गेल्या चारेक आठवडय़ांमध्ये साहित्याच्या ग्लोकल बाजारामध्ये यंदाच्या बुकर पारितोषिकासाठीच्या लघुयादीने काहीशी घुसळण केली. सहसा लोकप्रिय पुस्तकांचाच भरणा असलेल्या खुपविक्या पुस्तकांच्या यादीत यंदाच्या बुकर लघुयादीतील काही पुस्तकांचाही समावेश झाला होता. त्या अर्थाने यंदाच्या स्पर्धेत ‘क्लास’ आणि ‘मास’ यांचा संगम झालेला दिसून येतो.. लघुयादीतील तीन कादंबऱ्यांच्या अनुषंगाने घेतलेली ही नोंद..

आंतरराष्ट्रीय ‘बुकर प्राइझ’च्या यंदाच्या अंतिम लघुयादीतील कादंबऱ्यांबद्दल बरंच काही सांगणाऱ्या नैमित्तिक सदराचा हा पाचवा भाग!

Gautam Gambhir statement on Ben Stokes
‘बेन स्टोक्स दिल्लीतील लोकांमधील चुकीच्या कारणामुळे लोकप्रिय’, माजी खेळाडू गौतम गंभीरचं मोठं वक्तव्य
loksatta kutuhal deep blue computer beats world chess champion garry kasparov
कुतूहल : ‘डीप ब्लू’ला ‘कृत्रिम बुद्धी’ होती?
Harsh Goenka on Share market predict
‘शेअर मार्केटमध्ये हर्षद मेहताच्या युगाची पुनरावृत्ती’, बड्या उद्योगपतीने गुजराती-मारवडींचा उल्लेख करत वर्तविली भीती
india s gold demand rises 8 percent in jan march despite increase in prices
चढ्या दरानंतरही देशात सोन्याच्या मागणीत वाढ; तिमाहीत आठ टक्क्यांनी वाढून १३६.६ टनांवर
hybrid fund, hybrid fund types, share market, stock market, conservative hybrid fund, aggressive hybrid fund, sebi, investment in stock market, new investor in stock market, pros and cons of hybrid fund,
‘हायब्रिड’च्या निमित्ताने …
Virat Kohli's reaction on strike rate
विराट कोहलीने स्ट्राईक रेटवरुन टीका करणाऱ्यांना फटकारले; म्हणाला, ‘जे लोक दुसऱ्यावर टीका करतात त्यांनी स्वत:…’
Liquor license, lok sabha election 2024, wife of sandipan Bhumre, mahayuti, chhatrapati sambhaji nagar
भूमरेंच्या पत्नीच्या नावेही मद्य परवाना
gukesh d creates history becomes youngest Player to win fide candidates title zws
गुकेशला ऐतिहासिक जेतेपद; नामांकितांना मागे सोडत ‘कँडिडेट्स’मध्ये अजिंक्य; जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी पात्र

