डॉ. कमल राजे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्यातील ‘नोबेल’च्या मानकरी, कॅनेडियन कथालेखिका ॲलिस मन्रो अलीकडेच (१४ मे) निवर्तल्या आणि कथाप्रेमी जग हळहळले… एवढे काय होते त्यांच्या कथांमध्ये?

‘रॉयल बीटिंग’ नावाची एक कथा. ॲलिस मन्रो यांना कॅनडापलीकडे सर्व खंडांत पोहोचवणारी. १९७७ सालातील मार्च महिन्यात न्यूयॉर्कर साप्ताहिकामध्ये ती आली आणि ॲलिस मन्रो हे नाव कथांसाठी गाजायला सुरुवात झाली. एवढे काय होते त्या कथेत?

न्यूयॉर्करच्या वाचकांना लेखिकांचे अथवा स्त्रीवादी लेखकांच्या कथांचे वावडे नव्हते. मात्र ‘रॉयल बीटिंग’सारखी अजबरसायनी कथा वाचून त्यांना कथामांडणीचा भलताच आविष्कार अनुभवल्याची स्थिती झाली. कॅनडातील हॅनराटी या मन्रो यांच्या काल्पनिक प्रांतातील बकाल वस्तीमधील एका किराणा दुकानाच्या मागील भागात राहणाऱ्या कुटुंबाची ही गोष्ट. या किराणा दुकानाबाहेर फळकुटावर बसलेली गावगप्पिष्ट मंडळी कथेच्या सुरुवातीलाच भेटतात. त्यातील बहुतांश कारखान्यात घातक रसायनांमध्ये, यंत्रांसोबत काम करून जर्जरावस्थेला पोहोचलेली. त्यांचे उरलेले आयुष्य मुली आणि बायांची निंदा-नालस्ती आणि वखवखल्या नजरेने त्यांचे शोषण करण्यात व्यतीत होते. पुढल्या काही परिच्छेदांत या गावात राहणाऱ्या व्यक्तींचा आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक स्तर यांचा विस्तृत तपशील सांगितला जातो. आता हे तपशील वाचू लागताना मुंबईतील ऐंशीच्या दरम्यानची कामगार वस्ती, उपनगरांतील झोपडपट्ट्या, राज्यातील किंवा देशात पाहिलेल्या रासायनिक उद्याोगपट्ट्यांभोवताली जगणारे लोकजीवन समोर येऊ शकेल, ही मन्रो यांच्या लिखाणातील शक्ती.

फ्लो ही या कथेमधली सावत्र आई. रोझ नावाची तिची १४ वर्षांची मुलगी वडिलांच्या माराच्या स्वरूपाला ‘रॉयल बीटिंग’ संकल्पनेमध्ये परावर्तित करताना दिसते. रोझच्या आईचा मृत्यू, फ्लो आणि रोझचा सावत्र भाऊ ब्रायन यांच्यापेक्षा घरकाम्या पुरुषाचे एकुणातच घरातील वर्चस्व, फ्लोच्या रोझबाबतच्या अपेक्षा आणि त्यांच्या अपूर्तींमुळे वडिलांचा उभा केला जाणारा धाक यातून ही कथा पुढे सरकते.

हे सुरू असताना कथा मध्येच गावातल्या खाटकाच्या पोलिओ झालेल्या मुलीची माहिती द्यायला लागते. या विरूप-विद्रूप आणि ठेंगण्या मुलीचा बाप तिला तिच्या विचित्र असण्यावरून कसा घरात डांबून ठेचून काढतो याबाबत सांगितले जाते. वयाने रोझएवढी नसली, तरी मारहाणीच्या दृष्टीने एकरूप असलेल्या विद्रूप मुलीचा ट्रॅक संपून गोष्ट रोझच्या घरातील ताण्याबाण्यांकडे पाहायला लागते.

