आपापलं कलाभान आपण वाढवायचं असेल, तर काय म्हणजे अभिव्यक्ती आणि काय म्हणजे कला, हा प्रश्न निरनिराळय़ा प्रकारे सोडवून पाहिला पाहिजे. जरा उदारमतवादी दृष्टीनं पाहिलं तर चुकीच्या पद्धतीनं म्हणी वापरूनसुद्धा भाषा टिकवण्याची सांस्कृतिक ऊर्जा दिसतेच हे नक्की, पण तशी सोय चित्रकलेत आहे का?
‘मेलेल्याला मारण्यात काय अर्थ आहे’ हा शब्दप्रयोग बऱ्याच वेळा, बऱ्याच अर्थानी उपयोगात येतो. आपल्या दृष्टीनं गमतीचा भाग म्हणजे, त्यातल्या ‘मेलेला’ आणि ‘मारणं’ या शब्दांच्या अर्थछटा निरनिराळय़ा असू शकतात. आधीच हरलेल्या, पिचलेल्या व्यक्तीला आणखी त्रास देऊ नये, अशा कणवेपासून ते ‘नालायका, तुला मी ठारच मारलंय समज!’ अशा आविर्भावापर्यंत कोणत्याही अर्थानं हा शब्दप्रयोग आजवर केला गेला आहे. त्यातला कोणता चूक आहे आणि कोणता बरोबर, हे सांगायला तज्ज्ञमंडळी तयार असतीलच.  
पण जेव्हा जेव्हा कुणीतरी ‘मेलेल्याला मारण्यात काय अर्थ आहे’ असं म्हणालं / लिहिलं, त्या वेळी / त्या संदर्भात ते म्हणणं बरोबरच होतं, असंही आपल्याला आत्ता गृहीत धरता येईल. ही जी आपली भूमिका आहे ती उदारमतवादी आहे- ‘मेलेल्याला मारण्यात काय अर्थ आहे’ या म्हणीतली चमत्कृती, त्यातला मरणाचा आणि मारण्याचा उल्लेख (त्यात अंतर्भूत असलेली, साध्याच गोष्टींचं गांभीर्य अकस्मात प्रमाणाबाहेर वाढवणाऱ्या अर्थाची शक्यता) आणि अखेर अर्थहीन कृत्यं आपण करायची नसतात याची सुज्ञ जाणीव यापैकी काहीतरी आपलंसं वाटल्यामुळेच कुणीकुणी – चुकीच्या पद्धतीनं का होईना- हा शब्दप्रयोग केला असणार, असा समजूत-दार विचार आपण आत्ता करू शकतो. दुसऱ्याचीही काही बाजू असेल आणि ती त्याच्या दृष्टीनं बरोबर असेल, हा झाला यातला उदारमतवादाचा भाग. आपण इतपत उदारमतवादी असू, तर मग बीकॉम नापास झालेल्या पोराला नोकरी नाही म्हणून आणखी घालूनपाडून बोलू नका, असं त्या पोराच्या वडिलांना सांगणारी त्या पोराची आई आणि एवढय़ा भ्रष्टाचार प्रकरणांनंतर पंतप्रधानांचा राजीनामा हवा की नको यावर गुळमुळीत भूमिकाच घ्यायची असलेला एखादा विरोधी नेता, अशा दोन भिन्न व्यक्तींना, दोन भिन्न प्रसंगांमध्ये आणि संदर्भात, ‘मेलेल्याला मारण्यात काय अर्थ आहे’ या शब्दांचा आधार घेण्याची परवानगी आपण देऊन टाकू. त्यांच्या नैतिकतेच्या पातळय़ा कमीअधिक असल्याचं आपल्याला कळतंय, पण आपण आत्ता तरी उदारमतवादी आहोत- त्यामुळे, ही त्यांची अभिव्यक्ती असू शकते, अभिव्यक्तीसाठी उपलब्ध शब्द-साधनाचा आधार ते घेऊ शकतात हे आपण मान्य करू.
आता पुढला प्रश्न : अभिव्यक्ती म्हणून कश्शालाही मान्यता द्यायची असेल, तर मग ‘कलात्म अभिव्यक्ती’सुद्धा काहीही असू शकते की काय? कोण ठरवणार नि कसं ठरवणार कलात्म अभिव्यक्ती म्हणजे काय, ते?