गेल्या चारेक आठवडय़ांमध्ये साहित्याच्या ग्लोकल बाजारामध्ये यंदाच्या बुकर पारितोषिकासाठीच्या लघुयादीने काहीशी घुसळण केली. पुस्तक-हपापलेल्या माणसांसाठी आजच्या डिजिटल युगामध्ये भरपूर ‘अलिबाबाच्या गुहा’ आहेत आणि त्याच्यासाठी त्यांना कोणता मंत्र लक्षात ठेवण्याची गरज नाही. न्यू यॉर्क टाइम्स बेस्टसेलरची यादी दर आठवडय़ाला अमेरिकेमध्ये आणि प्रकाशनसंस्थांच्या वितरणनिपुणतेने जगभरात कोणती पुस्तके सर्वाधिक खपली जात आहेत याचा आढावा घेते. गुडरीडस् नामक संकेतस्थळही बाजारात दाखल होणाऱ्या सर्वाधिक ताज्या पुस्तकांची माहिती देते. डॅन ब्राऊनपासून जे. के. रोलिंगपर्यंत आणि जेनिफर इगनपासून जेफ्री युजीनी या हाडाच्या साहित्यिकांपासून ते अभिनेत्या टॉम हँक्सच्या कथासंग्रहाचे पुस्तकविश्वातील खपाचे सध्याचे स्थान त्यातून ताडता येते. पण या बेस्टसेलर किंवा खूपविक्या पुस्तकांमध्ये कधीच बुकरच्या लघुयादीमधील पुस्तके नसतात. उदा. याच आठवडय़ातील न्यू यॉर्क टाइम्स बेस्टसेलर यादीमध्ये स्टीव्हन किंग याने त्याचा मुलगा ओवेन किंग याला सोबत घेऊन लिहिलेली कादंबरी ‘स्लिपिंग ब्युटीज’ ही पहिल्या स्थानावर आहे. तिसऱ्या स्थानावर स्टीव्हन किंगनेच एकतीस वर्षांपूर्वी लिहिलेली ‘इट’ ही कादंबरी नुकत्याच गाजत असलेल्या भयपटामुळे आली आहे. हार्लेन कोबेन, केन फॉलेट ही सातत्याने ही यादी गाजविणारी नावेही पहिल्या पाचाच्या यादीत आहेत.

सर्वस्वी ब्रिटिश पुरस्कार असला, तरी बुकरच्या लघुयादीनंतर सहसा अमेरिकी पुस्तकविक्रीमध्ये कधी यातील पुस्तके  दाखल होऊ शकत नाहीत. कारण अमेरिका जे वाचते, तेच जग वाचते, असा यादीकर्त्यांचा आगाऊ होरा असतो. त्यात अलीकडे तीनेक वर्षांत बुकर अंतिम यादीत अमेरिकी लेखकांची वर्णी लागत असली, तरी कधीही बुकरसाठी दाखल झालेले पुस्तक त्यानंतर बेस्टसेलर नसते. त्याचा वाचक हा गंभीरच असतो. शिवाय ज्या कादंबरीला पुरस्कार मिळतो ती कुठल्याही अमेरिकी बेस्टसेलरपेक्षा अधिक मोठय़ा प्रमाणात जगभरातील पुस्तकशौकिनांच्या फडताळात विराजमान होते. म्हणूनच या वर्षी न्यू यॉर्क टाइम्स बेस्टसेलर यादीत फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये दाखल झालेली, पण लवकरच तेथून बाहेर पडलेली दोन लोकप्रिय पुस्तके  यंदा बुकरच्या नामांकन लघुयादीत आली आहेत, हे यंदाच्या बुकरचे वेगळे वैशिष्टय़ म्हणावे लागेल. पॉल ऑस्टर यांचे ‘फोर थ्री टू वन’ आणि जॉर्ज सॉण्डर्स यांचे ‘लिंकन इन द बाडरे’ ही पुस्तके बुकरच्या दीर्घ यादीआधीच न्यू यॉर्क टाइम्ससह सर्व मातब्बर पुस्तक पंडितांच्या यादीत होती. त्यामुळे यंदा बुकरमध्ये ‘मास’ आणि ‘क्लास’ यांचा कधी न दिसणारा संगम दिसून आलेला आहे.

बुकरच्या नामांकनामधून भल्याभल्यांनी पुरस्कार पटकावेल असे अंदाजित केलेले पुस्तक कधीच पारितोषिक पटकावत नाही, हा इतिहास आहे. त्यामागे या पुरस्कारावरून होणारी सट्टेबाजी अधिक कारणीभूत आहे. समीक्षकांनी, निवड समितीतील सदस्यांनी पुस्तकाचे कितीही कौतुक करो किंवा त्यानंतर बाजारामध्ये, अलीकडे फोफावलेल्या सामाजिक माध्यमांमध्ये त्या पुस्तकाची कितीही भलामण होवो, तरी ते पुस्तक बुकर पारितोषिक पटकावेल, याची शाश्वती कुणीच देऊ शकत नाही.

