पत्रकार मीना मेनन यांनी पाकिस्तानात नऊ महिने राहून बातमीदारी केली. या वास्तव्यातील अनुभवकथनाचे हे पुस्तक.. त्यातून असंख्य भारतीयांच्या मनात असलेल्या पाकिस्तानच्या रूढ प्रतिमेला दुजोरा देणारे संदर्भ येतातच; पण त्याही पलीकडे जात हे पुस्तक तेथील साहित्य, कला व माध्यमविश्वाचे अनेक कंगोरे उलगडून दाखवत पाकिस्तानचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व उभे करते..

पाकिस्तान हा आपला शेजारी असला, तरी जवळचा नाही. ते शत्रुराष्ट्र. खरे तर त्यामुळे त्याची आपल्याला नीट ओळख असायला हवी. पण तसेही नाही. आपल्यातील अनेकांना तो देश माहीतच नसतो. त्याचे एकच चित्र आपल्या परिचयाचे आणि आवडीचे असते. ते म्हणजे अत्यंत मागास, भ्रष्ट, प्रतिगामी, दहशतवादी देश. तो हुकूमशहांचा, शरीफ-मुशर्रफ यांच्यासारख्या भ्रष्टांचा, तालिबान्यांचा, हाफिझ सईदचा देश. अल्पसंख्याकांवर अत्याचार करणारा, भारताचा द्वेष करणाऱ्या कट्टरतावाद्यांचा, बॉम्बस्फोटांचा देश. पण हे चित्र चुकीचे आहे का?

तर नाही. सहा वर्षांपूर्वी अ‍ॅनातोल लिव्हेन यांनी त्यांच्या पाकिस्तानवरील पुस्तकात या देशाला ‘हार्ड कंट्री’ म्हटले होते. अनेकांसाठी तर ते ‘फेल्ड स्टेट’ – अपयशी राष्ट्र- आहे. त्यामुळेच जेव्हा ‘द हिंदू’च्या पत्रकार मीना मेनन पाकिस्तानात नऊ महिने बातमीदारी करून ‘सुखरूप’ परत आल्या तेव्हा अनेकांना त्याचेच आश्चर्य वाटले. लोक त्यांना विचारत की, ‘एक महिला म्हणून कशा काय राहिल्या त्या पाकिस्तानात?’ तर त्या देशाकडे पाहण्याची ही एक नजर झाली. त्यांना नवी दिल्लीत एका राजकीय नेत्याने हसत हसत विचारले होते की, ‘कशाला गेला होता पाकिस्तानात? लढायला की काय?’ हा त्या देशाविषयीचा दुसरा दृष्टिकोन झाला. दोन्हींच्या मागील विचारप्रतिमा एकच. पण ती नाण्याची केवळ एक बाजू आहे. मीना मेनन यांच्या ‘रिपोर्टिंग पाकिस्तान’मध्ये ही वस्तुस्थिती येतेच. आणि ती नक्कीच भयानक अशी आहे. पेशावरमधील एका चर्चमध्ये झालेल्या मानवी बॉम्बस्फोटातील बळींच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जावे आणि त्यातील एका महिलेने तुमच्यासमोर अचानक प्लास्टिकच्या छोटय़ाशा पेटीत जिवापाड जपून ठेवलेले बॉम्बच्या खिरपाळाचे रक्ताळलेले तुकडे ठेवावेत. सांगावे, मुलाच्या मानेतून निघाले हे. त्याची आता ही एवढीच आठवण आहे.. ही घटना कोणाही संवेदनशील माणसाच्या काळजाचे पाणी करणारी. मीना मेनन यांनी ते अनुभवले आहे. त्याचे वार्ताकन केले आहे. अहमदी, ख्रिश्चन, हिंदू अशा अल्पसंख्याकांना तेथे रोज जे भोगावे लागत आहे त्याबद्दल लिहिले आहे. पाकिस्तान हे धर्माधिष्ठित राज्य, पण तेथेही त्यांचा एक धर्म समाजाला सांधू शकलेला नाही. तेथेही शिया आणि सुन्नी एकमेकांचे गळे घोटण्यास उतावीळ दिसतात. अहमदी हेही मुस्लीमच. पण, मीना मेनन सांगतात, ‘अहमदींना बोलते करणे सोपे नसते. बहुतेक जण घाबरलेले असतात. आपल्याला कोणी मारून टाकू नये म्हणून फारसे कोणाच्या डोळ्यांवर येऊ नये असेच वागतात ते.’ अहमदींचा हा द्वेष या स्तरावर गेला आहे, की पाकिस्तानी वैज्ञानिक डॉ. अब्दुस सलाम यांच्या कबरीवरील स्तंभावरील ‘नोबेल विजेते पहिले मुस्लीम’ यातील ‘मुस्लीम’ हा शब्द काढून टाकण्यात आला आहे. तोही न्यायालयाच्या आदेशाने. तर मुस्लिमांची ही स्थिती म्हटल्यावर, तेथील ख्रिश्चन आणि हिंदूंचे काय हाल असतील याची कल्पना करणे कठीण नाही. हिंदूंच्या मुली जबरदस्तीने पळविणे, सक्तीने त्यांचे धर्मातर करणे आणि मुस्लीम मुलांशी त्यांचा निकाह लावून देणे हा उद्योगच सुरू केला आहे तेथील कट्टरतावाद्यांनी. पंजाब, सिंधमध्ये हिंदूंवरील अत्याचारांचे प्रमाण वाढते आहे. तेव्हा असंख्य भारतीयांच्या मनात पाकिस्तानची जी प्रतिमा आहे त्यात चुकीचे काही नाही, ही बाब या पुस्तकातूनही स्पष्ट होते.