हेही वाचा >>> बुकमार्क : अनुरागाचा संस्कृत स्वर…

पट्टीच्या कथा वाचणाऱ्यांनाही अशी कथा आपण कधीच वाचली नसल्याचा अनुभव येतो. निवेदनाच्या रूढ वाटांमध्ये अडकून न राहता गोष्ट प्रवाही होत जाते. त्यातल्या प्रदीर्घतेने दमछाक होत नाही, किंवा कोणताही भाग अतिरिक्त वाटत नाही. आपल्या भोवतालचे गबाळेपण, लोकांचे पोलियोसारख्या आजाराचीही माहिती नसलेले अज्ञान आणि घरात फ्लो आणि रोझ यांच्यामधील तणावस्थितीचे अद्भुत वर्णन कथेमध्ये केले जाते.

‘रॉयल बीटिंग’चे वैशिष्ट्य हे की अमेरिकी जगाचे लक्ष अॅलिस मन्रो यांच्यावर रोखण्यास ती कारणीभूत ठरली. तोवर कॅनडामधील कथालेखकांनी उभ्या केलेल्या कॅनडाशी मन्रो यांचे जग पूर्णपणे भिन्न होते. न्यूयॉर्करमधील कथा रिचविणाऱ्या कथापंडितांनाही या कथेचा सुरुवात-मध्य आणि शेवट भारावून टाकणारा होता. न्यूयॉर्करने या कथेच्या प्रसिद्धीनंतर मन्रो यांच्याशी एक करार केला. त्यानुसार त्यांनी लिहिलेली कोणतीही नवी कथा पहिल्यांदा न्यूयॉर्करकडे पाठविली जाईल आणि त्यांना ती पसंत पडली नाही, तरच इतरत्र छापण्यास परत करण्यात येईल. मात्र पुढे न्यूयॉर्करला त्यांच्याकडून आलेली कुठलीही कथा परत पाठवावी लागली नाही, इतका त्यांचा दर्जा वधारला.

कथेसाठी आणि फक्त आयुष्यभर कथालेखन केले, म्हणून नोबेल पुरस्कार मिळविणाऱ्या अॅलिस मन्रो या एकमेव असतील. कॅनडाच्या या कथालेखिकेने साठोत्तरीच्या बंडखोर युगातील, ऐंशीच्या भरकटलेल्या प्रवाहातील आणि दोन हजारोत्तर काळातील चमकदार लेखक आघाड्यांमध्ये आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कथापताका मिरविल्या. त्यांच्या सुरुवातीच्या गोष्टींपासून अगदी अलीकडच्या प्रकाशित लेखनामध्ये आपल्या देशातील छोटी उपनगरे, शहरगावे आणि खेड्यांचा समावेश आहे. त्यांच्या कथांमध्ये स्त्रिया, तरुणी आणि लहान मुली मुख्य व्यक्तिरेखांमध्ये असल्या, तरी त्यांना स्त्रीवादी कक्षेत बसवता येत नाही. या कथा व्यक्ती, स्थळांच्या प्रदीर्घ वर्णनांतून घटनांचे लख्ख चित्र उभे करतात आणि वाचकाला ४० ते ७० पानांच्या ऐवजात खिळवून ठेवतात. लेखनाच्या रचनेत त्यांनी केलेल्या अद्भुत प्रयोगांमुळे कॅनडाचा गेल्या १५० वर्षांचा इतिहास-भूगोल आणि सांस्कृतिक परिसर कथाबद्ध झाला.

