स्वरूपस्थ राहाण्याचा जो स्वधर्म आहे त्याचेच संस्कार सद्गुरू साधकावर करीत राहातात. जोवर स्वरूपाची जाण होत नाही तोवर जगण्यातला संकुचितपणा, जगण्यातली भीती, काळजी, चिंता मावळत नाही. एकदा गुरुजींना विचारलं की, ‘‘निर्भयता कशानं येईल?’’.. आणि आपण या मार्गावर आलो ना त्याचं खरं कारण आपल्याला निर्भयताच हवी आहे, हे आहे हो! एखादा साईबाबांची भक्ती करतो, कुणी गजानन महाराजांची भक्ती करतो.. ती का करतो? तर त्यांच्या आधारावर आपण निर्भय होऊ, नि:शंक होऊ, अखंड आनंदी होऊ, हीच त्याची सूक्ष्म इच्छा असते. गंमत अशी की दु:खाच्या अभावाला आपण सुख मानत असतो त्यामुळे जीवनात दु:ख कधीच न येणं म्हणजे नि:शंकतेनं, निर्भयतेनं आनंदात जगता येणं, अशी आपली कल्पना असते. त्यामुळे जीवनातल्या सर्व भौतिक अडीअडचणी सद्गुरूंनी दूर कराव्यात म्हणजे आपण सदोदित निर्भय राहू, असंही आपल्याला वाटत असतं. सद्गुरू मात्र फार वेगळं सांगतात. अनुकूल परिस्थितीत कोणीही निर्भय आणि आनंदीच राहील हो! प्रतिकूल परिस्थितीतही निर्भय आणि आनंदी राहाता आलं पाहिजे, हा सद्गुरूंचा खरा हेतू असतो. आणि म्हणूनच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जात ते साधकाच्या चित्तावर या निर्भयतेचेचं संस्कार करतात. तर, महाराजांना विचारलं की, ‘‘खरी निर्भयता कशी येईल?’’ महाराज म्हणाले, ‘‘माझ्यावर जितकं विसंबता येईल तितकी निर्भयता येत जाईल!’’ आणि खरंच आहे हे.. जोवर अपूर्ण आधारांवर विसंबून आहोत तोवर निर्भयता यायचीच नाही. पूर्ण आधार केवळ सद्गुरूंचाच आहे. त्या आधारावरच प्राप्त परिस्थितीलाही धीरानं तोंड देणं साधू लागेल. इथं सामाजिक परिस्थिती वाईट असली तरी ती आहे तशी स्वीकारा, हे दूरान्वयानंही सूचित करायचं नाही आणि व्यक्ती ही समाजापासून विलग करता येत नाही आणि व्यक्तिगत जीवन आणि सामाजिक जीवन यात आंतरिक बंध असतात, हे जरी खरं असलं तरी ‘मी’शी जखडलेलं जे निखळ आंतरिक जीवन आहे त्यातला भ्रम आणि मोहाचा प्रभाव दूर करण्यापुरतं हे विवेचन आहे. एकदा तो प्रभाव दूर झाला की संकुचित ‘मी’च्या भ्रमजन्य आणि मोहजन्य जगण्यातले धोके जाणवू लागतील आणि मग आहे त्या परिस्थितीलाही निर्भयतेनं सामोरं जाता येईल.  त्याचा सहजलाभ सामाजिक स्थिती पालटण्यासाठीही होईल! पण तो आपला मुद्दा नाही. असो. तर माझ्या चित्तावर सद्गुरू स्वधर्माचे संस्कार करतात म्हणजेच निर्भयतेचे, परिस्थितीच्या स्वीकाराचे, निश्िंचतीचे, नि:शंकतेचे संस्कार करतात! या द्वैतमय जगात मान आणि अपमान, लाभ आणि हानी, यश आणि अपयश, स्तुती आणि निंदा यांना समत्वानं कसं सामोरं जावं, याची शिकवण ते प्रत्यक्ष आचरणातून देतात. कोणत्याही परिस्थितीत आत्मभान, आत्मतृप्ती, आत्मस्वरूपाची धारणा कशी ढळू देऊ नये, हे त्यांच्याइतकं उत्तमपणे कोणीही दाखवू शकत नाही! सर्वोत्तमाचा दासही सर्वोत्तमच असतो ना! म्हणून समर्थ सांगतात..

mira road, Woman Raped, Forced to Convert to Islam, case register against Six Accused, with obscene pictures money extorted, naya nagar police, mira road news, crime news, police,
तरूणीवर बलात्कार, केस कापून केले विद्रुप; मुस्लीम धर्म स्वीकारण्याची सक्ती केल्याचा आरोप
future of ai self awareness
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता स्वजाणिवेचे भवितव्य काय?
Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ

सदा देवकाजीं झिजे देह ज्याचा।

सदा रामनामें वदे नित्य वाचा।

स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा।

जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा।।

संकुचित ‘मी’पणात अडकलेल्या साधकाला व्यापक करण्याचे अखंड कार्य करताना जो सद्गुरू देहकष्टांची तमा बाळगत नाही, ज्याची वाणी सदोदित शाश्वताच्याच उच्चारात रमली असते आणि कोणत्याही परिस्थितीला समत्वानं तोंड देत स्वरूपाची जाणीव कशी टिकवावी, हे जो आचरणातून बिंबवतो तो सर्वोत्तमाचा दास असलेला सद्गुरूच या जगात धन्य आहे.. त्याच्याचमुळे हे जग धन्य आहे!

चैतन्य प्रेम