|| मधु कांबळे

जात सोडण्यासाठी आपणा सर्वानाच मूलभूत धार्मिक जाणिवांच्या विरोधात जावेच लागेल.. त्याखेरीज संविधानाला अभिप्रेत असलेली सामाजिक समता येणार नाही..

दर वर्षी आपण २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करतो. परंतु केवळ एखादा उत्सव साजरा करावा, तसा संविधान दिवस साजरा करणे, संविधानाला पूज्य मानणे किंवा संविधानाच्या प्रतीसमोर नतमस्तक होणे, एवढय़ाने संविधानाला अभिप्रेत असलेला समाज व देश घडत नाही. तर त्यासाठी संविधानाचे म्हणून जे एक समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, न्याय हे मूल्य आहे, तत्त्वज्ञान आहे, ते या भारतीयांच्या मनामनात कसे रुजेल, यासाठी प्रामाणिकपणे सर्वानीच प्रयत्न केले पाहिजेत.

हा देश आणि या देशातील समाज एकसंध व्हावा, यासाठी संविधानाने काय स्वीकारले आहे आणि काय नाकारले आहे, हेही नीट समजून घेतले पाहिजे. संविधानाने समतेचे तत्त्व स्वीकारलेले आहे, याचा अर्थ विषमता नाकारलेली आहे- म्हणजेच विषमतेचे मूळ असलेली जात वा जातिव्यवस्था नाकारलेली आहे. म्हणूनच संविधानाला अभिप्रेत असलेली समता आणण्यासाठी भारतीय समाजातून जात-वर्ण व्यवस्था हद्दपार करावी लागेल. अर्थात तशी ती ‘हद्दपार करतो’ किंवा ‘मानत नाही’ म्हणून होणार नाही तर, तिचे आधार आणि भरणपोषण करणाऱ्या सर्व प्रकारच्या व्यवस्था आणि विचारवाहिन्या जाणीवपूर्वक नेस्तनाबूत कराव्या लागतील.

भारतातील जातिव्यवस्था ही धर्मव्यवस्थेच्या भक्कम पायावर उभी आहे. भारतीय संविधानाने जातीवर आधारित भेदभाव नाकारला, किंबहुना असा भेदभाव करणे हा अपराध ठरविला, म्हणजे एका अर्थाने जातीचे अस्तित्व नाकारले; परंतु जातीचा आधार असलेल्या धर्मव्यवस्थेला हात लावला नाही. एका बाजूला संविधानाने या देशाचा अमुक एक राष्ट्र-धर्म आहे, अशी कोणत्याही धर्माला मान्यता दिली नाही, उलट धर्मनिरपेक्षता या तत्त्वाचा स्वीकार केला. परंतु दुसऱ्या बाजूला भारतीय नागरिकांना धर्माचा प्रचार, प्रसार करणे, उपासना करणे, त्यानुसार आचरण करणे यांसाठी स्वातंत्र्य बहाल केले. संविधानाच्या अनुच्छेद २५ नुसार या देशातील सर्वच धर्माच्या नागरिकांना धर्मस्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार दिला आहे. त्यासाठी काही नैतिक निर्बंध घातले गेले आहेत, हे मान्य. म्हणजे सार्वजनिक व्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य यांना बाधा येणार नाही, अशा प्रकारे सदसद्विवेकबुद्धीस अनुसरून या धर्मस्वातंत्र्याचा वापर करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. परंतु आता जो धर्म येथील जातिव्यवस्थेचा आधार आहे, जो धर्म बुरखा पद्धतीच्या आडून स्त्रियांचे शोषण करतो, जो धर्म विज्ञान नाकारतो आणि चमत्कारालाच भजतो, अशा धर्माचे आचरण ‘सदसद्विवेकबुद्धीला अनुसरून’ केले काय आणि नाही केले काय, फरक काय पडणार आहे? ‘खरे-खोटे, बरे-वाईट, यांसंबंधी विचार करण्याचे मानसिक सामर्थ्य’, असा सदसद्विवेकबुद्धीचा सर्वसाधारण अर्थ मानला जातो. आता आज अस्तित्वात असलेल्या पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, पुनर्जन्म, चमत्कार, भेदभाव, वैरभाव पोसणाऱ्या अशा अवैज्ञानिक धर्माचरणात सदसद्विवेकबुद्धीला किती स्थान आहे? किंबहुना धर्म आणि सदसद्विवेकबुद्धी यांचा मेळ लागू शकतो का, हाच मुळात प्रश्न निर्माण होतो. म्हणजे जातिव्यवस्था किंवा कोणत्याही प्रकारची सामाजिक विषमता व मानवी शोषणाचा आधार धर्म असेल तर धर्मस्वातंत्र्याच्या अधिकाराचा फेरविचार व्हायला हवा- अगदी तो घटनादत्त असला तरीही. त्याशिवाय संविधानाला अभिप्रेत असलेल्या सामाजिक समतेकडे आपण जाऊच शकणार नाही. त्यासाठी घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याच विचाराचा दाखला देता येईल. ते म्हणतात, ‘जसे माणसाच्या कृतीचे मूल्यमापन करण्यासाठी मानक असले पाहिजे, तसेच त्या मानकामध्ये बदल करण्याची तयारीसुद्धा असली पाहिजे’.