मन्रो यांचे वडील लोकरीसाठी ??? कोल्हेपालनाचा व्यवसाय करणारे, तर आई शिक्षिका. लहानपणी परिकथेची मोडतोड करून आपल्याला हवा तो शेवट असलेली कथा तयार करण्याची आठवण त्यांनी अनेक मुलाखतींमधून सांगितली आहे. कॅनडाच्या ज्या भागात ते राहत, तेथून शाळा आणि शहर या दोन्ही गोष्टी दूर होत्या. शाळेचा दूरवरचा प्रवास चालत करताना कथा रचण्याची प्रक्रिया त्यांनी आपसूक सिद्ध केली असावी. कारण ‘डान्स ऑफ द हॅपी शेड्स’ या पहिल्या कथासंग्रहातील सर्वच कथांमध्ये त्यांच्या लहानपणापासून ते तारुण्यापर्यंतचा प्रवास डोकावलेला दिसतो. विद्यार्थिदशेत असतानाच त्यांची ‘द डायमेन्शन्स ऑफ द शॅडो’ ही पहिली कथा १९५० साली प्रसिद्ध झाली होती. पुढे शिष्यवृत्ती मिळवत शिक्षण पूर्ण करून पत्रकारितेमध्ये पदवी घेतलेल्या अॅलिस मन्रो यांनी आपल्यासमवेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यासोबत विवाह केला आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या शिरावर पडल्या. यात साहित्य वाचन आणि किडुक-मिडुकीचे लेखन यांच्या आधारावर त्यांचे रोजच्या जगण्याचे निरीक्षण कागदावर उमटत होते. रशियन साहित्याचा अभ्यास केल्यामुळे तेथील चेकॉव्ह, टॉलस्टॉय यांच्यासह इतर लेखकांच्या रसदार तरी पाल्हाळिक लेखनशैलीने मन्रो भारावून गेल्या होत्या. १९५० ते ६० या दशकामध्ये ‘टॅमरॅक रिव्ह्यू’, ‘मॉण्ट्रेलिअर’, ‘कॅनडिअन फोरम’ अशा आज हयातही नसलेल्या काही मासिकांमध्ये मन्रो यांच्या सुरुवातीच्या कथा प्रसिद्ध झाल्या. पण खरी ओळख तयार झाली ती न्यूयॉर्करमध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘रॉयल बीटिंग’ने.

तारुण्यातील कैक अनुभवांवर, लग्नापूर्वी आणि नंतरच्या अनेक सरळ किंवा वाकड्या प्रसंगांवर त्यांनी या काळात कथा लिहिल्या. रॉयल बीटिंगइतकीच त्यांची ‘बेगर मेड’ नावाची कथा गाजली. या कथेमध्ये रॉयल बीटिंगमधल्या काळानंतरच्या रोझ आणि फ्लो येतात. रोझचे विद्यापीठातील शिष्यवृत्तीवरच्या शिक्षण काळातील प्रेम प्रकरण येते. रक्त विकून पैसे मिळविण्याचे आणि कॅफेमध्ये वेट्रेस म्हणून काम केल्याचे संदर्भ येतात. या सगळ्या गोष्टी मन्रो यांनी आपल्या विद्यार्थिदशेत केल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या आत्मानुभवांना एका लघुकादंबरीहून मोठ्या काल्पनिक बांधणीत त्यांनी मांडले. वास्तव आणि कल्पनेच्या कारागिरीची असामान्य कामगिरी या प्रदीर्घ कथेतून व्यक्त झाली. रुग्णालयाच्या प्रतीक्षागृहात अडकलेल्या तरुणी, करिअरसाठी कुटुंबापासून दुरावलेल्या, प्रचंड एकटेपणा अंगावर आलेल्या, प्रेमासाठी पराकोटीचे एकरूप राहणाऱ्या… अशा अनेकविध स्त्री- व्यक्तिरेखा मन्रो यांच्या कथांमध्ये सापडतात.

मन्रो यांनी या सगळ्या लेखन व्यवहाराला काल्पनिक म्हणून संबोधले असले, तरी त्यातील साऱ्याच बारकाव्यांना रोजनिशीसारखे स्वरूप आहे. आपला कोणताही छोटासा अनुभव कथारूपात मांडण्याची सिद्धी मन्रो यांना होती. ती कशी आणि किती, हे या कथेतून कळू शकेल.

विद्यापीठाच्या वाचनालयात त्यांनी केलेल्या कामाचा अनुभव, पत्रकारिता करून वृत्तपत्रात काम करण्याचा त्यांना दिला गेलेला सल्ला, शनिवारी संध्याकाळी विद्यापीठाच्या मैदानात फुटबॉलचे सामने होत असल्याने वाचनालयातील सुस्त निवांत वातावरण यांचे त्यांनी अक्षरश: चित्रपटासारखे वर्णन केले आहे. रॉयल बीटिंग आणि ‘बेगर मेड’च्या प्रसिद्धीनंतर सर्वच आघाडीच्या अमेरिकी मासिकांमधून मन्रो यांच्या कथांसाठी लाल गालिचे पसरले गेले.

