scorecardresearch

कुतूहल : उत्क्रांतीचा वेध घेणारे ‘इंडिका’

आजच्या आधुनिक काळात उपग्रह, जीपीएस या तंत्रज्ञानाचा शेती, पर्यावरण, भूविज्ञान, भौगोलिक इतिहासाच्या अभ्यासात मोठा वापर आहे.

कुतूहल : उत्क्रांतीचा वेध घेणारे ‘इंडिका’
कुतूहल : उत्क्रांतीचा वेध घेणारे ‘इंडिका’

आजच्या आधुनिक काळात उपग्रह, जीपीएस या तंत्रज्ञानाचा शेती, पर्यावरण, भूविज्ञान, भौगोलिक इतिहासाच्या अभ्यासात मोठा वापर आहे. क्रमिक पुस्तकांच्या पलीकडे पाहिले तर काही पुस्तके भूगोल, मानवी उत्क्रांती, जीवसृष्टीचा नैसर्गिक इतिहास या विषयातसुद्धा रस निर्माण करतात. त्यातलेच एक पुस्तक म्हणजे प्रणय लाल लिखित ‘इंडिका’ हे होय. हे पुस्तक १५ वेगवेगळय़ा प्रकरणांत विभागलेले आहे. या पुस्तकात भारतीय उपखंडाचा भूविज्ञानाच्या इतिहासाचा आढावा घेतला गेला आहे. पृथ्वीच्या निर्मितीपासून ते थेट आजच्या प्रगत होमो सेपियन मानवाच्या उत्क्रांतीपर्यंतचा आढावा यात आहे. पृथ्वी आणि चंद्राची सुरुवातीची दोन अब्ज वर्षे त्यावर सतत उल्काच आपटत होत्या. या उल्कापातामुळे पृथ्वीला हिरे, पाणी, सोने वगैरे अनेक खनिजे मिळाली. पुढे सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वी स्थिर झाली. वातावरणातील ऑक्सिजन वाढू लागला, सूर्याच्या अतिनिल किरणांमुळे ऑक्सिजनचे रूपांतर ओझोनमध्ये होऊ लागले आणि ओझोनमुळे परत सूर्याची अतिनिल किरणे अडू लागली. पृथ्वीभोवती ओझोन वाढल्यामुळे पृथ्वी थंड पडू लागली. ऑक्सिजन व कार्बन संयोग पावल्याने वातावरणात कार्बन डायऑक्साईड तयार होऊ लागला.

भारतीय उपखंडात एकपेशीय सजीव कसे तयार झाले? त्यांच्यापासून बहुपेशीय सजीवांची निर्मिती कशी झाली? जशी सागरात सजीवांची निर्मिती झाली, तशी जमिनीवर वनस्पतींची निर्मिती कशा प्रकारे झाली? भारतीय उपखंडातील सजीव-निर्जीवात झालेल्या उत्क्रांतीचा अभ्यास आपल्याला ‘इंडिका’त वाचायला मिळतो. काही अद्भुत गोष्टीही यात वाचायला मिळतात. उदा. आपल्याकडे कोणकोणत्या प्रकारचे मासे आढळत होते? कोणते मासे उत्क्रांतीत टिकले? कोणते कायमस्वरूपी नष्ट झाले? तर काही माशांमध्ये शारीरिक बदल कसे झाले? इत्यादी. शारीरिक बदल होऊन टिकलेल्या छोटय़ा माशांपैकी सेप्सेलुरस प्रजातींचे मासे मोठय़ा माशांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी पाण्यापासून चक्क काही फूट उंच उडू शकतात. लोब फिश प्रकारातील मासे मात्र आज जवळपास नष्ट झाले आहेत. भारतीय उपखंडातील जीवाष्म अभ्यास दाखवतो की, सूर्यस्नान करण्यामुळे मानेचे हाड व कवटी यांच्यातला सांधा बदलून तो लवचीक झाला आणि मान डावी-उजवीकडे वळवणे शक्य होऊ लागले. यामुळे भक्ष्य पकडणे, अन्न चावणे, गिळणे या क्रिया सजीवांमध्ये सोप्या होऊ लागल्या. ७०-८० अंश सेल्सियस तापमानातसुद्धा नेचेचे (फर्न) बी मातीआड तगून राहिले. उपखंडात वनांची निर्मिती करण्यात नेच्यांचा सिंहाचा वाटा आहे. भारतीय उपखंडाच्या भूविज्ञानाच्या संदर्भात अतिशय रंजक माहितीने ‘इंडिका’ हे पुस्तक भरलेले आहे, या पुस्तकाचा नंदा खरे यांनी केलेला मराठी अनुवादही उपलब्ध आहे.

अजिंक्य कुलकर्णी, मराठी विज्ञान परिषद

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या