वाजते-गाजते पुस्तक 

यंदा ‘फोर थ्री टू वन’ या पॉल ऑस्टर यांच्या पुस्तकाचा गाजावाजा झाला तो त्यांच्या लिखाणातील प्रयोगामुळे. कादंबरीलेखनाचा हा प्रयोग लहानखुरा नव्हता, तर तब्बल साडेतीन वर्षे आठवडय़ाचे साडेसहा दिवस अविरत चालला होता. ‘ग्रँटा’मध्ये कथा किंवा कादंबरीची प्रकरणे देऊन या कादंबरीकाराची लेखन कारकीर्द घडली. यंदाच्या पुरस्कारासाठी सर्वात दिग्गज, सर्वात अनुभवी आणि सर्वदूर पोहोचलेला लेखक म्हणून त्यांची ओळख. आत्तापर्यंत छोटय़ा, दोन-तीनशे पानांच्या पल्ल्यात कादंबरी लिहिणाऱ्या ऑस्टर यांनी ‘फोर थ्री टू वन’द्वारे बृहद्प्रकारी कादंबरी लिहिली आहे. ही कादंबरी किती मोठी असेल? तर साडेआठशे पानांहून अधिक आणि मजबूत वजनाची. जिच्याकडे बघून सर्वसाधारण वाचक ‘ती कधी तरी खूप दिवसांची सुट्टी काढून वाचायची’ असा पण करेल अशा अजस्र आकाराच्या या कादंबरीमध्ये प्रयोग काय असेल, तर ती एकाच नावाच्या नायकाची गोष्ट चार वेगवेगळ्या प्रकारे सांगते. म्हणजे खरे तर या चार वेगवेगळ्या कादंबऱ्या एकाच कलाकृतीमध्ये जोडल्या असल्याचे वाटू शकेल. आर्ची फग्र्युसन हे मुख्य पात्र आणि पन्नास-साठच्या दशकापासूनची त्याची जडणघडण, काळ, घटनांचा अजस्र पट ही कादंबरी एकत्रित करतो. महायुद्धोत्तर कालीन अमेरिकेच्या जडणघडणीशीही कादंबरीतील काळ समांतर दिसतो. कादंबरीमध्ये रचनेची गुंतागुंत आहे आणि प्रकरणांची विभागणीही बृहद् कोडय़ासारखी करण्यात आली असल्यामुळे यात चार आर्ची आणि त्यांची लांबोडकी जीवनकहाणी आहे. दरेक विभागात आर्ची कायम आहे, मात्र त्याच्या भवतालचे लोक तेच राहिलेले दिसत नाहीत. जोनाथन फ्रँझनच्या ‘करेक्शन’ (साडेपाचशे पाने) किंवा डेव्हिड फॉस्टर वॉलेसच्या ‘इन्फिनेट जेस्ट’ (हजार पानांच्या वर) कादंबऱ्यांइतकी तगडी कादंबरी पॉल ऑस्टर यांनी पहिल्यांदाच लिहिली आहे. वर खुपविकी असल्याचा शिक्का मिळूनही ती बुकरच्या यादीत आहे, ती त्यातल्या गुणवत्तेसाठी. २०१३ साली न्यूझीलंडच्या एलेनॉर केटन हीला साडेआठशे पानांच्या ‘ल्युमिनिअरीज’ या कादंबरीसाठी बुकर मिळाले होते. त्यानंतर बृहद् आणि तगडी कादंबरी असलेल्या पॉल ऑस्टर यांच्या पुस्तकाला पारितोषिक मिळेल, असा होरा अधिक वर्तवण्यात येत असला, तरी अद्याप त्याबाबत ठाम बोलणे अवघडच आहे.

