळ पाकिस्तानी रेंजर्सच्या एका तुकडीने त्यांना घेरले. लेफ्टनंट कालिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कडवा प्रतिकार केला, पण अखेरीस त्यांच्याकडील दारूगोळा संपली आणि पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना ताब्यात घेऊन पाकिस्तानच्या भागात नेले. तेथे त्यांचा अनन्वित छळ केला. या सहाही जाणांचे हालहाल केलेले, विद्रुप केलेले मृतदेह ९ जून रोजी भारतीय लष्कराच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेने देशभर संताप उसळला. जिनिव्हा युद्धबंदी कराराचा भंग केल्याचा आरोप करून भारताने पाकिस्तानकडे तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. 

कारवाईस सुरुवात…

सौरभ कालिया प्रकरणाने पेटून उठलेल्या भारतीय लष्कराने कारगिल, द्रास, बटालिक टापूतील अनेक ठाणी घुसखोरांच्या ताब्यातून सोडवण्यासाठी मोहिमा आखल्या. लडाख विभागातील मोक्याच्या शिखरे पाकिस्तानच्या ताब्यात गेली असती, तर श्रीनगर-लेह महामार्ग त्यांच्या माऱ्याच्या टप्प्यात आला असता. तसे करून जम्मू-काश्मीरपासून लडाखला तोडण्याची योजना होती. प्रामुख्याने लडाखमधील अनेक निर्मनुष्य डोंंगराळ भागांत झालेल्या या व्यूहात्मक घुसखोरीची चाहूल लागताच केंद्र सरकारशी सल्लामसलत करून काश्मीर आणि जम्मूतील काही तुकड्या लडाखमध्ये रवाना करण्यात आल्या.   

हेही वाचा >>> “मुस्लीम, हुकूमशहा शब्द वापरु नका!” प्रसार भारतीने कोणत्या नियमांअंतर्गत विरोधकांवर कारवाई केली?

कारगिलचे स्थान…

लडाख केंद्रशासित प्रदेशाची कारगिल ही संयुक्त राजधानी आणि लेहनंतरचे या भागातील सर्वांत मोठे शहर. १९४७-४८च्या संघर्षानंतर प्रत्यक्ष ताबारेषा ठरवताना लडाखची विभागणी झाली. यात कारगिल आणि लेह तालुके भारताच्या ताब्यात आले, तर स्कार्डू तालुका पाकिस्तानच्या ताब्यात गेला. स्कार्डूचेच पुढे पाकिस्तानने बाल्टिस्तान असे नामकरण केले. कारगिल संघर्ष म्हणून ओळखली गेलेली लढाई श्रीनगर-लेह महामार्गालगत असलेल्या १६० किलोमीटर लांब सीमावर्ती प्रदेशालगत डोंगराळ प्रदेशात झाली. यातील काही शिखरे इतकी उंच होती, की तेथे जाऊन पाकिस्तानी सैन्याला भिडण्यासाठी प्रथम अत्यंत खडतर चढाई करावी लागली.   

पाकिस्तानची चाल

सियाचिनमधील नामुष्कीनंतर विशेषतः तुलनेने शांत आणि निर्मनुष्य लडाख सीमेवर मोक्याची ठाणी बळकावायची योजना पाकिस्तान अनेक वर्षे आखत होता. १९९९मध्ये या योजनेला प्रत्यक्षात उतरवण्याचे दुःसाहस पाकिस्तानने केले. याअंतर्गत पाकिस्तानी लष्कराच्या स्पेशल सर्विसेस ग्रुपमधील तसेच नॉर्दर्न लाइट इन्फन्ट्रीच्या काही तुकड्यांनी भारतीय सीमेअंतर्गत १३२ ठिकाणी चौक्या उभारल्या. द्रासमधील मश्को व्हॅली, कारगिलजवळ काकसार आणि बटालिक व तुर्तुक सेक्टरमध्ये ही घुसखोरी झाली. हा संपूर्ण भाग साधारण ५० ते ८० चौरस मैल इतका होता.

