वैराग्य, साधना, संन्यास यांची खिल्ली अनेकजण उडवितात. साधकाच्या मनातही प्रारंभिक टप्प्यावर कधी कधी उलटसुलट विचारांचं वारं अधेमधे वाहतं. या टीकात्मक सूर आळवत असलेल्या विचारांची माहिती स्वत: योगेश्वर कृष्ण आपला परम सखा उद्धवाला करून देत आहेत. ‘एकनाथी भागवता’च्या दहाव्या अध्यायात हा संवाद आहे. हा विरोधी सूर कसा असतो? एकनाथ महाराज लिहितात, ‘‘सृष्टि प्रवाहरूपें नित्य। पितृपुत्रत्वें अखंड वाहत। कर्मास्तव यातायात। सृष्टि अनित्य हें न घडे॥३९९॥ नित्यासी ईश्वरु कर्ता। हेंही न घडे गा तत्त्वतां। नित्याचा कोण नव्हे कर्ता। ईश्वरु सर्वथा येथ नाही॥४००॥’’ सृष्टीचा प्रवाह नित्य सुरू आहे. माता-पिता आणि पुत्र-पुत्री अशी जन्मपरंपरा सुरू ठेवणारी साखळीही नित्य आहे. कर्माचा प्रवाहही अव्याहत सुरू आहे. मग जे नित्य आहे, त्याचा कर्ता कोण आणि कसा असेल? त्यामुळे ईश्वर तर कर्ता नाहीच, पण मुळात ईश्वर म्हणूनही कुणी वा काही नाहीच, असं हे स्व-मताभिमानी मानतात. मग इंद्रियांद्वारे मिळणारं सुख जवळ असताना, जे सहज आवाक्यातलं भासतही नाही, अशा परमसुखाच्या शोधामागे धावण्यात काय अर्थ, असा सवाल ते करतात. (इंद्रिय सुखेंवीण सुख। मोक्ष म्हणती ते अविवेक। इंद्रियद्वारा जीवांसी हरिख। भोगितांही मूर्ख न मानिती॥४०४॥). अहो, इंद्रियांशिवाय सुखभोग शक्य आहे का? मग इंद्रियसुखाला कवडीमोल ठरविणारं मोक्षसुख विश्वसनीय तरी आहे का? इंद्रियांवाटे सुख भोगताना जीव सुखावत असताना ते सुखच जे मिथ्या आणि त्याज्य ठरवितात, तेच मूर्ख आहेत, असा हा युक्तिवाद. अहो डोळे फोडून खरं दृष्टिसुख मिळेल, हे म्हणण्यासारखं हे हास्यास्पद आहे! (जीवासी जेणें सुखप्राप्ती। ते इंद्रियेंचि नाहीं म्हणती। डोळे फोडूनि देखणे होती। तसी वदंती वेदांत्यां॥४०६॥). बरं, साधनेचं फळ देत असलेल्या ईश्वराचं खरं आणि नेमकं नाव-गावसुद्धा कुणाला सांगता येत नाही आणि त्या मिथ्या ईश्वराची आस मनात धरून कर्माबद्दल उदासीन करणारं किंवा कर्मच सोडायला लावणारं ‘ज्ञान’ तरी काय कामाचं? (गांव ठावो ना पदवी। तो मिथ्या ईश्वरु धरोनि जीवीं। कर्मफळीं नराश्य करवी। अथवा सांडवी कर्मातें॥४०८॥). एखाद्या झाडाचं फळ झाडाच्या मुळांवरच उठलं, तर त्याला काय म्हणावं? तसं मनुष्य देहाच्या आधारानं ‘ज्ञान’ कमवावं आणि त्या ‘ज्ञाना’नं देहाचाच नाश केला, तर त्या ‘ज्ञाना’ला काय म्हणावं? त्या ज्ञानाचा परिपाक काय, तर म्हणे सगळा संसारच ओसरतो! जे नित्य आहे ते कसं काय ओसरेल? मनुष्याच्या हृदयातल्या ज्ञानानं संसाराचं निर्दालन होतं, हे म्हणणं म्हणजे काजव्यानं आपल्या तेजानं सूर्याला जाळून टाकलं म्हणण्यासारखं आहे! (नरदेहीं ज्ञान उपजलें। तेणें देहचि नाशिलें। फळें वृक्षमूल छेदिलें। कोणीं देखिलें कोठेंही॥४०९॥ ज्ञानाचे परिपाकदशें। म्हणती अवघा संसारुचि नाशे। सृष्टि प्रवाहरुपें नित्य असे। नित्य नासे कैसेनि॥४१०॥ मनुष्याचें हृदयींचें ज्ञान। तेणें संसाराचें निर्दळण। तरी खद्योततेजें जाळिले जाण। ग्रहगण शशी सूर्य॥४११॥). त्यामुळे, निवृत्तीनं नव्हे, तर इंद्रियांनी प्रवृत्त होऊनच जीवाला सुखप्राप्ती शक्य आहे, हे नमूद करत ते म्हणतात की, ‘‘यालागीं निवृत्ति ते वृथा कष्ट। सर्वासी प्रवृत्तिच अतिश्रेष्ठ। कर्मे करोनियां उद्भट। फळें वरिष्ठ भोगावीं॥४१३॥’’ अर्थात, निवृत्ती म्हणजे वृथा कष्ट आहेत. त्यापेक्षा प्रवृत्तीच श्रेष्ठ असून कर्माचा धडाका लावून उत्तम सुखफळे भोगा, असा त्यांचा घोष असतो. – चैतन्य प्रेम