कथालेखकाची पहिली कादंबरी

पुस्तक लेखकाला मोठे करते की लेखक पुस्तकाला, असा प्रश्न ‘लिंकन इन द बाडरे’ या कादंबरीच्या लेखकाबाबत म्हणावे लागेल. जॉर्ज सॉण्डर्स सुमारे तीन-चार दशके कथा आणि पत्रकारितेमध्ये कार्यरत आहेत. सातत्याने फक्त ‘न्यूयॉर्कर’ या साप्ताहिकातच कथा लिहिणाऱ्या आजच्या निवडक लेखकांमध्ये त्यांचा समावेश होतो. आपल्याकडील कथाकार अरविंद गोखले यांच्यासारखे त्यांचे कथा या साहित्यप्रकारावर प्रेम. म्हणून तीन-तीन वर्षे एकेका कथेवर त्यांनी काम केले आहे. तीन-चार कथासंग्रह आणि एक अकथनात्मक लेखांच्या पुस्तकानंतर त्यांचे ‘जीक्यू’ आणि इतर मोठमोठाल्या मासिकांकरिता लिहिणे सुरू आहे. जीक्यूमधील ‘टेण्ट सिटी’ या अमेरिकी मंदीने लाखाचे खाक झालेल्या लोकांचे जगणे मांडणारा प्रदीर्घ रिपोर्ताज आणि दुबई या शहराच्या विकासावरचा त्यांचा दीर्घ लेख आवर्जून वाचावा, किंवा त्यांच्या कथालेखनाची ताकद जाणून घेण्यासाटी न्यूयॉर्करने मोफत उपलब्ध केलेल्या त्यांच्या कथा पाहाव्यात.

कथाहोत्राला बाजूला सारून दोन वर्षांच्या मेहनतीतून साकारलेली त्यांची ‘लिंकन इन द बाडरे’ ही कादंबरी ऐतिहासिक असली, तरी सॉण्डर्सच्या वाचकांसाठी पानपकडू शैलीशी मिळती-जुळती आहे. आपल्या मुलाला शाळेत घालताना शिक्षकाला लिहिलेले लिंकनचे पत्र अजरामर झाले असून त्याचे मुलावरील अद्भुत प्रेम लक्षात येते. हा लिंकन १८६२ साली आपल्या एका मुलाच्या मृत्यूनंतर अनेकदा त्याच्या थडग्यावर भेट देण्यासाठी पोहोचे. या लिंकनच्या अश्रुपाताला कथेच्या केंद्रभागी घेऊन सॉण्डर्सने ही कादंबरी लिहिली आहे. ऐतिहासिक दस्ताऐवज, घटनांची जंत्री आणि शंभर वर्षांपूर्वीची अमेरिका आपल्या रसाळ शैलीत मांडण्यामध्ये सॉण्डर्सने सत्य आणि कल्पिताचे मिश्रण केले आहे. अमेरिकेसाठी राष्ट्रपिता असलेल्या लिंकन यांच्यावरील चित्रपट असो किंवा माहितीपट, तो गाजल्याखेरीज राहत नाही. त्याच धर्तीवर जॉर्ज सॉण्डर्स या आधीच कथा साहित्यपटलावर अग्रभागी असलेल्या लेखकाची ही पहिलीच कादंबरीदेखील मार्च महिन्यापासून न्यू यॉर्क टाइम्स बेस्ट सेलर यादीमध्ये झळकली. पण वाचायलाच जाणार असाल तर या लेखकाच्या कथा वाचल्यानंतरच या कादंबरीला हात लावा.