ऑपरेशन विजय

भारतीय लष्कर या घुसखोरांचा अंदाज घेण्यात सुरुवातीस गाफील राहिले, असे सर्वसाधारण मानले जाते. पण घुसखोरीची व्याप्ती लक्षात येताच आणि सौरभ कालिया प्रकरणानंतर भारत सरकारने ‘ऑपरेशन विजय’ जाहीर केले. दरम्यानच्या काळात पाकिस्तानी तोफांमधून कारगिलमध्ये माराही सुरू झाला होता. पाकिस्तानचे साधारण ५ हजार घुसखोर असतील असे मानले गेले. भारताने जवळपास २ लाख सैनिकांना तैनात करण्याचा निर्णय घेतला, परंतु खडतर भूभागामुळे प्रत्यक्षात ३० हजार सैनिकच कारवाईत सहभागी होऊ शकले. उंच पर्वतीय भूभाग असल्यामुळे हवाईदलाची मदतही घेण्यात आली. हवाईदलाच्या कारवाईस ‘ऑपरेशन सफेद सागर’ असे नाव दिले गेले. श्रीनगर-लेह मार्ग जेथून नजरेच्या आणि माऱ्याच्या टप्प्यात येतो, अशा तोलोलिंग आणि टायगर हिल शिखरांना पुन्हा जिंकून घेण्यास प्राधान्य देण्यात आले. कारण लष्करी मनुष्यबळ, सामग्री आणि रसद पुरवण्याच्या या मार्गावर पाकिस्तानने सातत्याने मारा केला असता, तर संपूर्ण कारवाईच थंडावली असती. जेथे घुसखोर थेट नजरेत येत होते, तेथे बोफोर्स तोफा आणि हवाईदलाचा वापर करण्यात आला, ज्याचा खूप फायदा झाला. पण अशी अनेक ठिकाणे होती, जेथे हवाईदलाची लढाऊ विमाने उडू शकत नव्हती किंवा तोफगोळे पोहोचू शकत नव्हते. अशा ठिकाणी थेट जाऊन कब्जा करणे भाग होते. शिवाय श्रीनगर-लेह महामार्गावर मारा करू शकतील अशी मोक्याची शिखरे मिळवणे हा ‘ऑपरेशन विजय’ मोहिमेचा एक भाग होता. पण दुसरा महत्त्वाचा भाग पाकिस्तान्यांना प्रत्यक्ष ताबारेषेबाहेर हुसकावून लावणे हा होता. अखेर १४ जुलै १९९९ रोजी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘ऑपरेशन विजय’ यशस्वी झाल्याचे जाहीर केले. २६ जुलै १९९९ रोजी सर्व घुसखोर माघारी फिरल्याचे भारतीय लष्कराने जाहीर केले. 

मनुष्यहानी…

टायगर हिल आणि पॉइंट ४५९० या लढायांमध्ये अनेक भारतीय अधिकारी आणि जवान शहीद झाले. हवाई दलाचे स्क्वाड्रन लीडर अजय आहुजा यांचे विमान पाकिस्तानी घुसखोरांनी पाडले आणि विमानातून पॅराशूटच्या साह्याने बाहेर आलेल्या आहुजांना संपवले. पाकिस्तानी लहान क्षेपणास्त्राच्या माऱ्यात एक एमआय-८ हेलिकॉप्टरही पडले. ज्यातील सर्व चार भारतीय जवान शहीद झाले. भारताच्या अधिकृत आकडेवारीनुसार, कारगिल कारवाईदरम्यान ५२७ जवान व अधिकारी शहीद झाले आणि १३६३ जखमी झाले. पाकिस्तानकडील मनुष्यहानीबाबत वेगवेगळे दावे केले जातात, पण अमेरिकी आणि खुद्द पाकिस्तानी अहवालांनुसार ती भारतीयांपेक्षा कितीतरी अधिक होती यावर एकमत आहे. भारतीय आकडेवारीनुसार १०४२ पाकिस्तानी सैनिक ठार झाले. पाकिस्तानातील विद्यमान सत्तारूढ पाकिस्तान मुस्लिग लीग (नवाझ) पक्षाच्या श्वेतपत्रिकेनुसार पाकिस्तानची मनुष्यहानी ३००० पेक्षा अधिक होती.