पाकिस्तानातील लष्करशाही प्रबळ आहे. नागरी जीवनाच्या अनेक अंगांवर तिचे नियंत्रण आहे. भारत-पाकिस्तान संबंधांत खरा खोडा कोण घालत असेल, तर ही लष्करशाही. हे मापनही आता सर्वपरिचित आहे. ‘नागरिक विरुद्ध लष्कर’ या प्रकरणातून लेखिकेने या विषयाला हात घातलाय. त्यांच्यातील संघर्ष अधोरेखित केला आहे. पण या प्रकरणाच्या शेवटी त्याही विचारतात, ‘लष्कराच्या धोरणांनुसार न चालता लोकशाही यशस्वी होऊ शकते?’ लष्कराच्या या धोरणांच्या इमारतीचे जोते आहे भारतद्वेषाचे. हा द्वेष जितका धार्मिक कारणांवरून आहे, तितकाच तो लष्करी आणि राजकीय कारणांवरून आहे. त्यात काश्मीरपासून सिंध आणि बलुचिस्तानचा प्रश्न येतोच, पण २६-११च्या हल्ल्याचा सूत्रधार हाफिझ सईद याचा लाडका भारतविरोधी राग हा ‘भारताच्या जल दहशतवादा’चा आहे. भारतद्वेषाचे पीक शेती आणि व्यापार क्षेत्रातूनही काढण्याचेच हे उद्योग. मेनन यांनी हे सारे प्रत्यक्ष पाहिले. त्या कथनातूनही पुन्हा पाकिस्तानचे परिचित चित्रच आपल्यासमोर उभे राहते. पण मग या पुस्तकाचे वेगळेपण काय आहे?

