‘तमेज तमारा माटे सर्वश्रेष्ठ छो’, ‘तुमच्यातील सर्वोत्तम बाब म्हणजे तुम्ही’, ‘आप खुद ही बेस्ट है’.. ही सारी, ‘द बेस्ट थिंग अबाउट यू इज यू’ या पुस्तकाची गुजराती, मराठी, हिंदी भाषांतरं. अनुपम खेर लिखित हे पुस्तक २०१४ च्या ऑगस्टमधलं होतं. या पुस्तकाला यश मिळालं, याची साक्ष म्हणजे पुस्तकाचे उपलब्ध अनुवाद! यशाचे मंत्र देणाऱ्या किंवा यशासाठी वाचकांना तयार करू पाहणाऱ्या पुस्तकांना असं काहीसं यश मिळावंच लागतं. ती पूर्वअट अनुपम खेर यांनी पार केली. मग २०१९ च्या ऑगस्टात अनुपम खेर यांचं आत्मचरित्रही आलं. ‘लेसन्स लाइफ टॉट मी- अननोइंगली’ हे त्या आत्मचरित्राचं नाव. त्याची भाषांतरं झाल्याचं ऐकिवात नाही. आता त्यांचं तिसरं पुस्तकही येतंय.. ५ डिसेंबरच्या शनिवारीच! ‘युअर बेस्ट डे इज टुडे’ हे त्या पुस्तकाचं नाव. हेही वाचकांना यशासाठी सज्ज करणारं वा ‘प्रेरणादायी’च असणार, याची खात्री देणारं नाव.

दिल्लीच्या राष्ट्रीय नाटय़ विद्यालयात शिक्षण घेऊन  चित्रपट-अभिनेता होण्यासाठी मुंबईत येऊन अनेक दिवस हलाखीत काढणारा मूळचा जम्मूचा एक ‘स्ट्रगलर’ म्हणून अनुपम खेर यांचा प्रवास सुरू झाला आणि चित्रपट क्षेत्रातली अभिनय कारकीर्द १९८२ पासून, ‘सारांश’ ते ‘अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ अशी बहरत गेली, ही यशोगाथाच म्हणता येईल. पण याच्या पलीकडचा- अनुपम यांनी तरुण कलावंतांसाठी मुंबईत अ‍ॅक्टिंगचे धडे देणंही सुरू केलं होतं हा – तपशील लक्षात घेतल्यास, प्रेरणादायी साहित्य लिहिण्याकडे ते कसे वळले, याचं उत्तर आपसूक मिळेल. शरीरमनाचं व अवकाशाचं भान देणं, आत्मविश्वास देणं, विचारप्रवृत्त करणं, प्राप्त परिस्थिती चटकन ओळखायला शिकवणं या अभिनय-शिक्षणाच्या मूलभूत पायऱ्या असतात. हा अनुभव अनुपम खेर यांना उपयोगी पडलाही असेल.. पण हा अनुभव तर अनेकांकडे असतो.. ते सगळेजण अशी प्रेरणादायी पुस्तकं लिहिण्याच्या फंदात पडतात का? मग अनुपमच का पडले? की, त्यांना ‘अ‍ॅक्सिडेंटल’ प्रेरणादायी लेखक मानायचं आपण?