चैतन्य प्रेम

मनुष्यजन्माचं खरं ध्येय काय, याची जाण नाही. आध्यात्मिक सोडा, भौतिकातदेखील ध्येयनिश्चिती दृढ नाही. मग अज्ञान, भ्रम, मोह, आसक्ती यांतच अनंत जन्मं सरत असतात. मनुष्यदेह हा साधनेसाठी लाभला आहे आणि आत्मस्वरूपाची ओळख हे या जन्माचं एकमात्र ध्येय आहे, हे साधुसंत उच्चरवानं सांगत असतात; पण त्याची जाण होत नाही. ‘एकनाथी भागवता’त सातव्या अध्यायात एकनाथ महाराज सांगतात, ‘‘एक नेणोनि नरदेहा मुकले। एकीं नव्हे म्हणोनि उपेक्षिले। एक ज्ञानगर्वे गिळिले। एक भुलले विषयार्थी।।२३२।।’’ या जन्माचा खरा लाभ कोणता, मनुष्यजन्माला येऊन खरं काय साधायचं असतं, हेच जन्मभर न कळल्यानं अनेक जण त्या लाभाला मुकले. तर.. या जगात ईश्वर नाहीच, आत्मा-परमात्मा हे सगळं खोटं आहे, अध्यात्म म्हणजे निव्वळ थोतांड आहे, या नास्तिकभावानं अनेक जण या लाभापासून वंचित राहिले. अनेक जण तर आपल्याला आत्मज्ञान झालंच आहे, या ज्ञानभ्रमानं शुद्ध लाभापासून घरंगळले. तर अनेक जण देहसुखाच्या नादात विषयांना भुलून गुंतले आणि या परम लाभाच्या जवळपास फिरकलेही नाहीत! मग म्हणतात, ‘‘एक साधनाभिमानें ठकिले। एक करूं करूं म्हणता गेले। एक करितां अव्हाटां भरले। करणें ठेलें तसेंचि।।२३३।।’’ अनेक जण थोडी साधना होताच साधकपणाच्या अभिमानानं फसले. ‘‘साधनेची काय घाई आहे? म्हातारपणी करू की!’’ या भ्रमात अनेक जण रुतले. ‘पुढे करू’ म्हटलं की तो ‘उद्या’ कधी ‘आज आणि आत्ता’ होतच नाही. त्यामुळे ‘नंतर करू’ म्हणणारे साधना न करताच प्राणांस मुकले. काहींनी साधना तर सुरू केली, पण मधेच सिद्धी मोहाच्या आडवाटेला लागून वाहवत गेले. जे खरं करायचं, साधायचं ते जिथल्या तिथंच राहिलं. तेव्हा काय करायला पाहिजे, हे नुसतं कळून उपयोग नाही. आपल्यालाही कळतंच की, नामच अखेरीस बरोबर येणार आहे तेव्हा तेच घेतलं पाहिजे! पण हे कळलं म्हणून नामाला घट्ट पकडतो का आपण? जगाला जितकं मनानं घट्ट पकडलं आहे, चिंता-काळजीला जितकं घट्ट पकडलं आहे, तितकं नामाला दृढ पकडलं आहे का? नाही! पण माहिती तोंडपाठ आहे की, जग आज ना उद्या सोडावंच लागणार, तेव्हा शरीर धडधाकट आहे तोवर ते साधनेसाठी राबवलं पाहिजे; पण हे ज्ञान आचरणात येतच नाही. मग काय लाभ? नाथ महाराज म्हणतात, ‘‘जरी विवेक कळला मना। तरी न तुटती विषयवासना।’’ मनाला विवेक कळला, पण तेवढय़ानं विषयमोह सुटत नाही! तेव्हा असा माणूस स्वबळावर काही करू शकत नाही, स्वतच स्वतचा गुरू होऊ शकत नाही. नाथ महाराज म्हणतात, ‘‘सविवेक वैराग्य असे ज्यासी। तोचि आपुला गुरु आपणासी। विशेषेंसी जाणावा।।’’ ज्याच्या विवेकाला वैराग्याची जोड असते, म्हणजे ज्याचं ज्ञान केवळ मुखातून नाही, तर आचरणातूनही प्रकटतं, तोच स्वतचा मार्गदर्शक गुरू होऊ शकतो. त्यालाच चराचरातील, प्रत्येक वस्तुमात्रातील सद्गुण उमगू शकतात; त्यांच्यापासून कोणती प्रेरणा ग्रहण करायची आणि त्यायोगे आचरणाला वळण कसं द्यायचं, हे त्यालाच समजू शकतं. अवधूताला त्याच स्थितीत या चराचरातील गुरुतत्त्वाचा प्रत्यय येत गेला. कारण गुरूशिवाय यथार्थ ज्ञान नाही; यथार्थ ज्ञानाशिवाय जगण्यातील अज्ञानाचा निरास नाही; अज्ञानाचा पडदा दूर झाल्याशिवाय आत्मज्ञान नाही आणि आत्मज्ञान झाल्याशिवाय खरी जीवनमुक्ती नाही!