सुनीती सु. र.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वातंत्र्यलढ्याच्या काळातील तरुणांच्या ओठांवर ‘चला, लोकशाहीचा शिंपू या मळा।’ हे गीत होतं. स्वातंत्र्यासोबत लोकशाही येणार ही खात्री होती. हे एक मूल्यपरिवर्तनच होतं. साम्राज्यशाहीबरोबरच सरंजामशाहीदेखील उलथवून टाकणारं! देश स्वतंत्र झाला. न्याय-स्वातंत्र्य-समता-बंधुतेवर आधारित संविधानाची प्रतिष्ठापना झाली. संविधानात अंतर्निहितच असलेले धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे शब्द संविधानाच्या प्रास्ताविकातही जोडले गेले.

मागील ७५ वर्षांत या देशातल्या लोकशाहीने अनेक चढउतार पाहिले, अनुभवले. संविधानाला अपेक्षित होती तशी लोकशाही निर्माण झाली असं नाही. लोकशाहीची, लोकांच्या अधिकारांची सत्त्वपरीक्षा अनेकदा झाली. तरीही इथली लोकशाही व्यवस्था तगली, रुजली. संविधानातली मूल्ये प्रस्थापित व्हावीत यासाठी प्रयत्न करण्याची संधी आणि अवकाश हा या संविधानाधारित लोकशाहीनेच दिला.

Republic Day 2023 Live: “…अशी माझी इच्छा आहे”, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांना शुभेच्छा देताना व्यक्त केली इच्छा!

मात्र आज अनेक आघाड्यांवर अत्यंत निराशाजनक स्थिती आहे. सर्वात गंभीर प्रश्न म्हणजे धर्माच्या नावाने समाजात तेढ, वैमनस्य, द्वेष निर्माण केला जात आहे. विविधता हे ज्या देशाचे बलस्थान, त्यावरच आघात करण्याचा प्रयत्न जोरकसपणे होत आहे आणि त्याहूनही वाईट हे की तो इथल्या बहुसंख्याक समाजसमूहाकडून होतो आहे.

धर्माच्या नावाने चाललेल्या या अधर्माद्वारे अधिकाधिक संकुचितता लादली जात आहे; आणि सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा आहे- नव्हे, तो त्यांचा अजेंडाच आहे. त्यामुळे कोणीही काय खावे- खाऊ नये, ल्यावे- न ल्यावे, बोलावे- बोलू नये, याबाबतही एक दृश्य-अदृश्य दहशतवाद माजताना दिसतो आहे. ‘लव्ह-जिहाद’च्या नावाने समाजात संशय व तिरस्कार निर्माण करण्यापासून तसे कायदे करण्यापर्यंत सरकारने हस्तक्षेप करणे हे त्याचे एक ताजे उदाहरण. ‘हिजाब’बाबतही तेच! तेव्हा, त्या संकुचिततेला दूर करून सहिष्णुतेची आणि सामंजस्याची रुजवात पुन्हा एकदा करणे हे आजचे मोठे आव्हान होऊन बसले आहे आणि त्याची सर्वाधिक जबाबदारी येथील बहुसंख्याक समाजावरच आहे.

Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिनानिमित्त पुण्यातील विद्यार्थ्यांकडून मानवी प्रतिकृतीद्वारे स्वातंत्र्य सैनिकांना मानवंदना; पाहा PHOTOS

जात, धर्म, स्त्रिया, नागरिकत्व या सर्वांना मुद्दे बनवून त्या भ्रमजालात समाजाला गुंतवून ठेवून समाजाच्या, देशापुढील कळीच्या प्रश्नांना मात्र बगल दिली जात आहे. शिक्षणाचा उडालेला बोजवारा, भयंकर बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, वाढती महागाई आणि वंचितता हे ते प्रश्न. त्याचबरोबर, मोजक्या काॅर्पोरेट्सना दिली जाणारी देश लुटण्याची खुली सूट आणि त्यापायी वाढणारी आर्थिक विषमता, पर्यावरणावर गंभीर आघात करणारी धोरणे, हवामान बदलाच्या संकटाला तोंड देण्यासाठीचे दूरगामी प्रयत्न तर दूरच… असे अनेक मुद्दे सांगता येतील. सरकारची मनमानी सुरू आहे आणि नागरिक हतबल आहेत.