उगवती लेखिका

ब्रिटिश लेखिका फिओना मॉझले हिची ‘एल्मेट’ ही कादंबरी यॉर्कशायरजवळील खेडय़ाची कथा मांडते. गजबजलेल्या समाजापासून दूर असलेल्या खेडय़ात आईविना वाढणाऱ्या एका कुटुंबामध्ये राहणारा पंधरा वर्षे वयाचा नायक ही गोष्ट सांगतो. स्वत:च्या हातांनी घर बांधणारे हे कुटुंब, त्यांच्या आवतीभोवती असलेला अजस्र निसर्ग आणि भल्यापेक्षा अधिक बुऱ्या माणसांचा वावर, यांतून खेडय़ांतील गुन्हेगारी वळणे दाखविणारी ही गोष्ट सहजासहजी लिहिली गेली नाही. पुस्तकांच्या दुकानात नोकरी करणाऱ्या मॉझले हिने आपल्या प्रदीर्घ प्रवासात मोबाइलवर सुचलेल्या टिपणांना फावल्या वेळेत कागदावर उतरवत ही कादंबरी पूर्ण केली आहे. सर्वात वयाने लहान लेखिका असलेल्या मॉझले हिच्या नावावर फारसे लेखन नाही, पण पहिल्याच कादंबरीने आपल्या वयाहून दुप्पट काळ लिहित्या हातांच्या कलाकृतींसोबत लघुयादीत मॉझले हिचीदेखील वर्णी लागली आहे. अमेरिकी कादंबरी ‘हिस्ट्री ऑफ वुल्व्ह्ज’ला मिळणाऱ्या प्रसिद्धीइतकेही या कादंबरीचे नाव गेल्या काही महिन्यांमध्ये नव्हते. बुकरच्या दीर्घयादीत पोहोचल्यानंतर तिचे जीवन अंतर्बाह्य़ बदलले आहे. अरुंधती रॉय यांच्या ‘गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ या पहिल्या कादंबरीला थेट बुकर मिळाले होते, तेव्हा किंवा डीबीसी पिअरे याच्या ‘व्हर्नन गॉड लिटिल’ या पहिल्याच प्रयत्नावर बुकरची मोहोर लागली, तशीच या अत्यंत दुर्गम आणि साहित्यात न आलेल्या प्रांताला कादंबरीत आणणाऱ्या मॉझलेला पारितोषिक मिळेल का, हे पुढच्या आठवडय़ात (१७ ऑक्टोबर रोजी) कळणार आहे.

एका बुकर वर्षांत, म्हणजेच एक पुरस्कार होऊन दुसऱ्याची दीर्घयादी झळकते तोवर चांगल्या पुस्तकांचा खच आपल्यासमोर दाखल होत असतो. ज्या संख्येने चांगली पुस्तके उपलब्ध असतात, त्याच्या एक टक्काही निष्णात किंवा पट्टीचा वाचक वाचू शकत नाही. त्यामुळे जाणत्या वाचकाची किंवा पुस्तकज्ञात वाचकाची नेहमी आपण किती कमी वाचले, या गंडाने होणारी फरफट वाईट असते. दर आठवडी आदळत जाणाऱ्या पुस्तकसंख्येतून निवड करण्यासाठी याद्या आणि पुरस्कारांतील नामांकित पुस्तके हा चांगला पर्याय असतो. ब्रिटनच्या ‘बुकर’, कॅनडाच्या ‘गिलर’सारख्या पारितोषिकांमुळे पुस्तकांच्या समुद्रातील कणभराचे वाचन मिळवणे शक्य होऊ शकते. या विश्वातील लोकप्रिय, गंभीर आणि गंमतीदार अनुभव त्यातून गाठीशी येतो, तो वेगळा असतो.

(जॉर्ज सॉण्डर्स यांचा ‘टेण्ट सिटी’वरील लेख :

https://www.gq.com/story/homeless-tent-city-george-saunders-fresno

बुकरसाठी नामांकन मिळाल्यानंतर घेतलेली फिओना मॉझलेची मुलाखत :

https://www.theguardian.com/books/2017/aug/17/fiona-mozley-debut-novel-elmet-booker-longlist

पॉल ऑस्टर यांचा ‘ग्रॅण्टा’मधील निबंध :

https://granta.com/you-remember-the-planes/)

pankaj.bhosale@expressindia.com