राहुल मोरे

‘छत्रपती शिवाजी महाराज चवताळून उठावेत म्हणून अफजलखानाने तुळजापूरच्या भवानीआईची मूर्ती उद्ध्वस्त केली होती… असंही म्हणतात की पुढे जाऊन त्याने त्याच मंदिरासमोर एक गाय देखील कापली. तेवढ्यावर न थांबता त्याने सईबाईंचे बंधू बजाजी निंबाळकरांचे धर्मांतर घडविले…’ छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टिरूप इतिहासात अनेकांनी लहानपणी वाचलेले हे प्रसंग ‘शेर शिवराज’ या नव्या चित्रपटामुळे पडद्यावर अगदी ‘जिवंतपणे’ साकारून आपल्यासमोर येतात. हा चित्रपट नुकताच बघितला आणि काही विचार जे मनात अनेक दिवस होते, ते मांडावे असं वाटलं. कारण ‘बायोपिक’च्या हल्लीच्या काळात, चित्रपटात जे दाखवलं जात आहे, तेच अंतिम सत्य म्हणून स्वीकारणं अधिक सोयीचं होत चाललं आहे. पण याचा अर्थ, हा लेख चित्रपटाची समीक्षा करणारा नसून, त्या काळात छत्रपती शिवाजी महाराज एक राज्यकर्ता म्हणून ‘धर्म’ या विषयाकडे कोणत्या दृष्टीनं पाहात असावेत, या प्रश्नापुरताच मर्यादित आहे.

virendra mandlik criticizes shahu chhatrapati s family
छत्रपती कुटुंबाने राजर्षी शाहू महाराजांच्या नावाला साजेसे काम केले नाही; मंडलिक घराण्याची पुन्हा एकदा टीका
lakdi pool in Pune
VIDEO : पानिपतच्या युद्धानंतर नानासाहेब पेशव्यांनी तातडीने ‘लकडी पूल’ का बांधून घेतला? वाचा रंजक गोष्ट
Statue, Shivaji Maharaj, Assam,
आसाममध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा, चीनच्या सीमेवर २१ पॅरा स्पेशल फोर्समध्ये अनावरण, साताऱ्यातील सुपुत्राचा पुढाकार
Sanyogeetaraje Chhatrapati
कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती

चित्रपटात आणि इतिहासातही हेच दिसते की ३६० वर्षांपूर्वीच्या त्या काळात हिंदू धर्मावर राजरोसपणे हल्ला चालू होता. तो काळ, त्या काळातल्या सर्वसामान्यांच्या विचारधारा, त्या काळातल्या धर्माविषयी लोकांच्या भावना लक्षात घेता महाराज सुद्धा प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्रातल्या मस्जिदी फोडू शकले असते. इस्लाम धर्म मानणाऱ्या लोकांवर अत्याचार करू शकले असते. पण असे कुठेही घडल्याचा उल्लेख आजवर तरी माझ्या वाचनात नाही (मी इतिहसाकार नाही). अर्थात चित्रपटात देखील ह्याचा उल्लेख नाहीच नाही. अफजलखानाच्या दुष्ट कृत्यास उत्तर म्हणून महाराजांनी फक्त त्याचा (एका वाईट वृत्तीचा) वध केला. आपण हे देखील लक्षात घ्यायला हवे, की या मोहिमेवर असताना सिद्धी इब्राहिम सारखी मुस्लीम माणसे देखील महाराजांना साथ करत होती.

