गिरगाव, गिरणगाव अशा मराठमोळ्या भागांत खूप उत्साहाने साजरा होत असलेला गोविंदा दादर, ठाणे, पुणे येथे जाऊन पोचला.परदेशातही त्याची ख्याती पसरली. सर्वसामान्यांचा आवडता असलेला हा साहसी खेळ, समाजमनाची अचूक नाडी ओळखून राजकीय नेत्यांनी धूर्तपणे ‘हायजॅक’ केला. त्यातील अर्थकारण त्यांनाच मोठे करत गेले. नागरिकांसाठी असलेल्या रस्त्यांवर त्यांचीच अर्निबध सत्ता गाजू लागली. ठाणे, मुंबई अशा शहरांत वेगवेगळ्या विभागांत विविध राजकीय धेंडांनी दहीहंडीच्या निमित्ताने हंडी फोडणाऱ्या साहसी थरावर उभे राहून नव्हे तर सुरक्षित अशा स्टेजवर, मनसोक्त नाचून स्वतला चित्रवाणीच्या वाहिन्यांवर झळकाविले. दिवसभर मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या या कर्णकर्कश गोंगाटात एखाद्या मॉडेलप्रमाणे विविध रंगांचे वेगवेगळे शर्ट बदलून परिधान करायला ते विसरले नाहीत. पण जिवाची बाजी लावून या साहसी प्रकारात खेळणाऱ्या धाडसी युवा वर्गाची आठवण उशिरा का होईना झाली आणि या खेळाला साहसी खेळ म्हणून मान्यता मिळण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या. वंचित राहिलेल्या धाडसी गोविंदाच्या कौशल्याला, धाडसाला दाद नव्हे, तर राजाश्रय देताना सर्वसामान्य नागरिकांना होत असलेल्या त्रासाचाही विचार व्हावा. मुंगीचासुद्धा शिरकाव होणार नाही अशा अलोट गर्दीमुळे त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांपकी कोणा आजारी अत्यवस्थ व्यक्तीला, गर्भवती स्त्रीला तातडीने रुग्णालयात न्यायचे झाल्यास जिवावर बेतणार, तसेच कोणाचे मयत झाले तरी आणीबाणीचा प्रसंग ओढवणार, हा विचार सार्वजनिक रस्ते ही आपली जहांगिरी असल्याच्या गुर्मीत वावरणारे हे राजकीय नेते करत नाहीत. उत्सवांविरुद्ध कोणी आवाज उठविलाच तर त्याची मुस्कटदाबी केली जाते वा त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून अशा सोहोळ्यांना दरवर्षी परवानगी दिली जाते. त्या परिसरातील रहिवाशांना कितीही त्रास होत असला तरी त्याविरुद्ध चकार शब्द काढायची हिंमत फारशी कोणामध्ये उरत नाही. वंचित राहिलेल्या गोविंदाला मान्यता सुविधा देताना करदात्या सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय्य हक्कांचे काय? रस्ता वाहतुकीसाठी आणि दळणवळणासाठी आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यावरून चालण्याचा, वाहतुकीचा हक्क आहे याचा विसर पडता कामा नये.
-रजनी अशोक देवधर, ठाणे

काँग्रेसींनी महाराष्ट्राबाबतच असे का वागावे?
‘श्रीरामुलुंची मुक्ती’ हा अग्रलेख (१ ऑगस्ट) वाचला. अमेरिकेचे क्षेत्रफळ भारताच्या सुमारे अडीचपट अधिक असताना, तेथे फक्त ५० राज्ये आहेत ,  तेथे छोटी राज्ये निर्माण झाली तर व्यवस्थापनाला सोयीचे ठरेल, असे कोणी ठासून म्हणाले वा त्यासाठी कोणी आंदोलन केल्याचे ऐकले नाही. मग आपल्या येथे त्याचे एवढे औचित्य काय? राजकारण!  दुसरे काय?
पंडित नेहरू म्हणजे भारतीय लोकशाहीचे आयडॉल! पण पोट्टी श्रीरामुलू यांनी प्राणांतिक उपोषण केले नि यांचे कविमन व्याकुळ झाले! त्यांनी मंत्रिमंडळ बठकीत रीतसर ठराव मांडून, संमती घेण्याअगोदरच स्वतंत्र तेलगु भाषिक राज्य : आंध्र प्रदेशची घोषणा केली. ‘भाषावार प्रांत रचने’साठी नेमलेल्या आयोगाचा अहवाल येण्याचीही वाट पाहिली नाही. पण त्याच नेहरूंनी मुंबईतील भांडवलदारांच्या कारस्थानाला बळी पडत, गिरणी कामगारांची ‘मुंबई’ केंद्र शासित ठेवण्याचा घाट घातला. संसद अधिवेशन चालू असतानाही, तेथे जाहीर न करता, रेडिओवरून त्याची घोषणा केली. त्यानंतर उसळलेल्या जनआंदोलनास चिरडण्यासाठी, बेछूट गोळीबार केला. त्यात १०६ सत्याग्रही हुतात्मा झाले. अिहसावादी महात्मा गांधींचे पट्टशिष्य नेहरूंनी त्याची चौकशीही करण्यास नकार दिला.
आज आंध्र प्रदेशमधील काँग्रेसचे मुख्यमंत्री नि काही आमदार वेगळ्या तेलंगणास विरोध करीत आहेत. पण आपले त्यावेळचे काँग्रेस आमदार नि खासदार यांना ही हिंमत दाखवता आली नव्हती. निदान आज तरी त्यांनी सद्य परिस्थितीचा फायदा घेऊन, सीमाप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, हिंमत दाखवावी.
-श्रीधर गांगल

