अत्यंत गंभीर मुद्दय़ांवर पक्षातीत विचारविनिमय होऊन मतैक्य घडून यावे आणि आर्थिक पेच टळावा, यासाठी प्रयत्न केल्याबद्दल एखाद्या मोठय़ा लोकशाही देशातील सभागृह नेत्याचीच हकालपट्टी होते, तेव्हा ते सभागृहच नव्हे तर संपूर्ण लोकशाही व्यवस्थाच विकारग्रस्त झाली आहे असे खुशाल समजावे. अशा प्रकारे एखाद्या पीठासीन अधिकाऱ्याची हकालपट्टी जेव्हा अमेरिकेसारख्या देशामध्ये होते, तेव्हा त्याचे परिणाम अमेरिकेपलीकडेही जाणवणारे असतात. अमेरिकी काँग्रेसमधील प्रतिनिधिगृहाचे सभापती केव्हिन मॅकार्थी यांना त्यांच्याच पक्षाच्या काही प्रतिनिधींनी पुढाकार घेऊन पदच्युत केले. मॅकार्थी हे रिपब्लिकन पक्षातले आदर्श नामदार नव्हेत. पण अमेरिकी प्रशासनासाठी नियत कर्जमर्यादा वाढवण्याचा मुद्दा असो वा अगदी अलीकडचा सरकारी कामकाज खर्चमंजुरीअभावी ठप्प पडण्याची संभाव्यता असो, मॅकार्थी यांना प्रतिनिधिगृहातील डेमोक्रॅट्स सदस्यांची मदत घ्यावी लागली आणि अनेकदा त्यासाठी अमेरिकेचे डेमोक्रॅटिक अध्यक्ष जो बायडेन यांच्याशी मसलतही करावी लागली. याचेच भांडवल रिपब्लिकन पक्षातील अतिउजव्या विचारसरणीचे प्रतिनिधी मॅट गेट्झ यांनी केले. वास्तविक दोन्ही पेचप्रसंगांमध्ये मॅकार्थी यांनी पक्षनिष्ठेऐवजी व्यावहारिक शहाणपणाला प्राधान्य दिले. शिवाय परवा त्यांनी खर्चमंजुरीविषयी तडजोड घडवून आणली, ती तात्पुरत्या स्वरूपाचीच आहे. म्हणजे नोव्हेंबर मध्यापर्यंत खर्चास मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा सभागृहात खर्चाबाबत नव्या तरतुदींना मंजुरी द्यावी लागेल. पण गंमत अशी, यासाठी डेमोक्रॅट्स सदस्यांबरोबर वाटाघाटी करेल अशी व्यक्ती- म्हणजे सभापती- कोण, हे अद्याप निश्चित झालेले नाही. म्हणजे गेट्झ यांच्यासह रिपब्लिकन पक्षाच्या ज्या आठ सदस्यांनी मॅकार्थी यांच्या गच्छंतीसाठी रान उठवले आणि अखेरीस आपले उद्दिष्ट साध्य केले त्यांच्याकडे मॅकार्थीना पर्यायी नाव उपलब्ध नाही. अमेरिकेच्या कलुषित आणि दुभंगलेल्या राजकीय हवेचे ताजी घटना ठसठशीत निदर्शक आहे.
जे काही घडले, ते अभूतपूर्व आहे. अमेरिकेच्या इतिहासात आजवर कधीही प्रतिनिधिगृहाच्या सभापतीविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल होऊन तो मंजूर झालेला नाही. पण गेल्या काही वर्षांमध्ये विशेषत: रिपब्लिकन नेत्यांच्या बाबतीत ‘अभूतपूर्व’ वगैरे काही शिल्लक राहिलेले नाही. कारण पक्षस्वार्थापलीकडे देशहित किंवा लोकशाहीच्या हिताकडे पाहण्याची अमेरिकेतील संस्कृती या मंडळींनी कधीच मोडून टाकली आहे. या नव्या विचारसरणीचे निर्माते आणि आश्रयदाते आहेत अर्थातच डोनाल्ड ट्रम्प. ट्रम्प यांच्यानुसार टोकाचे राजकारण केले, तर आणि तरच आपल्याला काही भवितव्य आहे, असे वाटणाऱ्यांची संख्या रिपब्लिकन पक्षात वाढू लागली आहे. किंबहुना ट्रम्प हेच आता अध्यक्षीय निवडणूक जिंकण्यास सक्षम उमेदवार पक्षात उरलेले आहेत, हा प्रचार बहुतांना खरा वाटू लागला आहे.
अमेरिकेची उदात्त आणि समावेशक लोकशाही व्यवस्था, स्थलांतरितांचे त्या देशाच्या उत्थानातील योगदान, जगातील सर्वात सक्षम अर्थव्यवस्था आणि सर्वशक्तिमान लष्करी सत्ता असल्याबद्दल येणाऱ्या जबाबदाऱ्या यांविषयी काडीचाही रस नसलेल्या आणि निव्वळ उद्दाम सत्ताकारणातच गती आणि मती असलेल्या काही टवाळांनी मॅकार्थी यांना त्यांनी केलेल्या तडजोडींबद्दल नको जीव करून सोडले होते. एका अर्थी मॅकार्थी हे स्वत:च या चक्रव्यूहात अडकत गेले. सर्वसंमती या मूल्याशी पूर्णत: प्रतारणा घेतलेल्या नि ‘हाऊस फ्रीडम कॉकस’ नामे गट म्हणून वावरणाऱ्या गेट्झ यांच्यासारख्या रिपब्लिकन सदस्यांमुळे मॅकार्थी यांची सभापतीपदी निवडही जिकिरीची ठरली होती. रिपब्लिकन बहुमत असलेल्या सभागृहात, रिपब्लिकनच सभापती निवडण्यासाठी १५ फेऱ्या घेतल्या गेल्या. अखेर मॅकार्थी यांच्या नावावर काही तडजोडींनंतर शिक्कामोर्तब झाले. यांतील एक तडजोड म्हणजे, कोणत्याही सदस्याला कोणत्याही मुद्दय़ावर मॅकार्थी यांच्या हकालपट्टीसाठी मतदानाची मागणी करण्याची मुभा! अखेर ही तरतूदच मॅकार्थी यांच्या पतनास कारणीभूत ठरली. यांतून काही रिपब्लिकन सदस्यांचे समाधान झाले, पण देश अडचणीत येण्याची शक्यता आहे. खर्चमंजुरीची मुदत नोव्हेंबरच्या मध्यावर संपुष्टात येईल. त्यापूर्वी नवीन सभापती नियुक्त व्हावा लागेल. परंतु अमेरिकेमध्ये तिसऱ्या सर्वात प्रभावी प्रशासकीय पदावरील- अध्यक्ष, उपाध्यक्ष व सेनेट सभापती यांच्यानंतर- व्यक्तीची ज्या प्रकारे हकालपट्टी पाहता रिपब्लिकन पक्षातीलच फार कोणी या पदावर काम करू धजणार नाही. बहुसंख्य रिपब्लिकनांनी मॅकार्थी यांच्या बाजूने मतदान केले, परंतु त्यांचा आवाज कडव्या मोजक्यांच्या तुलनेत क्षीण आहे. त्यांना जशी ट्रम्प संस्कृती मोडून काढता आली नाही, तशीच या संस्कृतीची नवी पिलावळही सहन करावी लागेल. मॅकार्थी यांची गच्छंती ही अमेरिकी राजकारणाची फजिती ठरते. तिची किती किंमत त्या देशाला आणि जगाला मोजावी लागेल, याचा हिशेब अजूनही करता येत नाही.