आदूबाळ

हवामान बदल हा विषय आधुनिक कादंबरीत हाताळला गेलेला नाही- तो का, याची चर्चा करणारं दीर्घनिबंधवजा पुस्तक – ‘द ग्रेट डिरेंजमेंट’ – ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित कादंबरीकार अमिताव घोष यांनी २०१६ साली लिहिलंच; पण हवामानबदल आणि त्याचे मानवावर होणारे परिणाम यांचं कथन करणारी ‘गन आयलंड’ ही त्यांची कादंबरीही नुकतीच प्रसिद्ध झाली. घोष यांच्या या दोन्ही पुस्तकांचा सांधा कसा जुळतो, याचा हा चिकित्सक वेध..

lucky number by date of birth
पैसा, पद, प्रतिष्ठा तुम्हाला कधी मिळणार? भाग्यांकावरून पाहा तुमचे लकी वर्ष
May 2024 These Five Zodiac Signs Will Earn Money
लक्ष्मी येती घरा! १ मे पासून पाच राशींना प्रचंड धनलाभ, ‘ही’ असतील फायद्याची रूपं; तुमची रास आहे का नशीबवान?
savita prabhune on caste Discrimination in industry
“तुम्ही विशिष्ट आडनावाचे…”, भेदभावाबद्दल सविता प्रभुणे यांचं स्पष्ट मत; म्हणाल्या, “मला उलट या इंडस्ट्रीचा…”
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..

ज्ञानेश्वरीतल्या एका ओवीत (१३.१०६) येणाऱ्या या शब्दांचा आणि अमिताव घोषच्या ताज्या कादंबरीचा संबंध काय, असा प्रश्न पडणं साहजिक आहे. शुक्र म्हणजे पुरुषाचा शुक्रांश आणि शोणित म्हणजे स्त्रीबीज. यांचा सांधा जुळला तरच जन्म होतो, प्राण फुंकले जातात. असाच सांधा कादंबरीत जमावा लागतो. कादंबरीच्या संदर्भातलं शोणित म्हणजे कादंबरीलेखनाची कुसर (क्राफ्ट). त्यात येतं कथानक, पात्रनिर्मिती, कादंबरीचा वेग, वगैरे तांत्रिक गोष्टी. पण फक्त कुसरीतल्या तांत्रिक सफाईमुळे एखादी कादंबरी श्रेष्ठ होत नाही. त्याला विचारव्यूहाचा, संकल्पनेचा शुक्रांश लागतो. अमितावची नवी कादंबरी ‘गन आयलंड’ ही शुक्र आणि शोणित या दोन्ही अर्थानी उल्लेखनीय आहे. ती कशा प्रकारे, याचा शोध घेण्यासाठी अगोदर अमितावच्या लेखनाबद्दल काही लिहायला हवं.

नुकताच अमितावला ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला. ज्ञानपीठाच्या इतिहासात हा महत्त्वाचा टप्पा आहे; इंग्रजीत लिहिणाऱ्या लेखकाला प्रथमच हा पुरस्कार देण्यात आला. भारतीय उपखंडात मुळं असणारं इंग्रजी साहित्य (इंडियन रायटिंग इन इंग्लिश) यायला सुरुवात होऊनही दीड शतकाहून अधिक काळ लोटला. इंग्रजी साहित्यविश्वात त्याचं कमीअधिक प्रमाणात कौतुकही झालं आहे. पण ज्ञानपीठसारख्या पुरस्कारानं मात्र आजपर्यंत त्याची दखल घेतली नव्हती. ही दखल घ्यायची सुरुवातही अमितावपासून व्हावी हा योगायोग नाही. अमितावची साहित्यसृष्टी भारतीय उपखंडात घट्ट मुळं असलेली आहे.

बंगाल आणि आजूबाजूच्या प्रांतांतून उगम पावणारी अमितावची कथानकं तिथंच घोटाळत नाहीत. आपल्या पात्रांबरोबर वैश्विक होतात. आपल्या प्रदेशातल्या लोककथा, धारणा, श्रद्धा घेऊन अमितावची ही पात्रं जगतात, प्रसंगी या दंतकथांचे नवे अर्थ लावतात. मानवी अनुभवांची कक्षा ताणणाऱ्या अद्भुताची चव अमितावच्या कथानकांना असते. असं असलं, तरी अमितावच्या साहित्यसृष्टीचं अधिष्ठान समाजशास्त्रीय अभ्यास (विशेषत: इतिहास आणि मानववंशशास्त्र) आहे हे जाणवत राहतं.

