आऽली एकदाची ती बातमी! गेले सहा महिने जीची वाट अनेकजण पाहात होते, अशी ती बातमी अखेर सरत्या आठवड्यात येऊन थडकली. जानेवारीत राष्ट्राध्यक्षपदावरून पायउतार झाल्यापासून डोनाल्ड ट्रम्प तसे दिसेनासेच झाले आहेत. पण अध्यक्षपदावर असताना इतका घडाघडा (की वचावचा?) बोलणारा हा माणूस आता इतका शांत कसा झाला, असे कोणास वाटत असेल, तर थांबा. सरत्या आठवड्यात आलेली ही बातमी वाचा… डोनाल्ड ट्रम्प महाशयांनी आपण अध्यक्षीय अनुभवाबद्दल पुस्तक लिहिणार असल्याचे जणू जाहीरच करून टाकले आहे. ट्रम्प यांनीच म्हटल्याप्रमाणे, त्यांना दोन प्रकाशकांनी पुस्तक लिहिण्याची ‘ऑफर’ दिली असून ती मान्य न झाल्याने त्यांनी त्यास नकार दिला आहे. परंतु येत्या काळात आपण त्याच मतावर ठाम राहू असे काही नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली आहे. त्याही पुढे जाऊन, आपण एक ग्रंथराजच लिहायला घेतला असून अधाशासारखे लिहीतच सुटलो असल्याचेही ट्रम्प म्हणतात. हे झाले ट्रम्प यांचे म्हणणे. पण त्यांनी आपल्या निवदेनात ‘ते दोन प्रकाशक’ कोण, हे मात्र गुपीत ठेवल्याने ट्रम्प यांचे पुस्तक कोण छापणार आहे, याचे कुतूहल मात्र निर्माण झाले आहे. या कुतूहलयुक्त नजरा स्वत:कडे वळू लागल्या तशा प्रकाशकांनी खुलासे द्यायला सुरुवात केली आहे. ‘तो मी नव्हेच’ धर्तीवर मॅकमिलन, पेंग्विन रॅण्डम हाऊसपासून हॅचेट, सायमन अ‍ॅण्ड शुस्टर ते हार्पर कॉलिन्सपर्यंत अनेक प्रकाशनसंस्था हात वर करू लागल्या आहेत. मावळत्या, पायउतार झालेल्या राष्ट्राध्यक्षांचे अनुभव पुस्तकरूपात आणण्याची परंपरा अमेरिकेत गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे, हे खरे. पण ज्यांनी अध्यक्षीय कार्यकाळात ३० हजारांहून अधिक वेळा खोटी वा दिशाभूल करणारी विधाने केली, ते ट्रम्प महाशय पायउतार झाल्यानंतर तरी सत्य वदतील काय, अशी शंका प्रकाशक बोलून दाखवत आहेत. मुळात आतापर्यंत या ट्रम्प महाशयांविषयी तब्बल तीन डझनांहून अधिक पुस्तके लिहिली गेली असताना, खुद्द ट्रम्प यांच्याकडे तरी सांगण्यासारखे काही उरले आहे का, हाही प्रश्नच. तरीही, कोणा प्रकाशकाने धाडस करून ट्रम्प यांचे पुस्तक छापण्याचा निर्धार केलाच तरी, ट्रम्प महाशय स्वत:ला अध्यक्षपदावरून पायउतार झाल्याचे वा आपला पराभव झाल्याचे मान्य करण्यास तयार नाहीत, त्याचे काय? तर… ट्रम्प यांचे पुस्तक यायचे तेव्हा येवो. पण त्यांचे सहकारी, माजी उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स यांचे आत्मकथन प्रसिद्ध होणार असल्याचे अधिकृतपणे जाहीर झाले असून त्यासाठी आणखी दोन वर्षे वाट पाहावी लागणार आहे.