गडय़ांनो ऐका, परमेश जगाचा पैका! रूपक वापरलंय पैशाचं, पण ते रूपकही सामान्यच आहे,  तोकडंच आहे, हे ‘पैका’ या शब्दयोजनेतून दाखवून दिलंय! तेव्हा कवी म्हणतो की, चराचरात हा परमेश्वर भरला आहे. आता त्या परमेश्वराच्या शोधासाठी माणूस काय करतो? तो ज्ञानानं त्याला जाणू इच्छितो! जो अज्ञानी आहे आणि अज्ञानालाच ज्ञान समजत आहे, त्याला त्या परमज्ञानाचा स्रोत असलेल्या परमतत्त्वाचं ज्ञान अज्ञानाच्या बळावर कसं होणार? गुरुजी म्हणतात, ‘‘अभी तक जो समझा, वो सीमाही समझा, सीमा समझना, समझना नहीं हैं!’’ म्हणजे एका मर्यादेपर्यंतच आकलनाची मजल जाते. ती मर्यादाही भौतिक जगानं लक्ष्मणरेषा आखून दिली तिथपर्यंतच असते. मग त्या सीमेत अडकून जे काही समजतं, ते खरं समजणं नव्हेच. मग कुणी तपाच्या मार्गानं त्याला जाणू इच्छितो, पाहू इच्छितो. डोळे मिटल्यावरही ज्याच्या मनातलं जग ओसरत नाही, असा जीव तपाची किती का आटाआटी करेना, त्याला तो तपानं का गवसणार आहे? म्हणून कवी म्हणतो, ‘‘सोडा ज्ञान तपाच्या गोष्टी।’’  ज्ञान आणि तपाच्या गोष्टी सोडून द्या! मग? काय करायचं? तर, ‘‘भोवती फिरवा क्षणक दृष्टी। द्रव्यार्चने रत अखिला सृष्टी। ठाव ना रंका।। गडय़ांनो ऐका, परमेश जगाचा पैका।। ’’ भोवती क्षणक दृष्टी फिरवायची आहे! आपल्या तोडक्यामोडक्या ज्ञानानं आणि तपानंही आपला अहंकार मात्र बळकट होत चालला आहे. तो थोपवायचा, तर आधी ज्ञानाच्या गप्पा आणि तपाच्या थापा थांबवायला हव्यात. त्या थांबवून आपल्या अवतीभवती दृष्टी फिरवायची आहे. म्हणजेच डोळ्यांना दिसत असूनही जे जग आपण खऱ्या अर्थानं पाहात नाही, त्या जगाला जागत्या दृष्टीनं पाहायचं आहे! खऱ्या एकाग्रचित्तानं एक क्षणभरसुद्धा या चराचराकडे खऱ्या अर्थानं पाहिलं तरी पुरेसं आहे. ‘क्षण एक पुरे प्रेमाचा’ म्हणतात ना? तसा ‘क्षण एक पुरे भानाचा’ म्हणता येईल. एक क्षणभर तरी अवधानपूर्वक आपल्या भवतालच्या सृष्टीकडे पाहिलं पाहिजे. तसं अवधानपूर्वक पाहिलं तरी या सृष्टीतलं वैविध्य आणि त्यात असलेली एकसूत्रता जाणवू लागेल. वृक्षवेली, फुलं, फळं, प्राणी, पक्षी अशी अनंत जीवसृष्टी.. त्यांचं आकारवैविध्य, रूपवैविध्यही थक्कं करणारं. नुसत्या फुलांचे किती प्रकार, किती रंग, किती आकार.. लहानशा किडय़ामुंगीपासून अजस्त्र प्राण्यापर्यंतच्या प्राणीसृष्टीचीही तीच तऱ्हा. तरीही त्या सर्वाचं निसर्गावर म्हणजेच एका अगम्य शक्तीवर अवलंबून जगत राहणं आणि त्यांचं अस्तित्वही सांभाळलं जाणं.. ही सर्व जीवसृष्टी एकाच चैतन्यशक्तीवर अस्तित्वात आहे आणि प्राणरूपानं आपल्यात असलेल्या चैतन्यशक्तीचीच जोपासना करीत आहे. एकप्रकारे त्या परमाद्यशक्तीची ही उपासनाच! म्हणूनच कवी म्हणतो, ‘‘द्रव्यार्चने रत अखिला सृष्टी। ’’ ही सृष्टी कशी आहे? तर ती द्रव्यार्चनात रत आहे. द्रव्य म्हणजे तो परमेश्वर. तर त्याच्या अर्चनेत म्हणजेच त्या चैतन्यशक्तीच्या उपासनेत ही अवघी सृष्टी रत आहे. पण जो खऱ्या अर्थानं भाग्यवंत आहे, म्हणजेच जो या चराचराकडे, दृश्य-अदृश्याकडे, साकार-निराकाराकडे दृष्टी वळवू शकतो, त्यालाच त्या परम तत्त्वाचा ठाव लाभू शकतो. ज्याला ती दृष्टी नाही, तो रंक आहे. त्याला त्याचा ठाव लागणं शक्य नाही. कवी म्हणूनच म्हणतो, ‘‘द्रव्यार्चने रत अखिला सृष्टी। ठाव ना रंका!! छ’

– चैतन्य प्रेम