डॉ. आंबेडकरांनी भारतातील जातीचा उगम, तिचा विकास, ती हजारो वर्षे टिकून राहण्याची कारणे, आधार आणि या व्यवस्थेच्या संपूर्ण उच्चाटनाचे उपाय काय असू शकतात, त्याचे सद्धांतिक विवेचन जातिव्यवस्थेचे निर्मूलन या पुस्तकात केले आहे. जातीतच विवाह करण्याच्या रूढी-परंपरेमुळे जातिव्यवस्था टिकून राहण्यात हातभार लागला, आजही जातीच्या बाहेर फारसे विवाह होत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जातीची जाणीव नष्ट करण्यासाठी आंतरजातीय विवाह हा एक जातीअंताचा मार्ग त्यांनी सांगितला. मुळात कोणत्याही प्रकारच्या संघर्षांशिवाय, सामंजस्य, सलोखा, संवाद आणि प्रबोधनातून माणसाला, समाजाला आणि देशाला हानिकारक असणारी ही जातिव्यवस्था आपणाला संपवावी लागेल. म्हणूनच शंभर वर्षांपूर्वी शाहू महाराजांनी आणि ऐंशी वर्षांपूर्वी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला आंतरजातीय विवाह हा जातिनिर्मूलनाचा एक उपाय आजही तंतोतंत लागू पडतो. आंतरजातीय विवाहाने काही प्रमाणात जातीचा आधार खिळखिळा होऊ शकतो, अशी त्यांची धारणा होती.

भारतातील जातिव्यवस्थेचा दुसरा भक्कम आधार आहे धर्म! आणि धर्म उभा आहे धर्मशास्त्रे व त्यांच्या पावित्र्याच्या पायावर. एखादी गोष्ट पवित्र आहे, म्हटले की मग त्याला हात लावायचा नाही. एखाद्या गोष्टीला पावित्र्य बहाल केले की, ती गोष्ट चांगली की वाईट, याची चिकित्सा करणे बंद होऊन जाते. त्यामुळे जातीचा आधार धर्म, धर्माचा आधार धर्मशास्त्रे आणि धर्मशास्त्राचा आधार पावित्र्य या संकल्पना भारतीय समाजाच्या मेंदूतून कशा हद्दपार करायच्या हा खरा गंभीर आणि नाजूक प्रश्न आहे. धर्म ही गोष्टच मुळात केवळ नाजूक किंवा संवेदनशीलच आहे असे नव्हे, तर ती स्फोटकही आहे. जगात धर्माइतकी मानवी हानी अन्य कोणत्याही व्यवस्थेने केलेली नाही; तरीही जगातील प्रत्येक माणसाला धर्म पूजनीयच वाटतो. असे का तर, धर्म हा काही मूठभर लोकांसाठी सत्ता, संपत्ती व वर्चस्व गाजविण्यास उपयोगी ठरतो, हे त्याचे कारण आहे. डॉ. आंबेडकरांच्या शब्दांत सांगायचे झाले तर : धर्म, सामाजिक दर्जा आणि संपत्ती हे सर्व दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर निर्बंध लादण्यासाठी, माणसाला उपलब्ध असलेले सत्ता आणि अधिकाराचे स्रोत आहेत.

माणसाला गुलाम करणाऱ्या धर्मसत्तेविरोधात बंड झालेच नाही असे नाही. देशोदेशी त्याविरोधात चळवळी झाल्या, आजही होत आहेत. जगभरातील तत्त्वचिंतकांनी धर्मचिकित्सा केली. ‘धर्माशिवाय माणूस माणसासारखा जगू व वागू शकतो,’ हेही त्यांनी मानवी समाजाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. जगप्रसिद्ध तत्त्ववेत्ता बट्र्राड रसेल यांनी ‘व्हाय आय अ‍ॅम नॉट ए ख्रिश्चन’ या पुस्तकात म्हटले आहे की, सर्वच धर्म हे हानिकारक व असत्य आहेत.

