टाळेबंदी कायम राहणार की टप्प्याटप्प्याने हटवली जाणार याची चर्चा आता ‘लोकसत्ता’च्या अग्रलेखानेही केली आहे. नक्कीच पुढे चांगले दिवस येणार! परंतु टाळेबंदीचा हा काळ म्हणजे सध्या घरामधील गृहिणीला (होममेकर ) नेहमीपेक्षा जास्तीचे काम . कारण मुले / सुना , नवरे मंडळींचे वर्क  फ्रॉम होम आणि नातवंडांना शाळेला सुट्टी, म्हणजे एकंदरीत काय तर सगळ्यांचा आनंदीआनंद.

तसे पाहिले तर प्रत्येक स्त्री ही आपल्या कुटुंबासाठी प्रेमानेच सारे काही करीत असते. परंतु या परिस्थितीत तिच्यावर कामाचा अधिकच ताण. कामवाली बाई येत नाही, त्यामुळे आणखी वाढीव काम. सर्वाच्याच तब्येतीकडे लक्ष देत घरातील स्वयंपाकपाणी निगुतीने आणि काटकसरीने करणे, कारण उद्या काय परिस्थिती असेल हे काही सांगता येत नाही . उद्या सर्व सुरळीत सुरू झाल्यावर प्रत्येकाला त्याचा पगार मिळणार आणि डबल डय़ुटी करूनसुद्धा गृहिणीला काहीच नाही. या सगळ्यात ५० ते ६० वयातील महिलांनाच जास्त कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागते, कारण ज्येष्ठ नागरिकांना काही सवलती असतात, मग आमच्यासारख्या मध्यमवयीन गृहिणीचे काय?

मिता स. बेंद्रे, वांद्रे (मुंबई)

‘मी नव्हे आपण’ हा प्रेरणादायी वारसा..

‘बर्नी सँडर्स यांचा वारसा’ हा ‘अन्वयार्थ’ (१० एप्रिल) वाचल्यानंतर वाटले की, काही बाबी आणखी ठळकपणे मांडाव्या लागतील. बर्नी असे एकमेव राजकारणी असतील ज्यांनी आपली विचारधारा ‘काळानुरूप राजकीय फायद्यासाठी’ कधीच बदललेली नाही. सन १९८७ मध्ये जेव्हा त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली होती तेव्हाही ते ‘आरोग्यसेवा (मेडिकेअर) हा मानवाधिकारच आहे’ यावर ठाम होते. त्या वेळी आताचे डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार आपल्या फायद्यासाठी सिनेटमध्ये आपली भूमिका बदलत असायचे. अपक्ष उमेदवारापासून ते डेमॉक्रॅटिक पक्षापर्यंत त्यांची कारकीर्द फक्त आणि फक्त आपल्या ठाम भूमिकांमुळेच गाजली. बर्नी सँडर्स यांच्याबाबत आणखी एक आश्चर्याची बाब म्हणजे त्यांनी बराक ओबामांच्या महत्त्वाकांक्षी ‘ओबामाकेअर’ या आरोग्यसेवेविरुद्ध आपली मते मांडली होती, कारण सँडर्स यांनी सुचवलेली ‘मेडिकेअर सर्वासाठी’ ही योजना ‘ओबामाकेअर’पेक्षा कैक पटींनी उत्तम होती. मात्र अशा प्रकारच्या भूमिकांमुळे त्यांच्यात आणि डेमॉक्रॅटिक पक्षाच्या प्रस्थापितांमध्ये उघडपणे गट तयार झाले.

पक्षांतर्गत प्रायमरीजमध्ये शेवटच्या क्षणी कशा प्रकारे प्रस्थापित उमेदवाराने पक्षाच्या मदतीने ‘टेक्सास’सारख्या राज्यात मुत्सद्देगिरीने आणि मतदानाला विलंब लावून आपल्या खिशात हे राज्य घातले याची चर्चा संपूर्ण जगात होती. शेवटी अमेरिकेत क्रांतीसमोर नेहमीच प्रस्थापित जिंकत असतात याची परंपरा या वेळीही कायम राहिली; परंतु अमेरिका एका उत्तम राष्ट्राध्यक्षाला मुकला याची सल अनेकांच्या मनात कायम राहील. त्यांनी आपली माघार घेताना ‘मी नव्हे आपण’ या घोषणेअंतर्गत केलेले भाषण अनेकांसाठी प्रेरणादायी राहील.

– प्रथमेश कमल विष्णू पुरूड, सोलापूर

काँग्रेस सावरण्यासाठी जाहिरातबंदी निरुपयोगी!