अंतोन चेकॉव्ह या रशियन लेखकाची ‘बोअरिंग स्टोरी’ नावाची एक गोष्ट आहे. प्रदीर्घ ७०-८० पाने चालणारी. शीर्षकातच गोष्ट कंटाळवाणी असल्याचे नमूद असले, तरी तिच्यात परिसराचे, पात्रांचे, पात्रांच्या वागण्याचे बारीक तपशील आहेत. इतक्या सूक्ष्म निरीक्षणातून ही कथा साकारली आहे, की कथा अंमळही कंटाळा आणत नाही. त्या कथेतील गुंतणे जराही थांबत नाही.

मन्रो यांच्या प्रत्येक प्रदीर्घ गोष्टीचा तोंडवळा आणि रचना चेकॉव्हच्या या गोष्टीशी समान भासणारा… उगाच नाही मन्रो यांना ‘कॅनडाच्या चेकॉव्ह’ असे बिरुद मिळाले. त्यांच्या सगळ्याच कथा प्रचंड मोठा काळ आणि परिसर व्यापतात. उदा. ‘लिव्हिंग मॅव्हरली’ ही गरीब घरातील मुलीची गोष्ट. तिला अल्पकाळासाठी सिनेमागृहात तिकीट तपासायची नोकरी करावी लागते. पण या असल्या नोकरीविरोधात बुरसटलेल्या विचारांच्या घरातून विरोध आणि बराच जाच लादला जातो. ‘द बेअर केम ओव्हर द माऊंटन’ ही एका वृद्ध जोडप्याची कथा. नवऱ्याला स्मृतिभ्रंश जडल्याने रंजक आणि भावस्पर्शी पातळ्यांवर घडते. ‘फॅमिली फर्निशिंग’ नावाच्या कथेत लेखिका म्हणून मन्रो यांच्यात विकसित झालेल्या अनेक टप्प्यांचा उल्लेख येतो. माफक विनोद, कधी तिरकस नाट्यमयता, उपहास, गांभीर्य, रहस्य आदी घटकांनिशी अॅलिस मन्रो यांची दरएक कथा उलगडत जाते. हरतऱ्हेच्या माणसांची, प्रवृत्तीची त्यांनी आपल्या कथेत दखल घेतली आहे. मन्रो यांच्या कथेने कॅनडाचा सारा भवताल आणि त्यातील माणसांची विविध रूपे मांडली. त्यांच्या समकालीन कॅनेडियन कादंबरीकार मार्गारेट अॅटवूड यांनी मन्रो यांच्या कथेचा खूप मोठा प्रचार केला आणि त्यांच्या कथा सर्वदूर पोहोचाव्यात यासाठी वेळोवेळी साहाय्य केले. मन्रो या केवळ कथा लिहून नोबेल मिळविणाऱ्या पहिल्या कॅनडियन लेखिका असल्यामुळे कथा या लेखन प्रकाराला कॅनडामध्ये अधिक वजन प्राप्त झाले. दोन-तीन डझनांहून अधिक कथाकेंद्रित मासिके, तेवढेच ताजे सक्रिय कथालेखक-लेखिका आणि या कथांना ओरपणारे खोऱ्यांनी अस्तित्वात असलेले वाचक ही कॅनडातील सुखदायी वाचनस्थिती केवळ अॅलिस मन्रो यांच्या कथालेखनामुळे येऊ शकली… ती त्यांच्या निधनानंतर कदाचित ओसरत जाईल, तेव्हा मोबाइल किंवा ‘एआय’ वगैरेला दोष देण्यात काय अर्थ आहे?

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Artcile about short story of nobel winning canadian author alice munro zws
Show comments