तरीही अगदी आजच्या युगातही अर्थसत्तेइतकीच- किंबहुना तिच्यापेक्षा काकणभर अधिक म्हणता येईल अशी- ती धर्मसत्ताच प्रभावशाली ठरते आहे. आणि म्हणून भारताच्या बाबतीत बोलायचे झाले तर, जातीअंतासाठी धर्मसत्ता प्रभावहीन करणे अपरिहार्य आहे. त्या संदर्भात बाबासाहेबांनी केलेली तर्कशुद्ध मांडणी आपण सर्वानीच पूर्वग्रह बाजूला ठेवून नीट समजून घेतली पाहिजे.

‘जर एका विशिष्ट काळात, एका विशिष्ट समाजात सत्ता आणि वर्चस्वाचे उगमस्थान सामाजिक आणि धार्मिक असेल तर, परिवर्तनासाठी सामाजिक आणि धार्मिक सुधारणांचा अंगीकार करण्याची नितांत आवश्यकता आहे’, असे बाबासाहेबांनी म्हटले आहे. जात, धर्म आणि धर्मशास्त्रे यांचा अतूट संबंध सांगताना ते म्हणतात, ‘जात पाळण्यात लोकांची चूक नाही. चूक जातीची भावना त्यांच्या मनावर ठसविणाऱ्या धर्माची आहे, असे माझे मत आहे. हे बरोबर असेल तर, साहजिकच तुम्हाला ज्याचा सामना करावा लागणार आहे, तो तुमचा शत्रू जात पाळणारे लोक नसून, त्यांना जातीचा धर्म शिकविणारी धर्मशास्त्रे आहेत..’ लोकांचे वर्तन हा केवळ धर्मशास्त्रांनी त्यांच्या मनावर ठसवलेल्या श्रद्धांचा परिणाम आहे आणि धर्मशास्त्रांवरच्या पावित्र्यावरचा लोकांचा विश्वास नष्ट झाल्याशिवाय लोक त्यांचे आचरण बदलणार नाहीत, असे त्यांनी निक्षून सांगितले आहे.

‘प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला धर्मशास्त्रांच्या दास्यातून मुक्त करा, धर्मशास्त्रांवर आधारलेल्या विनाशकारी जाणिवांपासून त्यांची मने शुद्ध करा, मग तुम्ही त्याला अथवा तिला न सांगताही ते आंतरजातीय सामूहिक भोजन व आंतरजातीय विवाह करतील,’ असे त्यांनी म्हटले आहे. जातिव्यवस्था निर्मूलनासंबंधीचे विचार व मार्ग यावरून महात्मा गांधी व बाबासाहेब आंबेडकर यांच्यात टोकाचे मतभेद होते. त्यावरून या दोन राष्ट्रपुरुषांमध्ये मोठा वैचारिक संघर्षही झडला. परंतु ‘जातिव्यवस्था निर्मूलन’ या पुस्तकात बाबासाहेबांनी जी धर्मचिकित्सा केली, त्याचा प्रतिवाद करताना गांधीजींनी प्रांजळपणे आंबेडकरांच्या काही मूलभूत विचारांचे व भूमिकेचे समर्थन केले. जर धर्मशास्त्रे आज आपल्याला माहीत आहेत तितक्या हिडीसपणे जातीला पुष्टी देत असतील, तर मी स्वत:ला हिंदू म्हणवणार नाही आणि हिंदू राहणार नाही, असे गांधीजींनी म्हटले आहे.. (जातिव्यवस्थेचे निर्मूलन- पान-७४ ). गांधीजींची ही भूमिका फार महत्त्वाची आहे.

बाबासाहेब अंतिमत: म्हणतात, ‘जातीला दैवी आधार आहे. जातीला चढवलेला दैवी मान्यतेचा पोषाख तुम्ही फाडलाच पाहिजे. अंतिम चिकित्सेत त्याचा अर्थ असा की, तुम्ही धर्मशास्त्रे आणि वेद यांची सत्ता उद्ध्वस्त केलीच पाहिजे.’ बाबासाहेबांचे हे विचार त्या वेळी आणि आजही जहाल वाटत असले तरी, जातिव्यवस्थेच्या निर्मूलनासाठीची ही तर्कशुद्ध मांडणी आहे. भारतीय समाजमनातील जात जाणीव पुसून टाकण्यासाठी हाच प्रभावी उपाय आहे. जात सोडण्यासाठी आपणा सर्वानाच मूलभूत धार्मिक जाणिवांच्या विरोधात जावेच लागेल. भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेल्या सामाजिक समतेकडे जाण्याचा हाच खरा शाश्वत मार्ग आहे.

madhukar.kamble@expressindia.com