चैतन्य प्रेम

देहतादात्म्य- ‘देह म्हणजेच मी’ या भावनेमुळे आपल्या सगळ्या वासना, कल्पना, भावना या देहसुखालाच चिकटून आहेत. देह आहे म्हणूनच आपण आहोत, देह आहे म्हणूनच जगात आपला वावर शक्य आहे, हा आपला अनुभव आहे. त्यामुळे देहाचं प्रेम, देहाविषयीचं ममत्व आणि देहविषयक चिंता; या सगळ्या गोष्टी स्वाभाविकच वाटतात. आता देहाचं, देहधर्माचं, देहाशी संबंधित वासनांचं मानवी जीवनातलं स्थान कोणी नाकारू शकणार नाही; पण तेवढंच जीवन आहे का, याचा विचारही केला पाहिजे. देह महत्त्वाचा आहेच, पण तो कोणत्या ध्येयपूर्तीसाठी जगतो, हे त्याहून अधिक महत्त्वाचं आहे. हे ध्येयच बऱ्याचदा उमगत नसतं. बऱ्याचदा प्रपंच करीत राहणं, हेच ध्येय वाटतं. आता ज्यानं-त्यानं आपला प्रपंच नीटनेटका करणं आणि त्यातील कर्तव्यांचं काटेकोर पालन करणं, हे समाजहितासाठी उपयुक्तच आहे. पण आपला प्रपंचही मोह, भ्रम, आसक्तीनं माखला असल्यानं तो आत्महितदेखील साधत नाही. तेव्हा संकुचित प्रपंच व्यापक करणं हा परमार्थाचा आरंभ आहे, त्याची प्रक्रिया जीवनात सुरू झाली पाहिजे. एखाद्या मुलानं नीटनेटका गणवेश घातला, दप्तर चांगलं भरलं, मधल्या सुट्टीसाठीचा डबा घेतला, पाणी घेतलं; पण हे सर्व नेटकेपणानं करूनही तो शाळेतच गेला नाही की अभ्यासही केला नाही.. आणि हे रोजच घडू लागलं तर? नीटनेटका गणवेश घालणं, दप्तर नीट भरणं, डबा भरून घेणं या गोष्टीचं कुणी कौतुक करील का? तसं प्रपंच अहोरात्र करीत बसलो, पण तो समाधानाचा होण्यासाठी आपण स्वत: समाधानी होण्याचा मार्ग आचरणं अधिक महत्त्वाचं आहे. वृत्तीपालटाचा अभ्यास सुरू करणं महत्त्वाचं आहे. तर जगण्याला आणि जीवनाला अर्थ लाभेल, सौंदर्य लाभेल. त्यासाठी ज्या वेगानं दिशाहीन धाव घेणं सुरू आहे, ती गती थोडी मंदावावी लागेल. थोडं थांबून अंतर्मुख व्हावं लागेल. या अंतर्मुख होण्यालाच श्रीमाताजी म्हणत आहेत- ‘मागे सरका’! देहभावाच्या पृष्ठभागावरून मागे सरकायचं म्हणजे देहभाव जिथं उत्पन्न झाला आहे, त्या मनात खोलवर शिरायचं. त्या अंतरंगाची तपासणी करायची. ही तपासणी जशी प्रामाणिकपणे सुरू होईल तशी खरी अलिप्तता येईल. अलिप्तपणे आपण आपल्या भावना, वासना, कल्पनांचं स्वरूप, त्यांचा आपल्यावरचा प्रभाव आणि त्यामुळे आपल्या जगण्याची प्रतवारी, हे सगळं आहे त्या स्वरूपात जाणू शकू. जिथं मोह आहे, लिप्तता आहे तिथं भय आहे आणि जिथं अलिप्तता आहे तिथं भयाची कारणंच विसविशीत होऊन विरण्याची संधी आहे. हे अलिप्त व्हायचं असेल, तर साधकाला तरी बाह्य़ जगामध्ये वावरणाऱ्या सामान्य शक्तींच्या आहारी जाणं थांबवावं लागेल. आता बाह्य़ जगात कोणत्या सामान्य शक्ती वावरतात आणि त्यांच्या आहारी जाणं म्हणजे काय? जग हे सत्, रज आणि तम या त्रिगुणांत बद्ध आहे, तसंच काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या सहा विकारांनी भारलेलं आहे. त्यामुळे स्वार्थप्रेरित माणसाच्या प्रत्येक हेतूत आणि कृतीत या सहा विकार आणि त्रिगुणांचा प्रभाव पडतोच. स्वार्थपूर्तीसाठी सहा विकार आणि त्रिगुणांनी व्याप्त माणूस सर्व अंगभूत शक्ती वापरत असतो. बाह्य़ जगातील शक्ती त्या याच! इतरांच्या स्वार्थप्रेरित वागण्या-बोलण्याचा आपल्या अंतरंगावर परिणाम होऊ देऊन आपण त्यांच्याहून वाईट वर्तन करून त्यांना धडा शिकवण्याची जी जन्मजात खुमखुमी असते, ती म्हणजेच या शक्तींच्या आहारी जाणं!