उत्तर अर्थातच संमिश्र आणि मोठं आहे. आपण ते इथल्या तीन चित्रांच्या संदर्भात शोधू. ही तीन चित्रं निरनिराळी असली तरी एकसारखीच दिसतील, हा योगायोग नाही.  
या चित्रांकडे पाहताना आपल्याला पुन्हा थोडासा ‘मेलेल्याला मारण्या’चा आधार मिळू शकतो, पण थोडासाच.
इथं जे पहिलं चित्र दिसतंय, त्याचं नाव ‘जस्ट व्हॉट इज इट दॅट मेक्स टुडेज होम्स सो डिफरंट, सो अपीलिंग’ (मराठी भाषांतर कठीण आहे म्हणून हिंदी : ‘क्या है वो जो आज के घरोंको बनाता है इतना अनोखा, इतना ललचाता?’) असं जाहिरातीतल्या ओळीसारखं आहे. हे चित्र म्हणजे जाहिरात नाही, उलट ती जाहिरातींच्या जगावरली टीकाच आहे. पण रिचर्ड हॅमिल्टन यानं हे चित्र करण्यासाठी, जाहिरातीच कापून-कापून बरोब्बर चिकटवल्यात. म्हणजे हे रिचर्ड हॅमिल्टननं केलेलं ‘कोलाज’ आहे. हा दोन वर्षांपूर्वीच वारला. अमेरिकेत आणि ब्रिटनमध्ये ‘पॉप आर्ट’ असं नाव ज्याला पडलं, तो कलाप्रवाह हॅमिल्टनच्या याच चित्रापासून सुरू झाला असं त्या देशांमधले तज्ज्ञ मानतात. अँडी वॉरहॉलनं १९६४ मध्ये केलेला ‘ब्रिलो बॉक्स’ हा खोका जेव्हा कलाकृती मानला गेला, तेव्हा तो याच ‘पॉप आर्ट’ याच कलाप्रवाहातला नमुना ठरला, हे आपल्याला माहीत असेल. वॉरहॉलनं काय किंवा त्याच्या आधीच्या हॅमिल्टननं काय, त्यांना दिसत असलेल्या भोग्यवस्तूंच्या, चंगळवादी जगाचा त्रागायुक्त त्रास कधीच करून घेतला नाही. वॉरहॉल तर पॉपवाल्यांसोबत वाहावतच गेला, हॅमिल्टन कायम जमिनीवर राहिला, एवढाच फरक. ‘हे जे आहे ते असंय, त्यामुळं आपली कलादेखील बदलतेय’ एवढंच त्यांना म्हणायचं होतं. हे जे म्हणायचंय ते त्यांनी नव्या प्रकारे म्हटलं, हे अभिव्यक्तीचे नवे प्रकार पुढे जाऊ शकतात, त्यांची स्वतंत्र ‘शैली’ होऊ शकते हे त्यांनी आपापल्या हयातींत वारंवार दाखवून दिलं, म्हणून कलेचा जागतिक इतिहास या दोघांना मोजतो आणि मानतो.
‘मेलेल्याला मारण्यात’ हा शब्दप्रयोग म्हणजे म्हणच होऊन बसलीय, तसंच ‘जस्ट व्हॉट इज इट..’ हे चित्र (आणि त्याचं ते लांबलचक, जाहिरातींतल्यासारखं नाटकी शीर्षक) हीदेखील चित्रकलेतली ‘म्हण’च झालेली आहे. अमेरिकेतल्या चित्रकलावर्गात म्हणे हे चित्र पहिल्या वर्षांच्या पोरापोरींना ‘असाइन्मेंट’ म्हणून देतात- ‘हॅमिल्टनच्या या चित्रासारखंच चित्र तुम्ही हल्लीच्या मासिकांमधल्या जाहिराती किं वा फोटो चिकटवून करायचं’ असा या पोरापोरींचा एक गृहपाठ!