परिणाम: आवईचा आणि हल्ल्याचा
‘तृतीयपानी अशोभनीय’ हा अग्रलेख (२ ऑगस्ट) वाचला. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी काढण्याचा धनिकांचा कट आहे, ही काँगेसच्या प्रादेशिक नेतृत्वाने शिवसेनेशी आंतरिक हातमिळवणी करून उठवलेली आवई होती. दिल्लीश्वरांना धाकात ठेवण्यासाठी लढवलेली शक्कल प्रत्यक्षात मुंबईच्या जिवावर उठली आहे. सर्व पक्षांनी आणि या आवईला भुलून आपल्यावर हृदयसम्राट लादून घेणाऱ्यांनी या भूतपूर्व आर्थिक राजधानीची आणि एकेकाळच्या स्वप्ननगरीची अशी काही लक्तरे काढली आहेत की ती महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची गरज दिल्लीलाही राहिली नसेल.
मुंबईतल्या तृतीयपानी धनिकांना फक्त ताज आणि ट्रायडंटवरच्या हल्ल्यांचा पुळका आला होता, असे अग्रलेखात म्हटले आहे. त्या चार दिवसांत लोकसत्तेसह मुंबईतली सर्व वर्तमानपत्रेही याच हल्ल्यांच्या बातम्यांनी भरलेली होती. कारण, सीएसटीवरचा हल्ला त्याच रात्री संपुष्टात आला होता. त्या हल्ल्यातला एक हल्लेखोर मारला जाऊन दुसरा (अजमल कसाब) पोलिसांच्या हाती लागला होता. ताज आणि ट्रायडंटवरचे हल्ले नंतर जवळपास दोन दिवस चालू होते आणि ते टीव्हीवरून लाइव्ह दाखवले गेल्यामुळे त्यांचा प्रभावही जनसामान्यांवर अधिक होता.
-रमाकांत नाडगौडा, नाहूर

‘मराठी जरूरी नहीं है..’ चलता है!
मराठी भाषा अवगत नाही म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची पगारवाढ रोखल्याची बातमी (लोकसत्ता, ३१ जुलै) वाचली. एक ताजा अनुभव -वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये भरलेल्या रेशमी साडय़ांच्या प्रदर्शनाला गेले होते. पहिला गाळा महाराष्ट्राचा आहे. तिथे मी साडय़ा पाहायला थांबले. मराठीतून बोलायला सुरुवात करताच तिथल्या विक्रेत्याने मला रोखलं. ‘हमको मराठी नहीं आती. हिंदी में बात करो.’  मी चकित होऊन म्हटलं, ‘अहो, महाराष्ट्राच्या गाळ्यात काम करताय आणि मराठी येत नाही?’ त्यावर त्याने ‘ऐसा कोई जरूरी नहीं है। ये आपकी सोच है। और कोई ऐसा नहीं सोचता है।’ अशा शब्दात मला फटकारलं. गिऱ्हाईक हातचं जाऊ नये, इतर काही त्रास होऊ नये म्हणून अलीकडे कित्येक मोठमोठय़ा दुकानांत, मॉलमध्ये मोडकंतोडकं का होईना, मराठी बोलतात तिथले विक्रेते. पण याने मला एका शब्दात झिडकारून टाकलं.
चेन्नईहून सुटणाऱ्या विमानातही हिंदी आणि इंग्लिशबरोबर तमिळ भाषेत सूचना देतात, पण मुंबईतून सुटणाऱ्या विमानात मात्र मराठी औषधालासुद्धा नसते. काही अपवाद वगळता याची खंत कुणालाही नाही, हे जास्त खेदजनक आहे. परदेशात २५ वर्षांहून अधिक काळ राहणारी, आता तिथले नागरिक झालेली मराठी माणसं इथे सुट्टीवर आली की आवर्जून उत्तम मराठी बोलतात. मराठी भाषेत नाटक लिहून पहिलं पारितोषिक मिळवतात आणि इथे राहणारे मात्र ‘चलता है’ असा सबगोलंकार दृष्टिकोन बाळगतात, याला काय म्हणावे?
राधा मराठे

मुंबई वेगळीच असते!
ब्रिटिशांनी पारशांना हाताशी धरून आणि गुजरात्यांना आयात करून मुंबई बंदराचा आजच्या भाषेत ‘विकास’ केला; तेव्हापासून मुंबई ही महाराष्ट्रापासूनच नव्हे, तर देशापासून फटकूनच राहिलेली आहे. हे महानगर उर्वरित महाराष्ट्राच्या सुखदुखांशी कधी एकरूप झाले नव्हते. येथील मराठी माणसांनाही कधी महाराष्ट्र लोडशेडिंगच्या झळांमध्ये होरपळत असताना आपली उधळपट्टीची झळाळी कमी करावीशी वाटली नाही. आपल्याला पाणी पुरवणाऱ्या भागांमध्ये आयाबायांना दोन घागरी पाण्यासाठी तंगडतोड करावी लागते, याचं दुख कधी मुंबईकरांना झालं नाही.
उर्वरित मुंबईकरांच्या सुखदुखांपासून धनिकांची आणि राज्यकर्त्यांची दक्षिण मुंबई जशी अलिप्त असते, तशीच बृहन्मुंबई महाराष्ट्राच्या सुखदुखांपासून अलिप्त असते. तिला कोणी महाराष्ट्रापासून वेगळे काढण्याची गरज काय?
विक्रम समर्थ, दादर