लेखक ‘ललित साहित्य लिहितो’ म्हणजे नक्की काय करतो, तर एक प्रकारे आपल्या आत्मानुभवांनाच कल्पनेच्या मुशीत फिरवून शब्दाविष्कार करतो. आंतोन चेकॉव्हला ‘तुम्ही आत्मचरित्र का लिहिले नाही?’ असे कुणी तरी विचारल्यावर ‘मग आत्तापर्यंत लिहिले ते काय,’ असा उलट प्रश्न त्याने केल्याची आख्यायिका प्रसिद्धच आहे. तर पूर्णपणे विस्मृतिकोशात असतानाही अर्नेस्ट हेमिंग्वे अस्खलित पॅरिसानुभव ‘ए मूव्हेबल फीस्ट’मध्ये चितारतो. किरण नगरकरांना ‘खोटे बोलण्यात निष्णात झाल्यावरच लिहायला जमू लागले,’ असे वाटते. दादा लेखकांचे साहित्य आणि त्यांचे आत्मचरित्र हे नेहमीच कुतूहलाचे विषय बनतात. लेखक समजून घेण्यासाठी त्याचे साहित्य कोळून प्यायल्याचे दावे करणाऱ्यांना त्याचे आत्मचरित्र वा चरित्र महत्त्वाचा दस्ताऐवज वाटत असतो. जरी कथात्मतेवर भर देणारा कोणताही साहित्यप्रकार बहुतांशी ‘अनरिलायबल नॅरेटर’च समोर आणत असला, तरी अनुयायांसाठी त्याचे मोल खूप असते.
आत्मपरसंदर्भात विरघळलेल्या लेखनाचा एक रसरशीत नमुना म्हणजे ‘रस्टी’ हे स्वत:च्या बालरूपाशी नाते सांगणारे पात्रच निर्माण करणारे रस्किन बॉण्ड हे पहाडी लेखक (वर्ण-वंशाने ते भले अँग्लो-इंडियन असोत, कसौलीला जन्मलेले आणि हिमालयाच्या कुशीत लेखक झालेले रस्किन बॉण्ड पहाडीच)! त्यांच्या आगामी तीन आत्मचरित्रांची बातमी त्यांच्या भारतीय तसेच जगभरातील वाचकांसाठी मोठाच चर्चाविषय बनली आहे. परवाच एका मुलाखतीत त्यांनी ‘लेखन’, ‘खासगी आयुष्य ’ आणि ‘प्रेम’ अशा तीन भागांमध्ये आत्मचरित्र लिहिणार असल्याची घोषणा केली. संपूर्ण आयुष्यभर हिमालयाच्या कुशीतील जगण्याला आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवून देण्याची किमया बॉण्ड यांनी केली. त्यांच्या ओ हेन्रीचे कथानियम जणू मूर्तिमंत तंतोतंत पाळणाऱ्या गोळीबंद भावुक कथा असोत किंवा चित्रपट, मालिकांमध्ये परावर्तित झालेल्या कादंबऱ्या असोत. सगळ्यांमध्ये आत्मचरित्राचे कवडसे पडले आहेत. कोणत्याही पुस्तकात हिमालयातील देवदार, पाईन वृक्षांची गर्द दाटी, जंगली फुलांच्या चादरींची वर्णने, सफरचंद, चेरी, अक्रोडची झाडे, तिथले पक्षी आणि निसर्गाची गडद वर्णने येतात. त्याचसोबत काळाच्या तडाख्यात हरवत चाललेल्या जगाची पुसटशी खंतही येत राहते. आबालवृद्धांना रिझवणाऱ्या त्यांच्या साहित्यामधून लॅण्डोरसारख्या हिमालयातील इतर प्रेक्षणीय गिरिस्थानांबद्दल ‘माहिती’ भरपूर मिळेल हे खरेच.. पण आठवणींमध्ये मुरलेली माहिती, कथासूत्र, अनुभव यांचा मेळ घालत ते एकांडय़ा शिलेदारासारखे लिहीत राहिले, हे अधिक खरे. वास्तविक २००० साली त्यांचे आत्मचरित्रात्मक पुस्तक दाखल झाले होते. मात्र ते पुरेसे नव्हते. ५००हून अधिक कथा, कादंबऱ्या, निबंध आणि बालसाहित्य लिहून झाल्यानंतरही बॉण्ड यांचा लेखनझरा ८१ व्या वर्षी अबाधित आहे.
आपण अविवाहित का राहिलो, यावर ते आगामी आत्मचरित्रात्मक भागांमध्ये प्रकाशझोत टाकणार आहेत. अन् त्याचे कुतूहल मोठय़ा प्रमाणात निर्माण झाले आहे. ‘रूम ऑन द रूफ’सारख्या कोवळ्या वयात त्यांनी लिहिलेल्या कादंबरीतील रस्टीच्या पराक्रमांची नवी गाथा पुढील वर्षी नव्या भागात येऊ घातली आहे. हिमालयाच्या पायथ्यालगतच्या निसर्ग, माणसांची आणि स्वत:ची सारी रूपे मांडून झाल्यानंतर आता ते नवे काय देताहेत, याची चातकओढ वाचकांमध्ये आहे.