चैतन्य प्रेम

गणपतीमुनी रमण महर्षीना एक मोठा सूक्ष्म प्रश्न विचारतात, तो असा की, ‘‘हे नाथ! समाजाच्या कल्याणासाठी शांती आवश्यक आहे की शक्ती?’’ या प्रश्नाचे पडसाद आपल्याही मनात उमटतात. आपल्यालाही वाटतं की, समाजात शांतीला अग्रक्रम आहे की शक्तीला? शक्ती नसेल तर शांती टिकेल का? आणि शांती नसेल तर नुसत्या शक्तीच्या जोरावर टिकाव किती काळ राहील? समाजातली अशांती शक्तीच्या जोरावर नियंत्रित केली जाते, पण अशांतीचा स्फोट झाला तर शक्तीची तटबंदी ढासळून पडते. तेव्हा समाजहितासाठी दोन्ही आवश्यक आहेत, दोन्हींत समन्वय, परस्परपूरकता आवश्यक आहे. रमण महर्षी मात्र ‘समाजाच्या कल्याणासाठी शांती आवश्यक आहे की शक्ती?’ या प्रश्नाचं मूलगामी उत्तर देतात. ते म्हणतात : ‘‘शांती ही आपल्या मनाच्या शुद्धीसाठी आवश्यक असते (स्वमनशुद्धय़े शान्ति:), तर शक्ती ही समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक असते (शक्तिस्संघस्य वृद्धये।). शक्तीच्या साह्य़ानं समाजाला उन्नत करावं, समाजाचा विकास साधावा आणि तिथे मग शांतीची स्थापना करावी!’’ म्हणजे शक्तीच्या बळावर दडपण फक्त निर्माण केलं, पण उन्नतीकडे, विकासाकडे दुर्लक्ष केलं, तर ती शक्ती हळूहळू निष्प्रभ होते. इथं महर्षी जे सूत्र सांगत आहेत ना, त्याची आध्यात्मिक छटाही आहे बरं का! इथं महर्षी प्रथम सांगतात की, शांती ही मनाच्या शुद्धीसाठी आवश्यक आहे. म्हणजे काय? मन शुद्ध नाही म्हणूनच ते अशांत आहे आणि मन अशांत आहे म्हणूनच ते अशुद्धही आहे, असं हे चक्र आहे. मन का शांत नाही? तर अनेक अवास्तव इच्छाही मनात उसळत आहेत, त्या जोडीला द्वेष, मत्सर, क्रोध, लोभ, मोह यांचाही जोर आहे. गंमत पाहा, आपल्याला समाजात भ्रष्टाचार नको असतो; पण आपल्या आचरणातील भ्रष्टाचार आपण सोडत नाही. समाजात निर्लोभीपणा हवा, असं आपल्याला वाटतं; पण आपल्यातला लोभ आपल्याला डाचत नाही. इतरांच्या क्रोधी स्वभावावर आपण टीका करतो; पण आपल्या रागावर आपलंही नियंत्रण नाही. तेव्हा शांतीचा अभ्यास व्यक्तीनं करावा, असं म्हणताना महर्षी हेच सांगत आहेत की, जोवर व्यक्ती शांत नाही, व्यक्तीचं मन सकारात्मक नाही, तोवर समाजातली अशांती, समाजातली नकारात्मकता दूर होणार नाही. तेव्हा ज्या ज्या गोष्टी समाजात असाव्यात, असं आपल्याला वाटतं त्या त्या गोष्टी आधी आपल्या जीवनात, आपल्या आचरणात आल्या पाहिजेत, हेच जणू महर्षी सुचवत आहेत. आता शक्तीच्या जोरावर जशी फार काळ सामाजिक शांतता टिकत नाही, त्याचप्रमाणे दुराग्रह, हट्टाग्रहाच्या जोरावर आपण आपल्या मनात शांती निर्माण करू शकत नाही की टिकवू शकत नाही, हेच रमणांना सुचवायचं आहे. आपण शरीराला कष्ट देणारी व्रतं वगैरे स्वत:वर लादली, पण आंतरिक भावच तसा नसेल तर बाहेरून लादलेल्या नियमांनी आंतरिक पालट होणार नाही. तेव्हा आधी आंतरिक जाग आली पाहिजे. त्यायोगे पालट घडत गेला पाहिजे. अवास्तव अपेक्षा, भ्रामक कल्पना, आसक्तीयुक्त भावनांचा फोलपणा उमगला पाहिजे. तसं झालं तर मग खरी आंतरिक स्थिरता साधू लागेल. त्यायोगे जो शक्तीसंचय होईल त्यानं समाजहितही आपसूक साधलं जाईल. मग गणपतीमुनी विचारतात की, ‘‘गन्तव्यं समुदायेन किं परं धरणीतले?’’ हे महर्षी, सर्व समाजानं कोणत्या उदात्त ध्येयाच्या दिशेनं वाटचाल करावी?

लक्षणे ते मृत्यूपर्यंतचा सरासरी कालावधी ६.४ दिवसांचा!