ही मनमानी प्रच्छन्नपणे सुरूच राहावी यासाठी विरोधी पक्षांची सरकारे पाडणे, त्यासाठी उघडपणे पैशांचा वापर करणे, विरोधी नेत्यांची बदनामी करणे, त्यांचा आवाज बंद करण्यासाठी सरकारी संस्थांचा गैरवापर करणे, संसदेचे महत्त्व कमी करणे, न्यायव्यवस्थेतील हस्तक्षेप, प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी, लोकशाही संस्थांचे पद्धतशीर उद्ध्वस्तीकरण, अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसा घडवून आणणे, हे सारे घडवले जात आहे. देशापुढील प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्यांना देशाचे शत्रू ठरवण्यात येत आहे. अनेक कार्यकर्ते, पत्रकार, विद्यार्थी यांना देशद्रोही, दहशतवादी- शहरी नक्षलवादी ठरवून ‘राष्ट्रद्रोहा’सारख्या गंभीर आरोपाखाली वर्षानुवर्षे तुरुंगांत डांबले जात आहे. जागतिक निर्देशांकानुसारही अन्नसुरक्षा, मानवी विकास, वृत्तपत्र स्वातंत्र्य, अशा सर्व बाबतींत भारताचा क्रम घसरतच चालला आहे. जगातील गरिबांची सर्वाधिक संख्या भारतात आहे आणि चार-दोन काॅर्पोरेट्सच्या हाती सारी संपत्ती एकवटली आहे. हे सारे लोकशाहीच्या अस्तित्वासाठी अत्यंत धोक्याचे आहे.

पंतप्रधान मोदी आणि इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अल-सीसी यांच्यात द्विपक्षीय चर्चा; दोन्ही देश धोरणात्मक भागीदारीस नव्याने पुढे नेणार

अशा वातावरणात या वर्षीचा लोकशाही उत्सव आजपासून सुरू होत आहे. दरवर्षी २६ ते ३० जानेवारीदरम्यान ‘लोकशाही उत्सव समिती’च्या वतीने हा उत्सव साजरा केला जातो. विविध पुरोगामी संस्था-संघटना आणि व्यक्तींचा हा मंच आहे. पुण्यातील लोकशाही उत्सवाचे हे एकविसावे वर्ष आहे आणि या वर्षी महाराष्ट्रातील अन्य १५ जिल्ह्यांमध्ये हा उत्सव होत आहे. अर्थातच आजकालच्या प्रश्नांची चर्चा या लोकशाही उत्सवाद्वारे घडवून आणली जाणार आहे, तीदेखील नृत्य, एकपात्री प्रयोग, नाटक, मुलाखत, व्याख्यान, परिसंवाद, बाल आनंद मेळावा, हुतात्म्यांना अभिवादन अशा विविध माध्यमांद्वारे. याशिवाय पर्यावरणस्नेही जीवनशैलीचा आग्रह धरणारे ‘जीवनोत्सव’ प्रदर्शनही होणार आहे. शहरातील काही वस्त्यांमध्येही ‘लोकशाही उत्सव’ होणार आहे. यातील बहुतांश कार्यक्रम एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन येथे होणार आहेत.

२६ जानेवारीला सकाळी साडेआठ वाजता झेंडावंदन होईल ते, तरंग आशा हबीब या मुस्लीम वडील, ख्रिश्चन आई व शीख पती अशा म. फुले यांच्या संकल्पनेतील कुटुंबातील युवतीच्या हस्ते! त्यानंतर जगदीश भोसले आणि सहकारी यांचे ‘आ चल के तुझे’ हे कथ्थक नृत्य सादरीकरण होईल.

Republic Day Police Medals : महाराष्ट्रातील चार अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर; ३१ पोलिसांचा शौर्यपदकाने सन्मान!

शाश्वत अशा पर्यायी जीवनशैलीचा पुरस्कार करणाऱ्या ‘जीवनोत्सव’ प्रदर्शनाचे उद्घाटन, उच्चशिक्षित असून कष्टकऱ्याचे जीवन जगणारा शाश्वत जीवनशैलीचा वाटसरू हृषीकेश पाळंदे या तरुणाच्या हस्ते होईल. त्यानंतर, रवांडातील दहशतवादी काळातील एका तरुणीची घुसमट व्यक्त करणाऱ्या ‘चार बाय तीन : द्वेष थकवतो, प्रेम तगवते’ या रेखा ठाकूर यांच्या संहितेचे सादरीकरण होईल. नक्षलवादी ठरवल्या गेलेल्या तरुणाच्या आईची कैफियत मांडणाऱ्या ओजस सु. वि. दिग्दर्शित आणि विनीत तिवारी लिखित-संकलित ‘धीरेन्द्र मुजुमदार की मां’चे सादरीकरण होईल. याव्यतिरिक्त जया मेहता यांनी दिग्दर्शित केलेला आणि जहाँआरा यांनी सादर केलेला एकपात्री नाट्यप्रयोगही होईल.

