बुकर पारितोषिकासाठीची लघुयादी गुरुवारी जाहीर झाली. यादीतील पुस्तकांचा आशय, विषय, शैली भिन्न असली, तरीही एक साम्यस्थळ दिसते. जवळपास सर्व पुस्तके आजच्या प्रश्नांना वाचा फोडणारी आहेत. हवामान बदल, स्थलांतर, आर्थिक समस्या, अल्पसंख्याकांपुढील आव्हाने, टोकाच्या राजकीय भूमिका आणि घटत चाललेले स्वातंत्र्य अशा अनेक विषयांवर ही पुस्तके विचार आणि भूमिका मांडतात. शांततेच्या आणि प्रेमाच्या शोधात भटकणारी पात्रे या पुस्तकांतून भेटतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंदाच्या यादीत लंडनमधील भारतीय वंशाच्या लेखिका चेतना मारू यांच्या ‘वेस्टर्न लेन’ या पहिल्यावहिल्या कादंबरीचा समावेश असल्याचे कौतुक (त्या वंशापुरत्याच भारतीय असल्या तरी) भारतीय माध्यमांना आहे. त्याखेरीज सारा बर्नस्टीन यांची ‘स्टडी ऑफ ओबीडियन्स’, जोनाथन एस्कोफेरी यांची ‘इफ आय सव्‍‌र्हाइव्ह यू’, पॉल हार्डिग्ज यांची ‘द अदर ईडन’, पॉल लिन्च यांची ‘प्रॉफेट साँग’, पॉल मरे यांची ‘द बी स्टिंग’ या कादंबऱ्यांनाही लघुयादीत समावेश आहे.

हेही वाचा >>> राज्यकर्त्यांना मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचा विसर…

चेतना मारू यांची ‘वेस्टर्न लेन’ ही कादंबरी ब्रिटनमधील गुजराती समुदायाचे अनुभवविश्व वाचकांसमोर ठेवते. विषयात नवे काही दिसत नसले, तरीही ही कादंबरी बुकरच्या लघुयादीत पोहोचली, ती त्यात वापरलेल्या ‘स्क्वॉश’ या खेळाच्या रूपकामुळे. मानवी भावभावनांची आंदोलने स्कॉश बॉलच्या आवाजाची कंपने, प्रतिध्वनी, त्याचे जोरात आदळणे, त्यातून घुमणारा नाद इत्यादींच्या माध्यमातून मांडण्यात आली आहेत. ११ वर्षांची गोपी या कादंबरीची नायिका आहे. तिचे तिच्या कुटुंबीयांशी असलेले नाते, त्यातील वेदना यात लख्ख उमटल्या आहेत. मारू यांच्याच भाषेत सांगायचे, तर या कादंबरीचे वर्णन ‘क्रीडाविषयक कादंबरी’ असे करावे लागेल.

 बुकर पुरस्कारांच्या परीक्षक समितीतील कॅनेडियन-आफ्रिकी कादंबरीकार एसी एद्युजन यांच्या मते, ‘‘जागतिक साहित्याचा आवाका या लघुयादीत प्रतिबिंबित झाला आहे. साहित्य काय करू शकते, हे ही यादी दाखवून देते. बर्नस्टीन आणि हार्डिग्जच्या कादंबरीतील पात्रे स्थलांतरित आणि देशी यांतील संघर्ष मांडतात, तर एस्कोफेरी आणि मरे यांच्या कादंबऱ्यांतील किशोरवयीन आपल्या पालकांच्या चुकांतून धडा घेत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी धडपडताना दिसतात. मारू आणि लिन्च यांची पात्रे कौटुंबिक प्रश्न, त्यातील वेदना मांडतानाच सामाईक आनंदांचाही उल्लेख करतात.

हेही वाचा >>> वीज निर्मितीसाठीच्या पाणी, वाऱ्यावर राज्ये कर आकारू शकत नाहीत, कारण…

अर्थात प्रत्येकाचा प्रवास वेगळय़ा वाटेने जातो.’’ यादीतील पुस्तके आजच्या जगापुढील प्रश्न अधोरेखित करत असली, तरीही त्यांत आशावाद दिसतो, मानवता दिसते आणि काही ठिकाणी विनोदाचाही शिडकावा होतो.

विजेत्या कादंबरीकाराला पन्नास हजार ब्रिटिश पौंडांची रोकड देण्याचा सोहळा २६ नोव्हेंबर रोजी होईल तोवर ‘सहापैकी कोण?’ याची चर्चा कायम राहील!  ‘बुकर प्राइज फाउंडेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी गॅबी वुड यांच्या मते, ‘‘ही खऱ्या अर्थाने सीमांपलीकडची यादी आहे. यात भारतीय वंशाचे ब्रिटिश आहेत, जमैकन वंशाचे अमेरिकन आहेत आणि दोन आयरिश लेखकही आहेत.’’ हे लेखक बुकर लघुयादीसाठी नवे असले, तरीही त्यांच्या लेखनाची दखल याआधीही विविध ठिकाणी किंवा अन्य मार्गानी घेण्यात आली आहे.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian origin author chetna maroo s novel western lane shortlisted for booker prize zws