महाराज मित्र आणि शत्रू मध्ये धर्म पाहात नव्हते, याचं आणखी एक उदाहरण म्हणजे, ज्याच्या हातात शस्त्र नसेल त्याला अभय द्यायला सांगितले होते महाराजांनी, पण जो कुणी शस्त्र उगारून अंगावर चालून येईल, त्यालाच जिवे मारण्याची सूचना केली होती. अफजलखानानं आधीही शिवाजी महाराजांच्या थोरल्या बंधूंची चलाखीने हत्या केली होती, शहाजी महाराजांचा अपमान केला होता. या सगळ्या ठसठसत्या जखमांचा सूड उगवण्यासाठी ‘धर्म’ नावाचं सोप्पं हत्यार महाराज वापरू शकले असते. धर्माच्या नावानं शिमगा करून, रयतेची माथी भडकवून देणं आणि स्वतः अफजलखानावर चालून न जाता इतर कुणाला पुढे सारून त्याचा बळी पडू देणं… विजय प्राप्त झालाच तर वैयक्तिक स्वार्थ साध्य करून घेणं, हे सारं आज इतकं सहज वाटणारं, सवयीचंच- ते महाराजांनी कधीही केलं नाही. महाराजांनी भावनिक क्षणीदेखील स्वतःचं हित साधण्यासाठी ‘धर्माचं राजकारण’ होऊ दिलं नाही. त्या सगळ्या कठीण काळात देखील महाराजांना मोलाचं होतं ते फक्त ‘रयतेचं स्वराज्य’. कारण ते जाणून होते, की स्वराज्याचा खरा शत्रू हा कुठलाही ‘धर्म’ नसून अफजलखान आहे. त्याचा कोथळा काढल्यानंतर महाराजांनी इस्लाम धर्म, त्याची प्रतीके यांच्या विरोधात कोणत्याही मोहिमा न आखता लक्ष केंद्रित केले ते फक्त स्वराज्याच्या विस्ताराकडे.

दुर्दैवाने आज अमुक धर्माचा माणूस शत्रूच असतो, या चुकीच्या विचारांना आपण बळी पडत आहोत. धर्म वाचावा म्हणून जनतेला हनुमान चालीसा म्हणायला प्रवृत्त करणारे भामटे राजकारणी, स्वतः मात्र हनुमान चालीसा पुस्तकातून वाचून काढतात आणि यापुढेही आम्ही हनुमान चालीसा पुस्तकातूनच वाचून काढणार म्हणत धर्माचीच चेष्टा उडवतात! हे कसे खपवून घेतो आपण? अशा उथळ प्रवृत्तींच्या लोकांचा समाजानं सामूहिक अस्वीकार करणं आणि अफजलखानाला ठार मारणं, एकसारखंच ठरेल. आपापल्याच धर्माचे गोडवे गाणारे प्रत्येक धर्मातले धर्माचे ठेकेदार, माणसाला भूतकाळात ओढत असतात. नैसर्गिकदृष्ट्या माणसाचा प्रवास हा भविष्यात होणारा आहे. धर्माच्या नावाखाली माणसाला विरुद्ध दिशेला नेऊन, त्याची दिशाभूल का करावी?

भूतकाळातून, इतिहासातून माणूस शिकतो, प्रगल्भ होतो, मान्य आहे, पण शिकणं वेगळं आणि त्यात रममाण होणं निराळं. आज धर्माचे गोडवे गाणारे राजकारणी आपल्याला सतत भूतकाळातू लोटू पाहताहेत, मुळात त्यांचा धर्माविषयी अभ्यास किती, अनुभव किती, हे आपण का विचारत नाही? का आपण त्यांचं ऐकायचं? ‘धर्म’ ही माणसाची मानसिक गरज आहे, म्हणून तर मानवानं धर्म निर्माण केले. मात्र ‘अन्न, वस्त्र, निवारा ’ या तीन मूलभूत मानवी गरजा त्याहीपेक्षा महत्त्वाच्या नाहीत का? आजच्या जगातला अफजलखान म्हणजे वाढती महागाई, बेरोजगारी, दंगली… या आणि अशा इतर अनेक रूपात आपल्याला तो पहायला मिळतो. तो रोज सामान्य माणसांचे लचके तोडतो आहे. आपल्यासमोरचा खरा प्रश्न या अफझल्ल्याचा फडशा कसा पाडायचा हा आहे. येत्या ६ जूनला छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. या मंगल दिनी आपण प्रत्येकानं एक शपथ घेऊया की, आपण सगळे एकजूट होऊन, धर्माच्या राजकारणाला बळी न पडता, या ‘आजच्या’ अफजलखानाचा डाव हाणून पाडू आणि त्याचा एकजुटीने संहार करू.

rahulmoray72@gmail.com