प्रतिकूल परिस्थितीतही निर्धाराने प्रेम फुलवणाऱ्या, चाकोरीबाहेरचे सहजीवन जगणाऱ्या आंतरजातीय, आंतरधर्मीय, आंतरप्रांतीय, समलैंगिक, लीव्ह इनमधील जोडप्यांच्या मुलाखती होतील. २६ जानेवारीला दुपारी साडेचार वाजता द्वेष, अविश्वास, तेढ अशा वातावरणात प्रेमाचा संदेश देणारा ‘लव्ह आजाद है!’ हा तरुणांचा उद्गार उमटेल. हे सर्व कार्यक्रम एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन, नवी पेठ, पुणे येथे मनीषा गुप्ते यांच्या अध्यक्षतेखाली होतील.

Republic Day 2023 Parade BSF च्या महिला कॅमल राईडर्स ‘कर्तव्य पथा’वर करणार संचलन

२७ जानेवारीला संध्याकाळी साडेपाच वाजता जात-वास्तवावर ज्वलंत मांडणी करणारे नरेश डोंगरवार लिखित नाटक ‘जातबोवारी’ आकांक्षा रंगभूमीच्या वतीने पुणे महानगरपालिकेचे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक नाट्यगृह, गंजपेठ येथे सादर करण्यात येईल.

२८ जानेवारीला सकाळी साडेदहा वाजता ‘भुरा’कार डॉ. शरद बाविस्कर यांची मुलाखत राहुल पैठणकर व मधुरा जोशी घेतील. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अनंत फडके असतील. कार्यक्रम महाराष्ट्र फाउंडेशनच्या सहयोगाने होईल.

किशोरवयीन मुलामुलींना रमविणारा, विचाराला प्रवृत्त करणारा, गाणी, गोष्टी, चित्रे, वैज्ञानिक खेळ यांचा भरगच्च जीवनोत्सव आनंदमेळावा २८ जानेवारीला संध्याकाळी ४ ते ७ या वेळात होईल. बालसाहित्यिक राजीव तांबे, चित्रकार रमाकांत धनोकर, वैज्ञानिकतेचे प्रसारक विनय र. र. हे मुलांशी संवाद साधतील.

Republic Day 2023 Updates : “भविष्यासाठी मोठी ध्येयं आणि संकल्प अतिशय आवश्यक, मात्र…” पंतप्रधान मोदींचं विधान!

२९ जानेवारीला संध्याकाळी साडेपाच वाजता ‘गांधीजींची धर्मसंकल्पना आणि भारतीय धर्मनिरपेक्षतेचा प्रवास’ या विषयावर गांधीविचाराचे अभ्यासक किशोर बेडकीहाळ यांचे व्याख्यान होईल. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्य़ेष्ठ विचारवंत-कार्यकर्ते गजानन खातू असतील. हा कार्यक्रम जनसहयोग ट्रस्टच्या सहकार्याने होईल.

३० जानेवारीला, सकाळी ११ वाजता मजूर अड्डा, फरासखाना पोलीस ठाण्याजवळ हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येईल. याच दिवशी संध्याकाळी ‘माध्यमांची गळचेपी आणि निर्भय पत्रकारिता’ या विषयावरील परिसंवाद होईल. त्यात अलका धुपकर, रवींद्र आंबेकर, संजय आवटे हे पत्रकार सहभागी होतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर असतील. या कार्यक्रमात हलिमा कुरेशी यांना विद्या बाळ युवा महिला पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात येईल. हा कार्यक्रम ‘मिळून साऱ्याजणी’च्या सहयोगाने होईल.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला विद्यार्थ्यांनी साकारल्या देशभक्तीपर प्रतिमा

याशिवाय, निसर्गसंवादी, परस्परावलंबी जीवनदृष्टी देणारे ‘जीवनोत्सव’ हे प्रदर्शन २६ ते ३० जानेवारीदरम्यान सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत (२७ व ३० जानेवारीला संध्याकाळी ५ ते रात्री ९ पर्यंत) एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या प्रांगणात होईल. खादी, ग्रामोद्योग, कुटिरोद्योगातील उत्पादने, सेंद्रिय शेतीमाल, समुचित ऊर्जासाधने, बचतगटांतील महिलांनी तयार केलेल्या उपयुक्त वस्तू, हस्तकलेच्या वस्तू, वैज्ञानिक खेळणी, पुस्तके, पौष्टिक-चविष्ट खाऊ यांची विक्री या प्रदर्शनात होईल. पुण्यातील विविध वस्त्यांमध्येही पोस्टर प्रदर्शने, विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्वस्पर्धा, रॅली, मुलांशी व पालकांशी संवाद असे विविध कार्यक्रम होणार आहेत.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A celebration of symbols of indian democracy asj
First published on: 26-01-2023 at 09:28 IST