चैतन्य प्रेम

जे काही आपल्याकडून घडत आहे, होत आहे त्यात त्या परमतत्त्वाचंच स्मरण अविरत असल्यानं ते त्याचंच भजन आहे, हे कवि सांगतो. नंतर ‘कायेन वाचा’ हा जो श्लोक आहे त्या अनुषंगानं तो म्हणतो की, ‘‘ये श्लोकींचें व्याख्यान। पहिलें मानसिक अर्पण। पाठीं इंद्रियें बुद्धि अभिमान। कायिक जाण श्लोकान्वयें।।३४९।।’’ याचा अर्थ असा की, ‘या श्लोकाच्या व्याख्यानात प्रथमत: मानसिक कर्माचे अर्पण सांगितले असून मागाहून इंद्रिये, बुद्धी, अहंकार इत्यादिकांच्या कर्माचे आणि शेवटी कायिक कर्माचे अर्पण असे श्लोकान्वयानुसार सांगितले आहे.’’ पुढच्या ३५०व्या ओवीत सांगतात की, ‘‘भागवतधर्माची निजस्थिती। मन बुद्धि चित्त अहंकृती। आदिकरूनि इंद्रियवृत्ती। भगवंतीं अर्पिती तें ऐक।।३५०।।’’ म्हणजे, ‘भागवतधर्माची खरी स्थिती म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकृती आदिकरून इंद्रियवृत्ती आहेत त्या सर्व भगवंताला अर्पण करणे हे होय!’ आता या दोन्ही ओव्यांचा अर्थ पाहिला, तर लक्षात येईल की यात मनालाच अग्रस्थान आहे. विशेष म्हणजे मानसिक अर्पण प्रथम सांगितलं आहे, मग इंद्रियबुद्धीचं अर्पण आहे आणि अखेरीस कायिक कर्माचं अर्पण आहे. म्हणजे मन आणि इंद्रियबुद्धी दोन्ही सूक्ष्म असल्या, तरी त्यात किंचित अंतर आहे! कारण मनाचा प्रांत नुसता सूक्ष्माचा नाही, तर सुप्त-अज्ञात असाही आहे. त्या सुप्त मनातून कोणत्या इच्छा कधी उत्पन्न होतील, हे आपल्याला सांगताही येत नाही. तेव्हा प्रथम सूक्ष्म इच्छांचं अर्पण आहे, मग इंद्रियजाणिवेच्या पातळीवरील त्या इच्छांच्या विकसनाचं अर्पण आहे आणि मग अखेरीस ज्या देहाच्या आधारावर आपण इच्छापूर्तीसाठी कर्मरत राहतो त्या देहजाणिवांचं अर्पण आहे. म्हणजे देह आणि मनाच्याही सुखापलीकडे अस्पर्श असा प्रांत आहे ज्यात अखंड सुख व्याप्त आहे, त्या अखंड सुखाचा शोध घेण्यासाठी देह-मन आणि इंद्रियवृत्तीच्या परीघाबाहेर पडावं लागेल. मग या देह-मन आणि इंद्रियवृत्तीतून होणारं प्रत्येक कर्म हे भगवंताच्या स्मरणात घडत जाईल. नव्हे, प्रत्येक कर्म हे जणू भगवंताकडूनच होत जाईल, हाच भागवतधर्म आहे. आता तो कसा साधतो, हे कवि सांगत आहे. त्यासाठी तो एक मार्मिक रूपक वापरतो. तो म्हणतो, ‘‘दीपु लाविजे गृहाभीतरीं। तोचि प्रकाशे गवाक्षद्वारीं। तेवीं मनीं प्रगटला श्रीहरी। तोचि इंद्रियांतरीं भजनानंदु।।३६२।।’’ घरात दिवा लावला की त्याचा प्रकाश जसा खिडक्या-दारांतून बाहेर पडतो त्याप्रमाणे मन जेव्हा श्रीहरीच्या भावनेनं, कल्पनेनं, विचारानं, स्मरणानं पूर्ण भरून जातं तेव्हा त्या देहाच्या इंद्रियांकडून जे जे व्यवहार घडतात त्यातून भगवंतप्रेमच पाझरत असतं. मग प्रत्येक इंद्रिय कसं जगओढीतून अलिप्त राहतं आणि त्या इंद्रियाद्वारे होणारा जो व्यवहार आहे तो कसा भगवंताचा स्मरणयज्ञच ठरतो, ते सांगितलं आहे. कवि सांगतो, ‘‘जंव दृष्टि देखे दृश्यातें। तंव देवोचि दिसे तेथें। यापरी दृश्यदर्शनातें। अर्पी भजनसत्तें दृष्टीचा विषयो।।३६४।।’’ म्हणजे, दृष्टी जेव्हा जगातला दृश्य पदार्थ पहाते, तेव्हा तिला तिथं भगवंतावाचून काही दिसतच नाही. याप्रमाणे भजनसत्तेनं दृश्यदर्शनासह दृष्टीचा विषय भगवंतालाच अर्पण होतो. आता ही स्थिती फार व्यापक आहे, मोठी आहे आणि तिची कल्पनाही आपल्याला करवत नसल्यानं ती अशक्यप्राय आणि अवास्तवही वाटते. पण तरीही सर्वच साधूसंतांनी या अभेददर्शनाचं वर्णन केलं आहे.