न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यानंतर नजीकच्याच मॅनहटन बेटावर सुमारे पाच लाख नागरिक अडकून पडले. त्यांच्या सुटकेसाठी न्यूयॉर्क बंदरातील नाविकांनी स्वयंस्फूर्तीने केलेल्या बचावकार्याची साद्यंत माहिती सांगणारं हे पुस्तक..

२००१ साली ९/११ ला न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेला आत्मघातकी हल्ला अगदी सर्वपरिचित आहे. त्या वेळेस र्मचट मरीनर्सनी स्वयंस्फूर्तीने केलेलं काम मात्र फारच थोडय़ा लोकांना माहीत असेल. त्या एक-दोन दिवसांत न्यू यॉर्क बंदरातल्या फेरीबोटी, टगबोटी, डिनर क्रुझशिप्स, मालाची बार्जेस या सर्वावरील खलाशी, नाविकांनी मिळून मॅनहॅटन बेटावर अडकलेल्या सुमारे पाच लाख लोकांना सुखरूपरीत्या पलीकडच्या, मुख्यत्वे न्यू जर्सी किनाऱ्यावर आणून सोडलं. प्रस्तुत पुस्तक म्हणजे लेखकद्वय जेम्स केंड्रा आणि ट्रिसिया वॉच्टेनडॉर्फ यांनी शंभराहून अधिक खलाशी, बोटींचे कॅप्टन, मालक, बंदराचे पायलट आणि कोस्टगार्ड अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेऊन गोळा केलेली त्या दिवशीची चक्षुर्वैसत्यम हकीगत. साऊथ स्ट्रीट सीपोर्ट संग्रहालयात ९/११ नंतर दोन महिन्यांतच खूप तोंडी माहिती गोळा करून जतन केली आहे, त्याचाही उपयोग लेखकांनी केला आहे.

जेम्स केंड्रा हे व्यापारी बोटीवरचे पूर्वीचे ऑफिसर. ट्रिसिया वॉच्टेनडॉर्फबरोबर ते ‘डिझ्ॉस्टर रीसर्च सेंटर’चे संचालक आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीस १९४० मध्ये फ्रान्सच्या किनाऱ्यावरील डंकर्क बंदरातून लाखो ब्रिटिश सैनिकांना लहान-मोठय़ा मिळतील त्या बोटींतून यशस्वीरीत्या इंग्लंडच्या किनाऱ्यावर आणून सोडलं गेलं, त्याचाच संदर्भ जोडून पुस्तकाला ‘अमेरिकन डंकर्क’ असं नाव दिलं आहे.

मॅनहॅटन बेटाच्या दक्षिण टोकाला असलेल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन्ही इमारती पडल्यावर भयभीत होऊन पळणारे लोक- बहुतेक ‘मेन लँड’वरून दिवसभराच्या कामासाठी सकाळीच आलेले स्त्री-पुरुष होते. नदीपलीकडील मेन लँडला जोडणारी वाहतूक बंद झाली किंवा केली होती. त्यामुळे त्यांना परत कसे-कुठे जावे हे कळत नव्हते. ते अडकले होते. लेखक म्हणतात, ‘नाविकांचे डोळे सारखे भिरभिरत असतात. क्षितिज, आकाश, किनारा, इतर बोटी आणि त्यांच्या हालचाली यांकडे त्यांचे कायम लक्ष असते. त्या निरीक्षणात त्यांना अशी परिस्थिती आढळली, की जिथे त्यांची मदत होऊ  शकेल.’ त्यासाठी लागणारं कौशल्य, ज्ञान, साधनं त्यांच्याकडे होती. मुलाखतीत बहुतेक नाविकांनी सांगितलं, की त्या घटकेला जे करणं जरूर होतं ते त्यांनी आपणहून केलं. त्यांनी आपापल्या बोटी लगोलग दक्षिण मॅनहॅटनच्या किनाऱ्यावर नेल्या. तिथे उभे असलेल्या लोकांना बोटीत घेऊन हडसन नदीपलीकडील न्यू जर्सीच्या किनाऱ्यावर नेऊन सोडणं सुरू केलं. सागरी  तटरक्षकांच्या सूचना मिळण्याच्या आधीच न्यूयॉर्कच्या नाविकांनी हे  कार्य कोणत्याही आदेशाची वाट न पाहता सुरू केलं. त्यासाठी त्यांनी ना पैसे मागितले ना काही अपेक्षा केली.

सुरुवातीस बोटी कमी आणि माणसांची झुंबड. तेव्हा क्षमतेपेक्षा जास्त लोकांना जाणूनबुजून बोटीत घेतलं गेलं, पण सुरक्षा धोक्यात येणार नाही याची खबरदारीही घेतली गेली. किनाऱ्याला कठडे होते. लोक शक्य तितक्या लवकर पलीकडे जायला उतावीळ झाले होते. कठडय़ांमुळे बोटींत उतरायला अडचण आणि वेळ लागत होता. ते असुरक्षितही होतं. पुढच्या खेपेस नाविकांनी वेल्डिंग-कटिंग साधनं आणून खुशाल आड येणारे कठडे कापून टाकले. त्यासाठी कोणाची परवानगी मागण्याची तसदी घेत बसले नाहीत. जवळच्या नॉर्थ कव्हमध्ये लाखो डॉलर किमतीच्या यॉटस् बांधलेल्या होत्या. बंदराचे पायलट आणि तटरक्षकांनी मिळून त्यांना आणखी उत्तरेच्या एका धक्क्याला ओढत नेलं. त्यामुळे लोकांना बोटीत चढा-उतारायला नॉर्थ कव्हमध्ये सोईस्कर जागा झाली. अतिशय मौल्यवान यॉटस मालकाच्या परवानगीविना ओढत दुसरीकडे नेणं हा गुन्हा होऊ  शकतो; परंतु त्या वेळची निकड ओळखून सर्वानी तिकडे दुर्लक्ष केलं. कायदेभंग झाला होता, पण कायदा करण्यातला मूळ हेतू अबाधित राहिला होता.

