अमेरिकेचा महान व्यावसायिक बॉक्सिंगपटू मुहम्मद अलीने आपल्या कारकीर्दीत अनेक थरारक लढती जिंकत जगज्जेतेपदाचा मान पटकावला. पण ३० ऑक्टोबर १९७४ रोजी झायरे या देशातल्या (आताचा ‘काँगोचे प्रजासत्ताक’ हा देश) किन्शासा शहरात हेवीवेट गटातील विजेता जॉर्ज फोरमनविरुद्ध झालेली जगज्जेतेपदाची लढत विसाव्या शतकात दूरचित्रवाणीवरून सर्वाधिक पाहिल्या गेलेल्यांपैकी होती. ‘रम्बल इन द जंगल’ या नावाने लोकप्रिय झालेली ही लढत फोरमनचे ताकदवान ठोसे व लढतीच्या सभोवताली घडलेल्या राजकीय घटनांनी चर्चेत आली होती. मुहम्मद अलीला जगज्जेतेपदाचा किताब पुन्हा मिळवून देणारी व त्याला लोकप्रियतेच्या शिखरावर नेणारी ही लढत होती. झायरेतील राजकीय अशांतता टिपण्यासाठी गेलेले इराणचे लोकप्रिय छायाचित्रकार अब्बास अत्तार यांनाही या लढतीने भुरळ पाडली. अब्बास यांनी टिपलेल्या या लढतीच्या छायाचित्रांच्या आधारे व राफेल ऑर्टिझ यांच्या रेखाटनांद्वारे फ्रेंच लेखक जीन डेव्हिड मोरवान यांनी या लढतीवर चित्रकादंबरी (ग्राफिक नॉव्हेल) सिद्ध केली आहे. ‘मुहम्मद अली, किन्शासा १९७४’ या शीर्षकाच्या या चित्रकादंबरीची फ्रेंच आवृत्ती गत वर्षी प्रकाशित झाली होती. काही दिवसांपूर्वी ती इंग्रजीत उपलब्ध झाली आहे!

‘टायटन कॉमिक्स’ने प्रसिद्ध केलेल्या या चित्रकादंबरीची कथा अब्बास यांची असून चित्रमय वर्णनामुळे अविस्मरणीय अशा त्या लढतीच्या रात्रीचा संपूर्ण थरारपट डोळ्यांसमोर उभा राहतो. ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार ठरलेल्या अब्बास यांनी गेली ३६ वर्षे या लढतीचा छायाचित्रखजिना जपून ठेवला होता; तो या चित्रकादंबरीच्या रूपाने जगासमोर आला आहे. फोरमनविरुद्धच्या या लढतीसाठी चाहते अलीच्या बाजूने होते. ‘‘अली, टाक तोडून’’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला होता (चित्र पाहा). एका क्षणी चाहत्यांनी अलीला मारलेली मिठी फोरमनला खुपत होती. हा प्रसंगही या चित्रकादंबरीत रेखाटला आहे. मुहम्मद अलीने फोरमनला मारलेला तो जोरदार ठोसा आणि यासंदर्भातल्या अनेक प्रसंगांद्वारे या लढतीच्या आठवणींना उजळा मिळतो.

विशेष म्हणजे, या लढतीच्या मूळ छायाचित्रांमध्ये कोणतेही बदल न करता ते फक्त चित्ररूपात वाचकांसमोर सादर करण्यात आले आहेत. अलीचे बॉक्सिंग रिंगणातील पदलालित्य, त्याचा वेग, प्रतिस्पर्ध्यावर टाकलेला कटाक्ष तसेच त्याला जगज्जेतेपद मिळवून देणाऱ्या त्या रात्रीतील संपूर्ण नाटय़ या चित्रकादंबरीत अनुभवता येईल!