२०१६ हे अमितावसाठी कळीचं वर्ष म्हणावं लागेल. ‘द ग्रेट डिरेंजमेंट’ (यापुढे ‘डिरेंजमेंट’) हे वैचारिक, अललित पुस्तक हा त्याच्या लेखनप्रवासातला महत्त्वाचा टप्पा त्या वर्षी आला. तोच ‘गन आयलंड’ या नव्या कादंबरीतला शुक्रांश आहे आणि त्यामुळे ‘गन आयलंड’कडे जाण्याआधी ‘डिरेंजमेंट’च्या स्टेशनवर थांबणं क्रमप्राप्त आहे.

शुक्र : हवामान बदल आणि कादंबरी

‘डिरेंजमेंट’चं सार एका ओळीत सांगायचं तर : ‘हवामान बदल हा विषय (आधुनिक) कादंबरीत हाताळला गेला नाही (लिटररी फिक्शन इग्नोर्स क्लायमेट चेंज).’ अमिताव महाभारत, इलियडसारख्या प्राचीन कलाकृतींकडे लक्ष वेधतो; त्यांत मानवी घटकांबरोबर मानवेतर (पण नैसर्गिक) घटकही कथानकात मोलाचे असतात. उदा. महाभारताची सुरुवात करून देणारं सर्पसत्र, रामायणातला जटायू. या मानवेतर घटकांना मानवी आवाज (ह्य़ुमन एजन्सी) दिलेला असतो. या प्राचीन कलाकृती साकल्यभाषी आहेत. समष्टीच्या त्यांच्या व्याख्येत फक्त माणूसच नाही; तर झाडं, प्राणी, जागा, हवामान हे निसर्गाचे अन्य घटकही आहेत.

पण आधुनिक कादंबरी ही उत्तरोत्तर मानवकेंद्रित (अँथ्रोपोसेंट्रिक) होत गेली. अर्थात, हा दोष लेखकांच्या माथी मारून चालणार नाही, तर गेल्या तीन-चारशे वर्षांत जगच उत्तरोत्तर मानवकेंद्री होत गेलं आहे. मानवी हस्तक्षेपाने होणारे हवामान बदल ही आजची घटना नव्हे; अमिताव सतराव्या शतकात अचानक कमी झालेल्या तापमानाचं (लिटिल आइस एज) उदाहरण देतो. पण मानवाची विचारसरणी ‘आपलं सुख महत्त्वाचं, निसर्ग जाऊ दे खड्डय़ात’ अशी होत गेल्यानं, त्याचं प्रतिबिंब कादंबरीत न पडतं तरच नवल! किंबहुना मानवाची ही स्वकेंद्रित (नार्सिसिस्टिक) वृत्ती दाखवण्यासाठी आधुनिक कादंबरी हे उत्तम साधन आहे!

अमिताव पुढे म्हणतो, आता तो मानवनिर्मित हवामान बदल इतक्या वेगानं होत आहे, की समकालीन कादंबरीला आता त्याची दखल घेण्यावाचून पर्याय नाही. ही ‘नवी कादंबरी’ हवामान बदलाबद्दल जास्त सजग होईल, हे भाष्य अमितावनं ‘डिरेंजमेंट’मध्ये केलं आहे.

मात्र, अमितावसारख्या सिद्धहस्त ललित/ कथात्म लेखकानं हा विषय अललित पद्धतीनं का मांडावा, याबद्दल आक्षेपवजा आश्चर्य उमटलं होतं. ‘गन आयलंड’ हे त्या आक्षेपावरचं उत्तर आहे – ‘डिरेंजमेंट’मधल्या विचारव्यूहाशी नातं सांगणारी कादंबरी!

शोणित : बंदुकी सौदागराची कथा

दीर्घकाळ लिहिणाऱ्या लेखकाचे मुख्य ठोकळे ओळखू येतात. अमितावही त्याला अपवाद नाही. आयबिस त्रिधारा, ‘कलकत्ता क्रोमोसोम’ आणि ‘द हंग्री टाइड’ या पाच कादंबऱ्या प्रातिनिधिक म्हणून धरल्या, तर ठोकळे जाणवतात ते असे : बंगालात मुळं असलेली पात्रं, बंगालच्या भोवतालात घडणारं कथानक, कथानकात नैसर्गिक घटनांचा सहभाग, लोककथांद्वारे आलेला अद्भुताचा स्पर्श आणि सशक्त स्त्रीपात्रं. ‘गन आयलंड’ या कादंबरीत हे सगळं हजर आहे.