ते आहे त्याच्या दृष्टिकोनात. ‘जसे आहे तसे’ या तत्त्वावर वस्तुस्थितीला भिडण्यात. आलेले अनुभव प्रामाणिकपणे मांडण्यात व या सगळ्यांतून वाचकांसमोर प्रचारातला नव्हे, तर प्रत्यक्षातला पाकिस्तान ठेवण्यात. पाकिस्तानच्या आपल्या मनातील प्रतिमांहून एक वेगळाच पाकिस्तान यातून समोर येतो. या देशाला भेट देऊन परतलेल्या पत्रकारांकडून, राजनैतिक अधिकाऱ्यांकडून आपण पाकिस्तानची ही वेगळी बाजू ऐकलेली असते. भारतातून आलोय म्हटल्यावर तेथील सामान्य लोकांकडून कसे स्वागत झाले वगरे आपण कुठे कुठे वाचलेले असते. पण एका पातळीवर तेही भडकच असते. त्यातही पुन्हा एखाद्या घटनेचे सर्वसामान्यीकरण करण्याचीच प्रवृत्ती दिसून येते. त्यातून झाला तर प्रोपगंडाच होतो. खऱ्याचे तुकडे हाती कमीच लागतात. अशी तुकडेबाज तथ्ये मांडणारी मंडळी भारतीय स्वयंसेवी संस्थांच्या आणि विचारगटांच्या क्षेत्रात भरपूर. मीना मेनन यांनी पाकिस्तानमधील वास्तव्यात त्यांच्या कवेत मावेल एवढय़ा समग्र वास्तवाला भिडण्याचा प्रयत्न केला. हे वास्तव्य नऊच महिन्यांचे. त्यानंतर पाकिस्तान सोडावा लागला त्यांना. त्याला कारण ठरली ‘मामा’ कादीर बलूच यांची मुलाखत. हे बलुचिस्तानचे गांधी. एरवीही गांधी आपल्याला सतत कुठे कुठे भेटतच असतात. मेनन यांना ते क्वेट्टा ते इस्लामाबाद या तीन हजार कि.मी. अंतराच्या ‘दांडीयात्रे’त भेटले. त्यांनी त्यांची मुलाखत घेतली. त्यावरून पाकिस्तान सरकार संतापले. एरवीही पाकिस्तानी सरकारच्या दृष्टीने सगळे भारतीय पत्रकार म्हणजे ‘रॉ’चे एजंटच असतात. मीना मेनन यांच्यावर तर गेल्या दिवसापासून ‘आयएसआय’चे दोन गुप्तचर पाळत ठेवून असत. एखाद्यावर अशी नजर ठेवली जाते ती सहसा गुपचूप. पण हे गुप्तचर तीही काळजी घेत नव्हते. हा समोरच्या व्यक्तीला घाबरवून सोडण्याचाच प्रकार. पण मेनन यांनी त्याचीही गंमत लुटली. ‘बीअर्ड’ आणि ‘चबी’ ही त्यांनी त्यांना दिलेली नावे. तो पाळतीचा सर्वच प्रकार गमतीशीर असला, तरी त्याच्या तळाशी असलेली दहशत लपून राहात नाही. ज्या देशात घराच्या चाव्या तयार करून देणारा चावीवालाही तुमचा पत्ता आणि पारपत्राची प्रत मागतो, त्या देशातील परकी नागरिकांवरच नव्हे, तर स्थानिकांवरही गुप्तचर संस्थेचे दडपण किती असेल याचा अंदाजही करवत नाही. परंतु त्या वातावरणातही मेनन यांनी पाकिस्तानी समाज – पंचतारांकित हॉटेलांपासून कच्ची आबादी (म्हणजे झोपडपट्टी) पर्यंतचा समाज – जवळून निरखला. त्या निरीक्षणांतून आपल्यासमोर एखाद्या व्यक्तीसारखा पाकिस्तान उभा राहतो. त्याच्या विरूपांबरोबरच सौंदर्यासकट, गुणांबरोबरच अवगुणांसकट. हे या पुस्तकाचे वेगळेपण आहे. कसा आहे हा ‘व्यक्ती पाकिस्तान’?

