भारतात चीनविषयक जे काही तज्ज्ञ आहेत त्यांचा दृष्टिकोन फारच टोकाचा भासतो. एकतर  त्यांचे लिखाण म्हणजे पाश्चिमात्य लेखकांनी चीनविषयी जे काही लिहिले आहे त्याचे भारतीय वाचकांसाठी केलेले रूपांतर वाटते, किंवा मग, भारतकेंद्री लिखाण करताना चीनला निव्वळ स्पर्धक किंवा शत्रू मानण्याची प्रवृत्ती दिसून येते.  मात्र ‘चायना- बिहाइंड द मिरॅकल’ हे तशा पुस्तकांपैकी नाही. त्याच्या लेखिका भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. चीनमध्ये भारतीय दूतावासात त्यांची बदली झाली, त्यातून चीनमध्ये  राहण्याचा, कामानिमित्त विविध ठिकाणी जाण्याचा अनुभव त्यांना मिळाला. त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन बराच व्यापक आणि समृद्ध आहे. त्यात चीनच्या औद्योगिक, आर्थिक, कृषी, व्यापार, संशोधन आदी क्षेत्रांचे प्रतिबिंब आहे. चीनच्या आर्थिक क्षेत्राविषयी इंटरनेट आणि अन्य माध्यमांतून इतकी प्रचंड माहिती उपलब्ध आहे की, त्यातील फापटपसाऱ्यातून खरी उपयुक्त माहिती वेगळी करणे हे अगदी चीनविषयक तज्ज्ञांसाठीही महामुश्कील काम आहे. प्रस्तुत पुस्तकात मात्र माहितीची फोलपटे वगळून निकं सत्त्व तेवढे कौशल्याने बाजूला काढून सुसंगतपणे मांडल्याचे दिसून येते. चीनमध्ये प्राथमिक काम करणारे बाहेरचे संशोधक केवळ एका छोटय़ा क्षेत्रात आणि मर्यादित परिघात काम करीत असल्याने त्यांनी आणलेली माहितीही एखाद्या कोषातीलच असते. या पुस्तकात मात्र अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन स्वीकारलेला दिसतो. प्रत्येक विषयाची सखोल माहिती तर दिलेली आहेच पण त्या-त्या क्षेत्रातील बदलांचा विस्तृत आढावाही घेतला आहे. त्यामुळे पुस्तक बरेच उत्कंठावर्धक आणि पाश्चिमात्य कथनाची दुसरी बाजू सादर करणारे बनले आहे. मनोवैज्ञानिक भूमिकेतूनही हा फरक जाणवतो. सामान्यपणे पाश्चिमात्य लेखकांनी चीनच्या त्रुटी पाहून त्याला कमी लेखले असते, नाके मुरडली असती. पण डावरा यांच्या निष्कर्षांमध्ये चीनविषयीचे आश्चर्य, उत्सुकता, कौतुक आणि जरूर तेथे टीका यांचे मिश्रण आहे. शांघाय, ग्वांग्झू या शहरांच्या कायापालटांमागील अनुभव, चीनमधील आरोग्यसेवांसाठी खासगी गुंतवणूक आकर्षित करण्याचे प्रयत्न, दारिद्रय़निर्मूलन, पायाभूत सुविधा विकास व औद्योगिक विकास यांबद्दल सांगणारी प्रकरणे असूनही,  रूढार्थाने तज्ज्ञांसाठी हे पुस्तक नाही तर ते चीनविषयी धोरणकर्त्यांसाठी आहे. त्यात काय केले पाहिजे याचा सैद्धांतिक काथ्याकूट नाही तर अधिक वास्तववादी भूमिका मांडलेली आहे. लेखनशैली प्रवाही आहे, मात्र क्वचित त्यात व्यावसायिक परिभाषा दिसून येते. लेखिकेने चीनच्या योजनांचा त्यांच्या प्रचलित आणि प्रसिद्ध नावांनी उल्लेख टाळला आहे. लेखिकेच्या काहीशा आत्मपर कथनातून भारतीय नोकरशहांच्या मनोभूमिकेत डोकावता येते, त्यांना काय अपेक्षित आहे याचा कानोसा घेता येतो. ते कोणते प्रश्न विचारतात, चीनला समग्रपणे समजून घेताना ते कितपत गंभीर आहेत आणि त्यासाठी ते किती परिश्रम घेतात याची कल्पना येते.

तथापि, पुस्तकात काही त्रुटीही आहेत. नवख्या वाचकांसाठी आवश्यक असलेला विषयाचा ढोबळ परिचय आणि संदर्भ स्थापित करणे या बाबींची कमतरता जाणवते. तसे ते प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला दिले असते तर उपयुक्त ठरले असते. त्याच्या अभावी एकेक उपशीर्षक वाचताना वाचक काहीसा गोंधळला जातो. त्याला या सर्व कथनाचे योग्य संदर्भ आणि संगती लावणे कठीण जाते. तसेच वाचकांना लेखिकेच्या मतांमध्ये, चीनच्या कथेतील कोणते निष्कर्ष भारतालाही लागू पडतात यांतही रस असता. अखेर, लेखिकेने चीनविषयक पुरेसा चिकित्सक दृष्टिकोन घेतलेला नाही. तसे काही उल्लेख आले आहेत, पण त्यांचा कथनातून अन्वयार्थ काढावा लागतो. विषयसूचीचा अभावही खटकतो. पण एकंदरीत हे पुस्तक वाचनीय आहे. चीनच्या आर्थिक विकासाचे चित्र उभे करतानाच हे पुस्तक भारतीय नोकरशाही चीनच्या कथेतून काय सार काढते आणि काय धडे घेते याची दृष्टीही मिळते. थोडक्यात, चीनमधल्या कशाकशाचा स्वीकार आपण करणार आहोत, याचा अंदाज हे पुस्तक वाचून बांधता येतो!

चायना – बिहाइंड द मिरॅकल

लेखिका : सुमिता डावरा

प्रकाशक : ब्लूम्सबरी इंडिया

पृष्ठे :  २३९, किंमत :  ३८० रुपये