‘‘विंचू’ दिसतो .. म्हणून वहाण?’  हा ‘उलटा चष्मा’ (१० एप्रिल) वाचला. सोनिया गांधी यांनी अन्य महत्त्वाच्या सूचनाही केल्या असल्या तरी, केंद्र सरकारच्या जाहिराती बंद करा, या सूचनेमागे बुडत्या काँग्रेसच्या जहाजाला वाचवण्याचा शेवटचा आधार शोधण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो आहे. या पक्षात जान फुंकायची तर आगोदर जनतेत जाऊन कामे करण्यासाठी, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जान आणावी लागेल. परंतु वर्षांनुवर्षे सत्तेची पदे उपभोगल्यामुळे जो एक प्रकारचा आळशीपणा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आला आहे, त्यामुळे हे महाकठीण काम. मात्र त्याशिवाय काँग्रेसला पूर्वीचे सोनेरी दिवस काही दिसणार नाहीत. अजूनही काँग्रेसला, त्यांच्या धर्मनिरपेक्ष तत्त्वांना, सहिष्णू वृत्तीला, सर्वसमावेशकतेच्या आचारविचाराला मानणारा एक मोठा वर्ग आहे. परंतु त्या वर्गाला पुन्हा आपल्या बाजूने वळवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. उत्तम वक्तृत्व असलेले व जनतेशी योग्य संवाद साधणारे तरुण नेतृत्व निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रथम पक्षातील घराणेशाही बंद करणे गरजेचे आहे. आणि सक्षम विरोधी पक्ष म्हणून संसदेत आपला ठसा उमटवणे गरजेचे आहे. त्याऐवजी, मोदी सरकारचा आधार असलेल्या (आणि वृत्तपत्रे, वाहिन्या आदी माध्यमांनाही आधारच देणाऱ्या) व आतापर्यंत सर्वात जास्त पैसा ज्यावर मोदी सरकारने खर्च केला व राजकीय फायदा उठवला, त्या जाहिराती बंद करायची सूचना करून सोनिया गांधी काँगेस पक्षाला संजीवनी द्यायचा प्रयत्न करीत आहेत, हे ‘उलटय़ा चष्म्या’तून लिहिलेले खरेही वाटते! परंतु काँग्रेसचे बुडते जहाज वाचवण्यासाठी कार्यकर्त्यांच्या अपार कष्टाशिवाय दुसरा पर्याय नाही.

– मिलिंद यशवंत नेरलेकर, डोंबिवली पूर्व

चष्मा उलटा, तरी ‘विंचू’ आहेच..

‘विंचू दिसतो..  म्हणून वहाण?’ हा ‘उलटा चष्मा’ (१० एप्रिल) जरी हलकाफुलका असला तरी नक्कीच विचार करायला लावणारा आहे. भाजप हा सरकारी जाहिरातींमुळे छापील आणि चित्रवाणी माध्यमांना आपलेसे करून घेऊन आपल्याला हव्या त्या हव्या तशा बातम्या छापून आणण्यात यशस्वी झाला आहे, हे वाचताना लक्षात येतेच. जरा आजूबाजूला पाहिले, तर पुष्कळ जणांनी हा जाहिरातींचा ओघ आपल्याकडे कायम राहण्यासाठी तत्त्वे कशी खुंटीवर ठेवली, हेही समजते. मग अशा करोनामय स्थितीत सर्वानाच खाण्यापिण्याची भ्रांत असताना माध्यमांनाही चिमटा बसला तर काय हरकत?

– सुधीर शेंडे, मुलुंड पूर्व (मुंबई)

‘तुष्टीकरणा’ची ओरड नाही..                               

‘मरकज’ प्रकरणातील दोषी कोण असतील त्यांना योग्य ती शिक्षा अवश्य झाली पाहिजे यात वादच नाही, पण एक मनात येते की, दिल्लीत करोना विषाणूविषयक काळजी घेतली जात असतानाही एवढय़ा मोठय़ा संमेलनाला परवानगी देण्याचा हा प्रकार काँग्रेसच्या राजवटीत घडला असता तर ‘लांगूलचालन’, ‘तुष्टीकरण’, ‘व्होट बँक’ असा प्रचंड ओरडा झाला असता. तो कोणी केला असता हे सांगायला नकोच. आता हे सर्व गप्प आहेत, कारण देव चुकतो हे ‘भक्तां’ना कधीच मान्य होत नाही.

– डॉ. शरद अभ्यंकर, वाई