तर आपल्याला इथे जे आणखी एक चित्र दिसतंय, ज्यात केरळी कथकलीचे मुखवटे आहेत, मूळ (हॅमिल्टनच्या) चित्रात जमिनीवर जो ‘स्पूल टेप रेकॉर्डर’ ठेवलाय त्या जागी बाजाची पेटी आहे, मूळ चित्रातल्या ‘यंग रोमान्स’च्या पोस्टरऐवजी आपल्या ‘डीडीएलजे’(दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे)चं पोस्टर आहे, खिडकीतून मूळ चित्रातल्या टोलेजंग इमारतींऐवजी आपली थेटरं / मॉल वगैरे दिसतंय, मूळ चित्रातल्या जिन्यात एक ‘हाउसकीपिंग असिस्टंट’ टेचात लांबलांब होजपाइपचा व्हॅक्यूम क्लीनर घेऊन दिसतीय तिथंच दुसऱ्या चित्रात एक ‘कामवाली बाई’ दिसतीय आणि जिन्यातल्या त्या पायपाच्या जागी नळांच्या पायपाचा कठडा आलाय.. ते हे दुसरं चित्र एखाद्या भारतीयानंच केलंय, यात शंका नाही. विवेक विलासिनी नावाच्या फोटोचित्रकारानं स्वत: टिपलेल्या फोटोंमधून, फोटोशॉपचं तंत्र वापरून अगदी हॅमिल्टनच्या ‘जस्ट व्हॉट इज इट-’सारखंच, अगदी त्याच शीर्षकाचं चित्र घडवलंय. मूळ चित्रातली टीका पुरुष आणि स्त्रियांच्या वस्तूकरणावर होती, असं मानायला जागा आहे.. तसंच, या दुसऱ्या चित्रातली टीका ‘भारत म्हणजे कथाकली, एग्झॉटिक डान्सेस, गॉड्स ओन कंट्री..’ वगैरे भंपक समजांवर वार करणारी आहे, असं मानायला जागा आहे.
विवेक विलासिनीनं केलेलं चित्र, हे काही ‘गृहपाठ’ म्हणून केलेलं नाही. ते ‘हॅमिल्टननंतर बदललेल्या काळामधलं, मूळ चित्राचं एक सांस्कृतिक रूपांतर’ ठरावं, असं विवेकला वाटत होतं. त्याला भारतीयांकडे सरधोपटपणे बघणाऱ्या अनेक पाश्चात्त्यांवर आणि आपण जणू पाश्चात्त्यांना कच्चं खाणारोत (तेही आपली संस्कृती टिकवून) असा ताठा मिरवणाऱ्या काही भारतीयांवर एकाच वेळी टीका करायची होती.
आणखीही एक चित्र आहे. ते असंच इंटरनेटवरच्या ‘आर्चअँडफिल.वर्डप्रेस.कॉम’ या ब्लॉगवर मिळालंय. या चित्रकाराचं धड नावदेखील माहीत नसताना ते इथं आलंय. पण इथेही ‘जस्ट व्हॉट इज इट दॅट मेक्स टुडेज वॉर सो डिफरंट, सो अपीलिंग’ असं शीर्षक आहे. (होमच्या जागी वॉर- त्या अरब घराची एक भिंत तुटलीय, पुरुषाच्या हातात बंदूक आहे, वगैरे..)  हे चित्र पॅलेस्टिनी छावण्यांवरही इस्रायल हल्ले करतं त्याबद्दल असल्याच त्या ब्लॉगवर म्हटलंय, ते तिथं वाचता येतंच.
या तीन चित्रांमधून आपल्या प्रश्नाला मिळणारं उत्तर काय?
वाक्प्रचार वा म्हणी चुकीच्या अर्थानंसुद्धा वापरल्या जातात, तेव्हा त्यात अर्थ चुकला तरी म्हणी वापरण्याची भाषिक-सांस्कृतिक ऊर्जा दिसते.
इथे हॅमिल्टनचं चित्र म्हणीसारखं वापरताना आपापलं राजकारण, आपापलं संस्कृतिकारण त्यात आणणारे आहेत- हॅमिल्टननं त्याच्या वेळच्या (१९५६) जाहिरातजगावर टीका केली, पण पुढल्या चित्रकारांनी निव्वळ ‘फॉर्म’ म्हणून- आकाराचा घाट म्हणून हॅमिल्टनच्या या चित्राचा आधार घेतला आणि टीकेचे आपापले मुद्दे त्याच चित्रात आणले.
जाहिराती चिकटवून चित्र केलं, तेव्हाच हॅमिल्टनला ‘ही काही श्रेष्ठ कला नव्हे. ही तर उपयोजित कला’ असं म्हणणारे शिष्ठ लोक असतीलच. पण हेतू स्पष्ट असेल, स्वत:चं ‘म्हणणं’ चित्रात असेल, तर कुठल्याही प्रकारे केलेली कृती कलाकृती ठरू शकते.
तेव्हा, मेलेल्याला मारण्यातला अर्थसुद्धा प्रत्येक वेळी नव्यानं शोधावा लागणार, हे निराळं सांगायला नकोच.