साधनपथावर आल्यावर आपण आजवर कसं जगत होतो आणि कसं जगलं पाहिजे, याची जाणीव होऊ लागते. मनात क्षीण का होईना, पण परमतत्त्वासाठी तळमळ असेल, तर मग आपोआप पुढचा मार्ग प्रकाशित होऊ लागतो. म्हणजे आपल्या अंत:करणावर भावसंस्कार करतील अशी पुस्तकं, संत आणि भक्तचरित्रं वाचनात येऊ लागतात. ती वाचतानाही कित्येक प्रश्नांची उत्तरं मिळत जातात. अध्यात्माविषयी जिज्ञासा जागृत होत वाढू लागते.  मग जिथून ती जिज्ञासा शमू शकेल, प्रश्नांची उत्तरं मिळू शकतील, अशा स्थानी साधना करू पाहणारा जाऊ लागतो. त्यातूनच त्याची श्रद्धा केंद्रित होऊ लागते. म्हणजे कुणी साईबाबांना सद्गुरू मानू लागतो, कुणी गजानन महाराजांचा होऊ पाहतो, कुणी गोंदवलेकर महाराजांच्या समाधीस्थानी दीक्षा घेऊन साधनेला लागतो.. थोडक्यात जो सद्तत्त्वाशी सदैव एकरूप आहे अशा सत्पुरुषाला आदर्श मानून त्यांच्या बोधानुरूप जीवन जगण्याचा अभ्यास सुरू होतो. तुकाराम महाराजांना पांडुरंगाची जी आस लागली होती, ती अशा सर्व साधकांसाठी मार्गदर्शकच आहे. तुकाराम महाराजांसारखा आर्तभाव या नुसत्या शब्दांतून वाचूनही मनावर संस्कार झाल्याशिवाय राहात नाही. इथं आपण तुकाराम महाराज आणि विठ्ठल यांच्या जागी भक्त आणि सद्गुरू गृहित धरले तरी सगळा अर्थ सुसंगतपणे उलगडतोच. तर भक्ताला आपल्या सद्गुरूंशिवाय जगात कशालाही अर्थ वाटत नाही. जणू परक्या देशात आपण पडलो आहोत. परका देश म्हणजे अनोळखी, आपलेपणाची ग्वाही नसलेला प्रांत! भक्त कळवळून म्हणतो आहे की, या जगात तुझ्याशिवाय मला दुसरा कुणी सखा नाही. कुणाशीच सख्यभाव नाही. कारण या जगातली सगळी नाती ही हिशेबीपणानं जोडली किंवा तोडली जाणारी आहेत. अहेतुक, निर्हेतुक, नि:स्वार्थ अशी नाती या जगात अभावानंच आढळतात. केवळ माझ्या आत्महिताची तळमळ असलेला तुझ्यासारखा दुसरा कुणी नाही, असं हा भक्त सांगतो. मग म्हणतो की, हे सख्य असंच कायम टिकावं यासाठी तुझ्या चरणीं मिठी घालावी, असं मला तीव्रपणे वाटत आहे. आता चरणांना मिठी मारायची म्हणजे काय? तर ज्या मार्गावर तुझं प्रेम आहे, तुझी जी जगण्याची रीत आहे ती दृढपणे आपलीशी करणं! त्यातूनच हा भाव येतो की, ‘‘ओवाळावी काया चरणांवरोनी!’’ म्हणजे काय तर हे सद्गुरो, तुझ्या मार्गानं चालण्यासाठी ही काया ओवाळून टाकावी. म्हणजेच, हे शरीर झिझवावं. त्या अभ्यासासाठी राबवावं. मी अशी वाट चालू लागलो की हे चक्रपाणी मला केव्हा भेटशील? ‘चक्रपाणी’ म्हणजे सुदर्शनचक्र हातात घेतलेला भगवंत. तर हे सद्गुरो, तुझ्या सांगण्याप्रमाणे मी जेव्हा वागू लागेन तेव्हाच तू सुदर्शनधारी होऊन मला भेट देशील ना? जेव्हा साधक प्रामाणिकपणे सद्गुरूबोधानुसार वाटचाल करू लागतो, तेव्हा जगाच्या खऱ्या स्वरूपाचं खरं दर्शन त्याला होतं, आपल्या वाटय़ाला आलेल्या दु:खांचं खरं रूप त्याला उमगतं. आणि एकदा अशाश्वतता हा जगाचा स्थायीभाव उमगला की जे शाश्वत आहे ते स्पष्टपणे जाणवू लागतं. हे खरं दर्शन! हे दर्शन अखंड टिकावं, हीच भक्ताची आवड आहे आणि त्यासाठी हे सद्गुरो तूच सारी प्रक्रिया वेगानं पार पाड, अशी त्याची प्रार्थना आहे.

चैतन्य प्रेम chaitanyprem@gmail.com