अत्यंत सूक्ष्म अशी कामनासक्ती व कामासक्ती अहंभावाचं पोषण करत असते. साधकाचा सात्त्विक भाव वाढू लागताच, तीच कामनासक्ती अलगद सत्भावाचा मुखवटा धारण करीत करुणा, प्रेम, संवेदना, सद्भाव, वात्सल्यभाव धारण करते. या भावांचा आधार घेत साधक जगावर प्रेम करू लागतो. पण प्रत्यक्षात तो त्याला भावनिक सुखाचा आधार भासणाऱ्या, जगातील निवडक लोकांवरच प्रेम करतो. त्या प्रेमाला सात्त्विकतेचा मुलामा देत आपल्या सूक्ष्म कामनांचीच पूर्ती करीत राहतो. पण ही गोष्ट साधकाच्या पटकन लक्षातही येत नाही. त्यामुळे साधकानं आपल्या अंतरंगाचं सतत सूक्ष्म निरीक्षण केलं पाहिजे. आपल्या मनात आपले आप्त, जगातील लोक आणि सहसाधक यांच्याविषयी वेळोवेळी ज्या भावना उद्भवतात, त्याकडेही तटस्थपणे पाहता आलं पाहिजे. त्यात भावनिक परावलंबित्व आहे का, हे पाहिलं पाहिजे. त्या अवलंबातून मोह, दुराग्रह, आसक्त भाव झिरपत आहे का, याची तपासणी केली पाहिजे. कारण अंत:करणातली सूक्ष्म आसक्ती जोवर संपणार नाही, तोवर साधक गटांगळ्याच खाणार. त्याला खरी जीवन्मुक्ती साधणं शक्य नाही. त्या अनुषंगानं स्वामी यतीश्वरानंद यांची विधानं आपण पाहिली. त्यात ते म्हणतात की, ‘‘लैंगिक उद्दीपन केवळ एखाद्या स्थूल रूपातच होते असे नव्हे. सूक्ष्म आकर्षण व सूक्ष्म रूपातील उद्दीपन हे स्थूल रूपांपेक्षाही भयंकर असते. नवशिक्या साधकांना हे सूक्ष्म उद्दीपन सहजपणे ओळखता येत नाही.’’ तर.. एखाद्यावर मनानं अवलंबणं सुरू झालं, तर त्यात सूक्ष्म आकर्षण असू शकतं. ते आकर्षण देहाचंच असलं पाहिजे, असं नव्हे. ते व्यक्तित्वाचं असू शकतं, जीवनशैलीचं असू शकतं, सुबत्तेचं असू शकतं. तेव्हा असा कोणता भाव मनात सूक्ष्मपणे वावरतो, याची छाननी साधकाला करता आली पाहिजे. आपल्याला आधार एका शाश्वताचाच वाटला पाहिजे. तसं घडणं सोपं मात्र नसतं. कारण अगदी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे, माणूस हा भावनाशील प्राणी आहे. त्याच्या जगण्यात भावनेला स्थान आहेच. पण साधकजीवनात सामान्य भावनेचं दिव्य भावनेत रूपांतर साधलंच पाहिजे ना? स्वामी यतीश्वरानंदही सांगतात की, ‘‘आध्यात्मिक जीवन हे सामाजिक नीतिमत्तेपेक्षा काहीतरी अधिक आहे आणि ज्याला सामान्य लोक साधारणत: चांगले जीवन म्हणतात, त्यापेक्षाही उच्च आहे. त्यासाठी खूप आत्मसंयमाची आणि पावित्र्याची गरज आहे. (‘ध्यान आणि आध्यात्मिक जीवन’, पृ. १९१)’’ आता आपण प्रत्यक्ष वस्तुस्थितीपेक्षा शब्दांना अधिक घाबरतो किंवा शब्दांनी अधिक भयभीत होतो! आत्मसंयम, पावित्र्य, दिव्यत्व हे असे शब्द आहेत! पण मागेच म्हटलं ना? माणसाच्या भावना कितीही अनिवार आणि नैसर्गिक, स्वाभाविक असल्या, तरी आधुनिक समाजाचे सगळे कायदेदेखील व्यक्तीकडून ‘आत्मसंयमा’चीच तर अपेक्षा करतात! मग शब्दांनी का घाबरावं? बरं, आध्यात्मिक जीवन आपण पत्करलं असेल, तर त्यासाठी आवश्यक ती घडण साधताना आपण आपल्या मनाला, देहाला वळण लावूच की! त्यात कधी यश येईल, कधी अपयश येईल. हरकत काय आहे? एखादा मुलगा वैद्यकीय शाखा निवडतो. मग त्या अभ्यासासाठी तो आधीच्या सवयींना मुरड घालतोच ना? नवीन गोष्टी, नवी बंधनं, नवे नियम, नव्या सवयी तो स्वीकारतोच ना? तीच गोष्ट आध्यात्मिक जीवन स्वीकारतानाची आहे.

– चैतन्य प्रेम