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, तेथे ‘माणसे’ राहतात. मुंबईच्या लोकलमध्ये, पुण्यातल्या पुस्तक दुकानांमध्ये, नागपुरातल्या हॉटेलांमध्ये दिसतात तशी माणसे. तशाच गुणदोषांसकटची, भावभावनांसकटची माणसे. मीना मेनन इस्लामाबादेतला एक किस्सा सांगतात. संसद सदस्यांच्या एका सभेला त्या गेल्या होत्या. ते सगळेच नेते भारताबरोबर चांगले संबंध निर्माण व्हावेत या मताचे. एक महिला खासदार भारतीयांबद्दल खूप चांगले बोलल्या तेथे. पण भाषण संपता संपता अचानक त्या खेदाने म्हणाल्या, ‘भारत नेहमी पाठीत खंजीर का खुपसतो?’ मग दुसरा म्हणाला, ‘छोटय़ा काळजाचे असतात ते.’ मेनन यांना ते ऐकून राग आला. पण मग त्यांच्या लक्षात येते, की प्रतिमांचे एकसाचीकरण करण्यातून हे होत असते. हेच पाकिस्तानबाबत भारतातही घडत असते. द्वेष जर पाठय़पुस्तकांतून, माध्यमांतून, नेत्यांच्या भाषणांतून मनांत मुरवला जात असेल, तर त्याचा परिणाम होणारच. पण संस्कृतीच्या राख्यांना द्वेषाची कसर लागली असली, तरी अजून त्या तुटलेल्या नाहीत. इस्लामाबादेत तेव्हा नुकताच ‘सेन्टॉरस’ हा पहिला मॉल खुला झाला होता. तेथील मल्टिप्लेक्समध्ये प्रामुख्याने लागतात ते बॉलीवूडचे चित्रपट. पाकिस्तानी वेडे आहेत त्या फिल्मी संस्कृतीचे. मेनन सांगतात, की एकदा एक महिला तिकिटाच्या खिडकीवर विचारताना त्यांनी ऐकले की, ‘बॉलीवूड फिल्म है, टिकट मिलेगा?’ तो चित्रपट काय आहे, कसा आहे याच्याशी त्यांना देणे-घेणे नसतेच. लोक प्रेम करतात त्यांच्यावर. त्यातही खासकरून मुंबईवर. त्यांना सिनेमातल्याच नव्हे, तर एकूणच मुंबईचे फारच आकर्षण. मुंबईहून आलोय म्हटल्यावर पाकिस्तानात अनेक ठिकाणी खास वागणूक मिळते. हा अनेकांचा अनुभव मीना मेनन यांनाही आलाय. या मल्टिप्लेक्समध्ये मेनन यांनी ‘वार’ हा पाकिस्तानी चित्रपट पाहिला. तो भारतविरोधी. एकसाची प्रतिमा कुरवाळणारा, आपल्याकडच्या ‘सरफरोश’सारखा. दर्जाने त्याहून कमी. पण प्रचंड लोकप्रिय. असे असले, तरी त्या चित्रपटालाही नावे ठेवणारे अनेक लोक तेथे आहेत. ते अर्थातच सुशिक्षित, कलाजाणिवा वगरे असणारे. परंतु म्हणून त्यांच्यातील बॉलीवूडप्रेम तसूभराने कमी आहे असे मानता येणार नाही. ऐश्वर्या रॉयला तेव्हा नुकतेच कन्यारत्न झाले होते. त्या वेळी मीना मेनन हैदराबादेतील एका व्यावसायिकांच्या परिषदेच्या वार्ताकनासाठी गेल्या होत्या. तर तेथील टी.व्ही.वाली मंडळी, महिला प्रतिनिधी त्यांच्या मागे लागल्या होत्या, की या एवढय़ा ‘महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज’बाबत त्यांचे मत काय आहे?

पण एक नक्की, की हे सांस्कृतिक बंध एवढेही वरवरचे नाहीत. फाळणीच्या वेदना केवळ एकाच बाजूला नव्हत्या. त्यात भरडलेल्या माणसांचे ‘पॉलिटिक्स’ तर दोन्ही बाजूला सारखेच होते. या फाळणीच्या मानवी दु:खातून जन्माला आलेले पाकिस्तानातील थोर लेखक इंतिझार हुसन. मंटोइतका त्यांना मान नाही. पण त्याच रांगेतले. स्वभावाने मिश्कील. मेनन यांनी त्यांची मुलाखत घेतली होती. महाभारत आणि जातक कथा हा त्यांच्या आवडीचा विषय. ते सांगत होते, ‘पहिली फाळणी झाली ती महाभारतात.. पांडवांना त्याची वेदना भोगावी लागली..’ मग हसत हसत ते म्हणाले, ‘..आणि पांडवांनंतर मला.’