‘जॉन जे. हार्वे’ ही १९३१ साली अमेरिकेत बांधलेली पहिली ‘फायरबोट’. फायरबोट म्हणजे बंदरात किंवा बोटींना लागलेली आग विझवण्यासाठी वापरण्याचा तरंगता बंब. तिला १९९४ मध्येच निवृत्त करण्यात आले होते. काही उत्साही नाविकांनी एक ऐतिहासिक वस्तू म्हणून तिला १९९९ मध्ये लिलावात विकत घेऊन स्वखर्चाने दुरुस्ती करून, अगदी जीव ओतून पुन्हा पहिल्यासारखी चालू केली होती. नवीन मालकांनी त्या दिवशी तिचा उपयोग वर्ल्ड ट्रेड सेंटरपासून लोकांना दुसरीकडे नेण्यासाठी सुरू केला. जेव्हा आग विझवण्यासाठी वापरायच्या जमिनीवरच्या मुख्य पाइपलाइन मोडतोड झाल्यामुळे बंद पडल्या तेव्हा आग नियंत्रक विभागानेच तिच्या पंपांचा उपयोग आगीवर ओतायच्या पाण्यासाठी करून घेतला. पुस्तकातलं त्याचं वर्णन वाचकाला खिळवून ठेवतं.

मॅनहॅटन बेटावरून आपत्काळी जलमार्गाने हजारो लोकांची सुटका करण्यासाठी कुठलीही योजना नव्हती. आदल्या वर्षी शिडाची जहाजे, यॉटस् आणि युद्धनौका यांचं ‘डस्र्रं्र’’ हे भव्य संचलन-प्रदर्शन न्यूयॉर्क बंदरात झालं होतं. त्यासाठी तयार केलेली आपत्कालीन योजना होती; पण ती मुख्यत्वे वैद्यकीय आणि इतर व्यवस्थेसाठी होती. त्यामुळे तिचा फारसा उपयोग नव्हता. कुठलीही बोट न्यूयॉर्क बंदरात येतेवेळी तिला एका स्थानिक पायलट- म्हणजे मार्गदर्शकाची मदत घ्यावीच लागते. सागरी तटरक्षकांनी मग बंदराच्या पायलट वरिष्ठांशी संपर्क करून त्यांची ‘न्यूयॉर्क’ ही पायलटबोटच मॅनहॅटनच्या किनाऱ्याजवळ आणवली. पायलटबोटीवर अनेक रडार आणि बिनतारी संपर्क करण्यास रेडिओ असतात. त्यांचा ‘ब्रिज’ (म्हणजे जिथून नौकानयन करतात ते सर्वात उंच डेक) ३६० अंश चौफेर दृष्टी टाकता येईल असा होता. ‘त्या दिवसाच्या आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यास त्याहून अधिक योग्य साधन दुसरं नव्हतं.

चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत बोटींवर  झेंडे लावून सूचना देत असत. ९/११ ला रेडिओ संपर्क बेभरवशाचा झाला होता. त्या दिवशी जुने झेंडे काढून पुन्हा डोलकाठय़ांवर वापरले गेले. संकटसमयी सामान्य माणूस गणवेशधारी अधिकाऱ्यांची आज्ञा पाळतो, असा अनुभव आहे. सागरी तटरक्षकांनी त्यांची बिल्ला लावलेली टोपी आणि त्यांच्या शिक्क्यांचं जॅकेट एका पायलटला घालायला दिलं. त्याने वाहतुकीचं नियंत्रण केलं. तटरक्षकाचा गणवेश वापरणं किंवा खोटी बतावणी करणं हा एक दखलपात्र गुन्हा आहे; लेखक म्हणतात, त्या दिवशी सतर्कतेने कायदा मोडला होता.

समुद्रावर आपत्काली खलाशी एकमेकांच्या आणि दुसऱ्या जहाजांच्या मदतीसाठी तत्पर असतात. त्या दिवशी ही परंपरा काटेकोरपणे पाळण्यात आली. नाविकांनी इतर नाविकांबरोबरच किनाऱ्यावरच्या लोकांनाही मदत करून ती आणखी विस्तीर्ण केली. कविवर्य बोरकरांच्या शब्दांत सांगायचे तर, ‘आपत्काली अन् दीनांवर’ हे नाविक ‘घन होऊन वळले’ होते.

लेखकद्वयांनी अगदी खोलात जाऊन संकटसमयी समाज कसा वागतो याचा अभ्यास आणि विश्लेषण केलं आहे. दहा र्वष त्यांचं संशोधन चाललं. त्यांनी अभ्यासलेल्या ग्रंथांची सूची आठ पृष्ठं भरून आहे. नौवहन व्यवसायातील नाविक आणि इतरांचं देशाला आणि समाजाला खूप काही योगदान असतं; त्याची एक वेगळी, अपरिचित बाजू या पुस्तकामुळे उजेडात येते.

 

  • अमेरिकन डंकर्क- द वॉटरबोर्न इव्हॅक्युएशन ऑफ मॅनहॅटन ऑन ९/११
  • लेखक : जेम्स केंड्रा, ट्रिसिया वॉच्टेनडॉर्फ
  • प्रकाशक : टेम्पल युनिव्हर्सिटी
  • पृष्ठे : १८२, किं.: १५०० रु

 

मिलिंद रा. परांजपे

captparanjpe@gmail.com