छत्तीसगडमध्ये गेल्या शनिवारी केलेल्या हल्ल्यात पाच शिक्षक आणि दोन वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याबद्दल नक्षलवाद्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. याला ढोंगबाजी याशिवाय अन्य शब्द नाही. पुन्हा हे काही पहिलेच प्रकरण नाही. एकूणच गेल्या काही महिन्यांत नक्षलवाद्यांना हल्ल्यांनंतर संवेदनशीलतेचा वारंवार झटका येताना दिसतो आहे. त्यामुळे माओवादी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेनंतर गेल्या दहा वर्षांत नक्षलवाद्यांनी जेवढय़ा वेळा हिंसक कारवायांबद्दल माफी मागितली नसेल, तेवढी गेल्या अवघ्या काही महिन्यांत मागितली आहे. काही काळापूर्वी लटेहारमध्ये सीआरपीएफ जवानांवर हल्ला केल्यानंतर एका जवानाच्या मृतदेहावर नक्षलवाद्यांनी बॉम्ब पेरला होता. भारतीय संस्कृती, मग ती नागर असो वा आदिवासींची, त्यात मृतदेहाचा आदर करण्याची परंपरा आहे. मृतदेहाचा वापर बॉम्ब म्हणून करणे हे सैतानी कृत्यच. नक्षलवाद्यांनी ते केले. त्याच्या परिणामांची जाणीव झाल्यानंतर मात्र लगेच भाकपच्या (माओवादी) प्रवक्त्याने जाहीर निवेदन काढून त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. सुकमा आणि बिजापूर भागांतील दोन पत्रकारांच्या हत्येनंतरही माओवाद्यांच्या मध्यवर्ती समितीने जाहीर खेद व्यक्त केला होता. गेल्या ऑक्टोबरमध्ये काँग्रेस नेते नंदकुमार पटेल आणि त्यांचा मुलगा दिनेश पटेल यांची हत्या करण्यात आली. हे बळी गेल्यानंतर, ते कृत्यही चूक असल्याची उपरती माओवाद्यांना झाली. हाच प्रकार या वेळीही घडला आहे. याच माफीनाम्याची पुनरावृत्ती शनिवारच्या हल्ल्यानंतर झाली आहे. शनिवारी नक्षलवाद्यांनी ज्या शिक्षकांची हत्या केली ते सर्व जण निवडणूक केंद्रावरून परतत होते. त्यांच्या बसमध्ये त्यांच्या संरक्षणासाठी सुरक्षा दलाचे जवान होते. दुसऱ्या घटनेत नक्षलवाद्यांनी एका रुग्णवाहिकेला स्फोटाने उडविले. त्यात दोन वैद्यकीय कर्मचारी होते. त्यांच्यासोबतही सीआरपीएफचे जवान होते. तेव्हा नक्षलवाद्यांनी हे हल्ले सुरक्षा दलाच्या जवानांना मारण्यासाठी केले, असे प्रथमदर्शनी दिसते. त्यात हकनाक या निरपराध शिक्षकांचा आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा बळी गेला आणि म्हणून नक्षलवाद्यांच्या या पक्षास वाईट वाटले. त्यातून त्यांनी खेद व्यक्त केला, असे चित्र उभे राहते. तेव्हा प्रश्न असा पडतो की, नक्षलवादी इतके हळवे आणि कोमल हृदयी कधी झाले? आणि कुणाच्या मृत्यूबद्दल त्यांना इतकेच दु:ख होत असेल, तर मग सरळ सरळ हल्ले थांबवावेत. परंतु आम्ही सुरक्षा दलाच्या जवानांची हत्या करणार आणि त्यात क्रांतीकृत्य केल्याचा आनंद मानणार. त्या हल्ल्यांत निरपराध कोणी मारले गेले, तर मात्र त्याबद्दल खेद व्यक्त करणार हा दुटप्पीपणा झाला. सुरक्षा दलाचे जवान हे नक्षलवाद्यांना शत्रूसम वाटावेत यात काही नवल नाही. ते जवान शासकीय यंत्रणेचे भाग आहेत. प्रस्थापित व्यवस्थेचे संरक्षक आहेत, म्हणून ते वर्गशत्रू आहेत. तेव्हा त्यांची हत्या करणे यात गैर काही नाही, असे नक्षलवाद्यांचे म्हणणे असू शकते. पण मग निवडणुकीचे काम करणारे शिक्षक आणि वैद्यकीय कर्मचारी हेही व्यवस्थेचेच भाग आहेत. तेही त्या अर्थाने वर्गशत्रू आहेत. त्यांना मारले तर त्यात खेद मानण्याचे कारण काय? कारण राजकीय आहे. चळवळ संसदीय मार्गानी चाललेली असो वा हिंसक, ती जनतेच्या पाठिंब्याशिवाय फार काळ टिकू शकत नाही. बंदुकीच्या धाकाने भीती निर्माण करता येते, मान्यता नाही. नक्षलवादी अत्याचारांमुळे ती नैतिक मान्यताच संपुष्टात येऊ लागली आहे. हे चळवळीच्या मुळावर येऊ शकते, हे न कळण्याइतके माओवादी नेते निर्बुद्ध नाहीत. तेव्हा अशा प्रत्येक घटनेनंतर लोकांची सहानुभूती दुसरीकडे जाऊ नये याकरिता ही दिलगिरीसत्रे चालविली जात आहेत. त्यातून नक्षलवाद्यांनाही करुणेचा स्पर्श झाला अशा कविता कोणी रचू नयेत, हे बरे.