दिन दत्ता हा अनिवासी भारतीय पुस्तकविक्रेता कोलकात्यात सुट्टीवर आला असताना एका वृद्ध नातेवाईकाला भेटतो आणि तिच्यामार्फत ‘मानसादेवी आणि बंदुकी सौदागर’ या लोककथेच्या जाळ्यात गुरफटतो. मानसादेवीचा शोध काढत तो सुंदरबनात जातो आणि तिथे त्याला एक अतिमानवी अनुभव येतो. त्या लोककथेचा, त्यातल्या पात्रांचा धागा वर्तमानाशी जुळतो आणि तो धागा सोडवत सोडवत, अधिकाधिक अतिमानवी अनुभव घेत दिन दत्ता व्हेनिसपर्यंत पोहोचतो.

हे या कादंबरीचं ‘शोणित’. या कथनाच्या केंद्रभागी असलेला ‘शुक्र’ आहे सुंदरबनात, अमेरिकेत आणि युरोपात होणारा हवामानबदल; आणि त्याचे मानवावर होणारे परिणाम – प्रामुख्याने स्थानभ्रष्टता आणि स्थलांतर (डिसप्लेसमेंट अ‍ॅण्ड मायग्रेशन).

अमितावनं सामाजिक मानववंशशास्त्रात ऑक्सफर्डमधून पीएच.डी. केली आहे; त्यामुळे मूळ पिंड संशोधकाचा आहे. या कादंबरीतही संशोधनाची बाजू भक्कम आहे. बंदुकी सौदागराच्या कथेचा उलगडा भाषाशास्त्र आणि इतिहासाच्या अनुषंगानं केला आहे. युरोपला सध्या ग्रासून असणाऱ्या निर्वासितांच्या समस्येचा अभ्यासही चखोट आहे. व्हेनिसमधल्या बांगलादेशी निर्वासितांबद्दल तो अत्यंत सहृदयतेनं लिहितो. अमितावच्या लेखनात पोटाची खळगी भरायला एखाद्या प्रगत देशात घुसणं हा गुन्हा नाही, तर हवामान बदलाचा अपरिहार्य परिणाम आहे.

परंतु लोककथांचं आणि सद्य: काळातल्या महत्त्वाच्या घटनेवरचं संशोधन, हवामान बदलाचा विचारव्यूह कादंबरीच्या माध्यमातून मांडताना अमितावसारख्या लेखकाचीही दमछाक झाली आहे. शुक्र-शोणितांचा सांधा नीट बसलेला नाही. कथानक एकंदर ओढूनताणून आणल्यासारखं वाटतं. दिनला आलेले अतिमानवी अनुभव आणि त्यातून पडणारे प्रश्न यांची उत्तरं मानसादेवी-बंदुकी सौदागराच्या कथेच्या समकालीन आकलनात आहेत हे वाचकाला लागलीच जाणवतं; पण ती उत्तरं नेमकी काय आहेत, हे ‘सिंटा’ नामक एका हुश्शार पात्राद्वारे सोयीस्करपणे कळतं. (हा ‘ट्रोप’ ठार डॅन ब्राऊनी आहे आणि त्यातून लंडनच्या ‘द संडे टाइम्स’नं ‘द बेंगाली दा व्हिन्सी कोड’ या मथळ्याखाली परीक्षण छापून कात्रज केला आहे!)

‘गन आयलंड’च्या कथानकाचा विचार केला, तर त्यात अतक्र्य योगायोग, अविश्वसनीय घटना आणि पात्रांच्या अमनधपक्या घडलेल्या भेटी जाणवतात. हा आक्षेप नाही, कारण हे तंत्र कथानकाच्या रचनेचा भाग आहे. अमितावला अपेक्षित असलेली- म्हणजे मानवेतर घटकांना मानवी आवाज देणारी- कादंबरी या अतक्र्य/ अविश्वसनीय/ अमनधपक्या घटकांना स्वत:चा असा कार्यकारणभाव देते. एका मुलाखतीत अमितावनं सांगितल्याप्रमाणे, सद्य:कालात आपण पाहतो आहोत ते गुंतागुंतीचं वास्तव दाखवायला कादंबरीची रूढ तंत्रं अक्षम असली, तर त्या तंत्रांपलीकडे पाहिलं पाहिजे.