पाकिस्तानातील हे साहित्य, कला आणि माध्यमांचे विश्व हे या पुस्तकाचे एक महत्त्वाचे, वाचकांना सातत्याने धक्के देणारे अंग आहे. म्हणजे, ‘मद्यपान निषिद्ध’ असलेल्या या देशामध्ये ‘मुरी ब्रुवरी’ हा भारतीय उपखंडातील एक उत्कृष्ट मद्यनिर्मिती कारखाना आहे. उत्कृष्ट सिंगल माल्ट आणि प्रीमिअम व्होडकासाठी ती सुप्रसिद्ध आहे. ते मद्य पाकिस्तानी मुस्लीम ग्राहकांना विकता येत नाही. पण म्हणून लोक प्यायचे थांबले आहेत असे नाही. तेथे परमिट मद्यालये आहेत आणि तेथे रांगा लागलेल्या असतात. काही हॉटेलांतून चहाच्या कपातून दारू मिळते, हे वाचून जेवढा ‘सानंद’ धक्का आपणांस बसतो, त्याहून अधिक धक्का आपणांस बसतो तो हे वाचून की, दर २३ मार्चला लाहोरच्या ‘शादमान चौका’त शहीद भगतसिंग यांच्या आठवणी जागविल्या जातात. त्या चौकाला त्या क्रांतिवीराचे नाव द्यावे म्हणून निदर्शने केली जातात. ‘जमात-उद-दवा’ने एकदा तो प्रस्ताव हाणून पाडला. का? भगतसिंग शीख होते म्हणून नव्हे, तर ते नास्तिक होते म्हणून. पण पाकिस्तानातील काही लोक तेथील सेक्युलर अवकाश विस्तारण्याचा प्रयत्न करीत आहेत. नाटककार मदीहा गौहर यांचा एक नाटय़गट आहे. ती मंडळी ‘रंग दे बसंती’सारखे नाटक करतात. भारतीय पंजाबातील, कोलकात्यातील रंगकर्मीच्या मदतीने नाटय़ोत्सव भरवतात.

हे सारे पाकिस्तानला यथार्थ परिदृश्यातून सादर करणारे आहे. तेथे गरिबी आहे. झोपडपट्टी आहे. त्याहून विलग असा तृतीयपर्णी समाज आहे. धार्मिक कट्टरतावाद हा नेहमीच क्रूर असतो. तो तेथे आहेच. दहशतवादी आरामात येतात. गोळीबार करतात. बॉम्ब फेकतात आणि निघून जातात. हे आता सवयीचे झाले आहे. पण त्याचबरोबर तेथील शहरे महिला सुरक्षेबाबत आपल्यासारखीच आहेत. तेथेही शांततेची वार्ता करणारे आहेत आणि तेथेही त्यांना देशद्रोही म्हणणारे लोक आहेत. तेथील माध्यमेही सत्ताधाऱ्यांची अंकित आहेत आणि तरीही काही पत्रकार धाडसाने लिहीत आहेत. फक्त नंतर त्यांना गोळ्या खाव्या लागतात. इस्लामाबादेतील प्रेस क्लबला कडेकोट सुरक्षा दिलेली आहे. आणि त्याचबरोबर तेथील राज्यकत्रे त्यांना सातत्याने सांगत असतात, की पाहा, भारतीय माध्यमे कशी देशप्रेमी असतात. ती आपल्या सरकारवर फारशी टीका करीत नाहीत. हे जे कथन आहे (आणि जे एका अनुभवी पत्रकाराने केले असल्याने सहज ओघवते झालेले आहे), ते या पुस्तकाचे महत्त्व वाढवणारे आहे. हे पुस्तक वाचायचे, ते त्यातून पाकिस्तान हे एखाद्या बहुआयामी व्यक्तीसारखे आपल्यासमोर उभे राहते म्हणून. ते ‘व्यक्ती पाकिस्तान’ जाणून घेणे ही आपली राजकीय समज वाढविण्यासाठी आवश्यक आहे.

‘रिपोर्टिंग पाकिस्तान’

लेखक : मीना मेनन

प्रकाशक : पेंग्विन व्हायकिंग

पृष्ठे : ३८४, किंमत : ५९९ रुपये

ravi.amale@expressindia.com