अगदी मन लावून देशाच्या अर्थकारणाचा गाडा हाकणाऱ्या आपल्या निर्मलाताई खरंच खूप प्रामाणिक आहेत हो! पैसे नाहीत म्हणून लोकसभा लढणार नाही असे स्पष्ट सांगायची हिंमत त्यांनी दाखवली. काय म्हणता? पक्षाजवळ इतका पैसा असताना त्या असे कसे म्हणू शकतात? अरे बाबा, तो पक्षाचा पैसा आहे, त्यांचा नाही. भलेही त्यांच्या अखत्यारीत असलेल्या ईडी व आयकर खात्याने श्रीमंतांच्या दारावर टकटक केल्यावर रोख्याच्या माध्यमातून तो जमा झाला असेल. तसेही ताई विकासासाठी आवश्यक असलेल्या आकडय़ांची जुळवाजुळव करण्यात इतक्या गर्क असतात की त्यांनी निवडणूक रोख्याशी संबंधित एकही बातमी कदाचित वाचली नसेल. त्यामुळे स्वत:कडे पैसे नसले तरी पक्ष खर्च करू शकतो याची त्यांना कल्पना नसेल. तेव्हा त्यांच्या  प्रामाणिक विधानावर चर्वितचर्वण करण्याआधी या शक्यतांवर विचार करा.

देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियनकडे झेपावत असताना अर्थमंत्री इतक्या गरीब कशा, असले फालतू प्रश्न तर अजिबात नकोत. साधी राहणी व उच्च विचारसरणी हेच ताईंच्या आयुष्याचे ध्येय राहिले आहे. नेमके त्याचेच प्रतििबब त्यांच्या विधानातून उमटले. त्यामुळे इतरांना पोटशूळ उठण्याचे काही कारण नाही. त्यांच्या या विधानामुळे निवडणूक लढायला खूप पैसा लागतो हे सत्य अधोरेखित झाले, असा तर्क काढायचीही गरज नाही. हे वक्तव्य करताना त्यांच्यासमोर आयोगाने खर्चमर्यादेसाठी निश्चित केलेला ९५ लाख हाच आकडा होता. अगदी बालाजीची शपथ!

baba kalyani
अग्रलेख: तीन पिढय़ांचा तमाशा!
T M Krishna loksatta editorial Controversy over Karnataka singer t m krishnan awarded by Sangeet kalanidhi puraskar
अग्रलेख: अभिजाताची जात
loksatta editorial international labour organisation report youth unemployment In india
अग्रलेख: लाभांश लटकला!
Manmohan Singh
अग्रलेख: बडबड बहरातील मौनी!

  सलग दहा वर्षे केंद्रात मंत्री राहूनही त्या इतक्या गरीब कशा राहिल्या हा प्रश्नही निरर्थक आणि मंत्रीपद म्हणजे कमाईचे साधन या आजवर रुजलेल्या काँग्रेसी वृत्तीतून आलेला. नेमकी हीच वृत्ती बाद ठरवण्याचा प्रयत्न विश्वगुरूंनी सातत्याने केला. त्याचे फलित म्हणजे पदावर राहूनसुद्धा ताईंनी जपलेला प्रामाणिकपणा. त्यामुळे त्यांच्या विधानाचे स्वागत करायचे सोडून त्यावर नाक मुरडणारे देशद्रोहीच. पक्षाच्या तिजोरीत साडेसहा हजार कोटी जमा झाल्याची गोष्ट देशभर झाली असताना त्यांनी पैसे नाहीत म्हणून लढत नाही असे म्हणणे म्हणजे पक्षाची नाचक्कीच असे अजब तर्कट मांडणाऱ्यांचा तर त्रिवार निषेध! पैसा आहे म्हणून तो उधळायचा थोडाच असतो? एकदा तिजोरीत गेला की तो ‘अचल’. निवडणुका वगैरे ‘चल’ स्वरूपाच्या. त्यामुळे ताईंनी पक्षाला अडचणीत आणले वगैरे काही नाही.

   इतकी वर्षे राजकारणात राहूनसुद्धा त्यांना जनाधार निर्माण करता आला नाही. लोकांचे प्रेम मिळवत एखादा मतदारसंघ बांधता आला नाही. जनतेचा पाठिंबा मिळवता आला नाही. त्यासाठी लोकांमध्ये मिसळावे लागते, तेही त्यांनी केले नाही अशी नकारात्मक मांडणी तर नकोच. एकीकडे हे केले नाही व दुसरीकडे त्या पैसे नसल्याचा आव आणत आहेत हेसुद्धा चूक. देशसेवेत व्यस्त राहिल्यामुळे त्यांना जनतेचा पाठिंबा व सनदशीर मार्गाने पैसा कमावण्यासाठी वेळच मिळाला नाही हेच खरे. त्यामुळे सरकारची प्रतिमा आणखी उजळ करणाऱ्या त्यांच्या या वक्तव्याचे सर्वानी समर्थन करायला हवे.