‘अ-थर्व’ शब्द फार महत्त्वाचा आहे. ‘थर्व’ धातूचा अर्थ ‘चंचल होणे’ असा आहे. त्या चंचलतेचा निषेध करणारा ‘अ-थर्वा’ हा शब्द आहे. म्हणून ‘अ-थर्वा’ शब्दाचा अर्थ शांति, स्थिरता, स्थैर्य, अचंचलता होय. मनाची वृत्ती चंचल असते, त्या वृत्तीचा निरोध करून मनाची चंचलता दूर करणे हे योगाने साधायचे असते (योगश्चित्तवृत्तिनिरोध:). हाच चित्तवृत्तीची चंचलता दूर करण्याचा आशय अथर्वा शब्दात आहे. तेव्हा अथर्व शब्दाचा अर्थ निश्चल, शांत तर ‘शीर्ष’ म्हणजे मस्तक, डोके. अर्थात ‘अथर्वशीर्ष’ म्हणजे डोके शांत ठेवण्याची विद्या! संसारामध्ये त्रिविध तापांनी मनुष्य अत्यंत त्रस्त होतो. त्यामुळे त्याचे डोके फिरू लागते. भ्रम होऊन अशांती व अस्वस्थता वाढू लागते. मनाला शांती मिळत नाही. हे सर्व क्लेश दूर करण्यासाठी आवश्यक असलेला उपाय अथर्वशीर्षांने सांगितला आहे. जे कोणी या अथर्वशीर्षांचा अभ्यास करतील, त्यांची डोकी शांत राहतील. अथर्वशीर्षांला तेच साधावयाचे आहे. या गणपती अथर्वशीर्षांत काय सांगितले आहे, त्याचे सार अत्यंत संक्षेपाने सांगायचे तर- ‘एकच सत्तत्त्व आहे. सर्व विश्व हे त्याचेच बनले आहे. सर्व विश्वाचे रूप हे त्याचेच रूप आहे. वाणी, जीवन, ज्ञान, विज्ञान व आनंद हा सर्व त्याचाच एक भाव आहे. त्याच्याशिवाय येथे दुसरे काही नाही. म्हणून तेच सर्व काही आहे.’ अर्थात, एकच सत्य तत्त्व असून त्याचेच सर्व काही बनले आहे. सर्वाची अखंडित एकता आहे. विविधता असली तरी सर्व भिन्न रूपे तत्त्वत:, वस्तुत: स्वरूपत: एक आहेत, हाच सिद्धांत येथे प्रारंभापासून शेवटपर्यंत सांगितला आहे. हे तत्त्वज्ञान जाणून माणसांची डोकी ठिकाणावर कशी राहतील, असा प्रश्न कुणी करील तर त्याचे उत्तर दिले पाहिजे. दुखांमुळे, कष्टामुळे, संकटामुळे, विघ्नामुळे, शोकमोहामुळे माणसांची डोकी फिरू लागतात. या शोकमोहांचे कारण द्वैत भावना हेच आहे. ‘मी निराळा व जग निराळे, जग माझ्या भोगासाठी आहे, मी काय हवे ते करीन पण उपभोग यथेच्छ मिळवीन, मग मी अशी सुखसाधने मिळवीन की मी सुखी होईन.’ द्वैतभावनेचे, दुहीच्या भावनेचे हे तत्त्वज्ञान सर्व जगात कार्य करीत आहे. दुहीच्या पायावरच सर्व व्यवहार चालत असल्यामुळे एकदुसऱ्याला लुटून सुखी होण्याचा प्रयत्न मनुष्य करीत आहे. सर्व मानवी व्यवहार अशक्तांना सशक्तांनी दडपावे, अशा न्यायाने सुरू आहे. मोठय़ा माशाने लहानाला खावे, असे एकमेकांचे भक्षण होत असल्याने सर्व जनता दु:खी आहे. जोपर्यंत हे द्वैती तत्त्वज्ञान जगात कार्य करीत राहील तोवर जगातील दु:खं नाहीसे होणार नाही. त्यामुळेच आपल्या भक्षणाची भीती आणि आपल्या शक्तीची घमेंड याने जगातील माणसांची डोकी फिरली आहेत. यावर अथर्वशीर्षांचे तत्त्वज्ञान स्वीकारणे, हाच उपाय आहे. या तत्त्वज्ञानाचा जगात प्रसार करून सर्वत्र वैयक्तिक, सामाजिक व जागतिक शांती स्थापन करणे हे सर्व गाणपत्यांचे मुख्य कर्तव्य आहे. त्याची सुरुवात आधी स्वत:पासूनच केली पाहिजे.
(स्वाध्याय मंडळ, पारडी यांनी प्रकाशित केलेल्या ‘श्रीगणेशाथर्वशीर्ष’ या पुस्तकातून संक्षेपाने संकलित.)

It is important to be careful while buying a home
सावधानपणे व्यवहार करणे आवश्यक !
future of ai self awareness
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता स्वजाणिवेचे भवितव्य काय?
peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !