‘मनोबोधा’च्या १०६व्या श्लोकाच्या पहिल्या दोन चरणांत समर्थ स्थानभ्रष्ट झालेल्या मनाला विवेकानं आवरण्याचा स्वाध्याय सांगत आहेत. स्नानानं जसं आपण शरीर शुद्ध करतो त्याप्रमाणे सद्विचारांनी मन शुद्ध करायचं आहे. त्यानंतर परमतत्त्वाशी जोडणाऱ्या त्या विचारांचं स्मरण, चिंतन आणि मनन करायचं आहे. मग विवेकपूर्वक मनाच्या आवेगांना रोखायचं आहे. वासना नष्ट करणं, हे आपल्या आवाक्यातलं काम नाही; पण आपण मनोवेगांची गती रोखू शकतो आणि हे आपण व्यावहारिक जगातही अनेक वेळा करतो, बरं का!

समजा आपली काहीही चूक नसताना आपला वरिष्ठ अधिकारी आपल्याला काही उलटसुलट बोलला तरी प्रत्युत्तर देण्याची इच्छा आपण मनातच दडपून टाकतो. एखाद्याकडे पाहुणे म्हणून गेलो असलो आणि आपल्या आवडीचा पदार्थ तिथं जेवणात असला तरी तो भरमसाट खाण्याचा मोह आपण दडपून टाकतो. अशी अनेक उदाहरणं आपण विचार केलात तर आठवतील. त्यामुळे मनोवेगांना रोखणं काही अशक्यप्राय गोष्ट नाही. हे मनोवेग जसजसे आटोक्यात येऊ  लागतील तसतसं या आवेगांच्या पकडीत सापडून आपण कसे असाहाय्य झालो होतो.. भावनिकदृष्टय़ा परावलंबी झालो होतो, याची जाणीव होऊ  लागेल. त्यानं विवेकभानच अधिक जागृत होईल.

lakdi pool in Pune
VIDEO : पानिपतच्या युद्धानंतर नानासाहेब पेशव्यांनी तातडीने ‘लकडी पूल’ का बांधून घेतला? वाचा रंजक गोष्ट
What Mahesh Manjrekar Said About Veer Savarkar Film
Exclusive : ‘वीर सावरकर’ चित्रपट का सोडला? अखेर महेश मांजरेकरांनी सांगितलं कारण, म्हणाले, “रणदीप हुड्डाने…”
Gajanan Kirtikar
शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकरांनी सुनावले; म्हणाले, “भाजपाला जनतेचा भक्कम पाठिंबा, ईडीचे प्रयोग थांबवले पाहिजे”
cabinet minister nitin gadkari news
पुढील पंतप्रधान तुम्ही होणार का? नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं…

या श्लोकात अखेरच्या दोन चरणांत समर्थ सांगतात, ‘‘दया सर्व भूतीं जया मानवाला। सदा प्रेमळू भक्तिभावें निवाला।।’’ हे दोन्ही चरण कसे आहेत माहीत आहे का? गावात पावसाळ्यात शेतातल्या बांधावरही गवत उगवलं असतं. त्या बांधावरून वेगानं चालू लागलो तर मध्येच पाय झटकन घसरू शकतो. तसा हा चरण आहे! सरळ अर्थाच्या वाटेनं वेगानं चालू तर फसगत होऊन कधी घसरून पडू, हे कळायचंही नाही! या चरणांचा सरळ अर्थ आहे, सर्व भूतमात्रांशी दयाबुद्धीनं वागणारा सदैव प्रेमळ भक्त भक्तिभावाच्या जोरावर समाधानी होतो. चराचरावर प्रेम करणं, ही गोष्ट चांगलीच आहे; पण मनामागे वाहत जाण्याची सवय जडलेल्या ज्या अविवेकी माणसाला समर्थ विवेकी बनवू पाहात आहेत त्याला एकदम ते सर्व भूतमात्रांवर प्रेम करायला सांगतील का? मग ‘दया सर्व भूतीं जया मानवाला,’ या चरणाचा काय रोख असावा, याचा विचार करू. साधनापथावर येण्याआधी आपण या जगाच्या आसक्तीतच पूर्ण जखडलो होतो.

आपण जसे स्वार्थप्रेरित जगत होतो तसंच जगही माझ्याशी स्वार्थप्रेरित व्यवहारच करीत आलं. जगातल्या अनेकांनी आपल्याला भावनिकदृष्टय़ा, मानसिकदृष्टय़ा आणि आर्थिकदृष्टय़ाही ‘फसवलं’ असण्याची शक्यता आहे. आता या मार्गावर आल्यावर अशा व्यक्तींबाबत आपला व्यवहार कसा असला पाहिजे? तर दयेचा! ज्यांनी ज्यांनी आपल्याला दुखावलं होतं त्यांच्याबद्दल क्षमाशील झालं पाहिजे आणि ज्यांना ज्यांना आपण दुखावलं त्यांचीही मनोमन क्षमा मागितली पाहिजे.

अशा गतकाळात जमा झालेल्या नात्यांबाबत आपण क्षमाशील असलं पाहिजे, दया आणि करुणाभाव ठेवला पाहिजे. जे घडून गेलं त्यांचं ओझं अंत:करणावर लादून जगता कामा नये. कुणाहीबद्दल मनात कटुता उरता कामा नये. ती उरली तर मानसिक अस्थिरता, अशांतता, अस्वस्थता यानं अंत:करण सदोदित धगधगत राहील आणि साधनेतही एकाग्रता येणार नाही.

ज्याच्या चित्तात असा दयाभाव जागृत असेल तोच खऱ्या अर्थानं भगवंताचं प्रेम किंचित का होईना जाणू शकेल. त्याच्याच जगण्यात ओझरता का होईना, त्या प्रेमाचा प्रत्यय इतरांनाही येत राहील. मग सदैव परम प्रेम भावातच जो बुडेल, अशाच भक्ताचं अंत:करण खऱ्या अर्थानं निवेल.. तृप्त होऊ  लागेल.