‘गन आयलंड’मधली स्त्री पात्रं मात्र कचकडय़ाची वाटतात. ‘सिंटा’विषयी आधी आलंच आहे, पण ‘हंग्री टाइड’मधून उसनी घेतलेली ‘पिया’देखील छाप पाडून जात नाही. ‘हंग्री टाइड’च्या कथानकाला दिशा देणारी पिया इथं दिन दत्ताच्या प्रवासातली एक सोयीस्कर साथीदार आहे. किंबहुना या दोन्ही स्त्रीपात्रांचा कथानकातला उपयोग ‘दिन दत्ताला मदत करणं’ असा आहे. आयबिस त्रिधारेत जगाला फाटय़ावर मारून आपली (आणि पर्यायानं कादंबरीत्रयीची) दिशा ठरवणाऱ्या दीती आणि पॉलीन आठवून एक सुस्कारा मात्र सोडला!

नाही सर्वश्रेष्ठ तरी..

‘गन आयलंड’ ही अमितावची सर्वश्रेष्ठ कादंबरी नाही. अमिताव घोष वाचायला सुरुवात करताना रंजनाच्या भूमिकेतूनच पाहायचं तर, ‘कलकत्ता क्रोमोसोम’ला पर्याय नाही आणि त्यामागोमाग आयबिस त्रिधारेला. पण अमितावच्या लेखनाचा मागोवा ठेवणाऱ्या वाचकांनी मात्र चुकवू नये अशी कादंबरी आहे.

कोणतंही पुस्तक वाचताना वाचकाची मनोभूमिका रसास्वादात महत्त्वाची असते. एका वाचकाला श्रेष्ठ वाटलेली कादंबरी दुसऱ्याला टाकाऊ   वाटू शकते; कारण त्या वाचकाची कादंबरीकडे बघण्याची दृष्टी वेगळी असू शकते. ‘गन आयलंड’च्या बाबतीत हे फार जाणवतं. ‘टाइम्स’च्या परीक्षणाबद्दल आधी लिहिलंच आहे; पण ‘द गार्डियन’चा अपवाद वगळता, जवळजवळ सगळ्याच पाश्चात्त्य वृत्तपत्रांनी या कादंबरीच्या शुक्राचं कौतुक आणि शोणितावर टीका केली आहे. याउलट ‘द वायर इंडिया’ आणि ‘ढाका ट्रिब्यून’ यांनी मात्र कादंबरीबाबत अनुकूल मतं नोंदवली आहेत. जवळजवळ सगळ्याच समीक्षकांना हवामान बदल कादंबरीत आणण्याच्या ‘शुक्रा’बद्दल कौतुक आहे; पण कादंबरी घडवण्याचं ‘शोणित’ पुरेसं साधलं नाही हेही ठामपणे वाटतं.

हे तसं निर्विवाद आहे; प्रश्न येतो तो मनोभूमिकेचा आणि त्यातून कलाकृतीचा आस्वाद घेण्याच्या दृष्टीचा. ‘गन आयलंड’च्या कथनातल्या दोषांना कितपत मनावर घ्यावं, याबद्दल मात्र शंका आहे. हवामान बदल हा विषय चर्चापटलावर नुकतानुकता आला आहे; आणि त्यावरची कथनं ‘असं काहीच नसतंच मुळी’ (इति डोनाल्ड ट्रम्प) ते ‘आता सगळं संपलंय’ (इति ग्रेटा थनबर्ग) अशी टोकाची आणि कंठाळी आहेत. समोर आलेल्या या आव्हानाला आपण मानव अजून समजून घेतो आहोत. अशा वेळी याचं कथन करणं जमलं नाही म्हणून लेखकाला तरी किती दोष द्यायचा? ‘शुक्रशोणितांचा सांधा’ निखळला, तर निखळू दे!

‘गन आयलंड’

लेखक : अमिताव घोष

प्रकाशक : पेंग्विन / हॅमिश हॅमिल्टन

पृष्ठे: २८८, किंमत : ६९९ रुपये

लेखक आर्थिक इतिहास आणि कथात्म वाङ्मयाचे अभ्यासक असून ‘आदूबाळ’ याच नावाने कथालेखनही करतात. त्यांचा ईमेल : aadubaal@gmail.com