scorecardresearch

साम्ययोग : श्रमता कांतता..

शरीर दुबळे असतानाही विनोबा एवढे अजस्र काम करत की पाहणाऱ्यांना भीतीयुक्त आश्चर्य वाटे.

– अतुल सुलाखे jayjagat24@gmail.com

मराठी संतांचा विशेष सांगताना विनोबांनी, खुद्द देवालाच या भागवतांनी श्रमाची दीक्षा दिली, अशा आशयाचे विधान केल्याचे दिसते. ‘आता यापुढे विटेवरच उभा राहू नकोस. आमच्या सोबत कामही कर,’ इतके हे सांगणे थेट होते. देवानेही तसे आचरण केले. ‘योग-साधनेची पूर्वअट म्हणजे आठ तास शरीरपरिश्रम,’ असेही विनोबा म्हणत. विनोबांच्या या चिंतनाला गांधीजींच्या पहिल्या भेटीमुळे चालना मिळाली. गांधीजी तर केवळ व्यायामाला ‘अनुत्पादक श्रम’ मानत. व्यायाम प्रकार असा निवडायचा की ज्यामुळे आपल्या नित्याच्या कामात अडथळा येणार नाही. म्हणून ते फिरतानासुद्धा मुलाखती देत.

कोचरब आश्रमात विनोबा दाखल झाले तेव्हा बापू भाजी चिरत होते. देशपातळीवरचा प्रमुख नेता भाजी चिरतो आहे हे पाहून विनोबा चकित झाले. एवढेच नव्हे तर भाजी चिरणे, स्वयंपाक करणे हीदेखील देशसेवा आहे हेही त्यांच्या ध्यानी आले. ‘गांधीजींच्या प्रथम दर्शनाने मला श्रमाचा पाठ मिळाला,’ हे विनोबांचे उद्गार बोलके आहेत.

गांधीजी एवढय़ावर थांबले नाहीत. त्यांनी विनोबांकडे आपल्या कामाचा थोडा भार दिला. घरकामाची सवय नसणाऱ्या विनोबांना थोडे अवघडल्यासारखे झाले. गांधीजींनी ही गोष्ट ताडली. ‘घरकामाची सवय नाही?’ एवढेच त्यांनी विचारले.

पुढे विनोबांनी हे ‘श्रमव्रत’ फार झपाटय़ाने आचरणात आणले. आश्रमीय जीवनात, भागवतातील ‘जडभरत’ त्यांचा आदर्श होता. त्याच्याप्रमाणे शून्यवत् होऊन राहावे असा प्रयत्न ते करत. संडास सफाई, दळणे आणि विणणे या तीन गोष्टींना गांधीजींनी प्राधान्य दिले होते.

शरीर दुबळे असतानाही विनोबा एवढे अजस्र काम करत की पाहणाऱ्यांना भीतीयुक्त आश्चर्य वाटे. गांधीजींच्या ध्यानात ही गोष्ट आली. एक दिवस त्यांना बरोबर फिरायला नेले आणि विचारले, ‘तुमच्याकडे मी पाहात नाही असे समजू नका. एवढे कष्ट तुम्ही कसे करता?’

विनोबांनी उत्तर दिले, ‘शक्ती ही शरीराची नाही; आत्म्याची आहे.’ त्यांच्या या उत्तरानंतर दोघांत सखोल चर्चा झाली. हा तरुण मनस्वी आणि वैराग्यशील आहे. काहीतरी अनुभवातून हा बोलतो, हे गांधीजींच्या लक्षात आले. भाजी चिरण्यापासून सुरू झालेला हा संवाद आत्म्याविषयीच्या बोलण्यावर स्थिरावला.

पुढच्या संपूर्ण आयुष्यात विनोबांनी हा परिपाठ सोडला नाही. आठ तास शरीरपरिश्रम आणि मग वाचन, लेखन आणि चिंतन असा त्यांचा क्रम होता. यात डावे उजवे असे काही नव्हते. श्रम आणि चिंतन यांना त्यांच्या लेखी समान महत्त्व होते. त्यांचा आदर्श असणाऱ्या संतांनी आपापल्या कामातूनच त्या परम सत्याचे दर्शन घेतले होते.

जनाबाईंना ते ‘महाराष्ट्राची लाडकी’ म्हणत. या लाडक्या व्यक्तिमत्त्वाने दळण आणि कांडण करतच त्या अनंताला जाणले होते. विनोबांच्या साम्ययोगाचे सारही हेच आहे. गीतेवरचे त्यांचे तमाम चिंतन परिश्रमावर उभे आहे. जनाबाईंच्या शब्दात थोडा बदल केला की विनोबांचे चरित्र सांगता येते.

‘श्रमता-कांतता। तुज गाईन अनंता।।

न विसंबे क्षणभरी। तुझे नाम गा मुरारि।।

नित्य हाचि कारभार।

मुखी ‘राम-हरि’ निरंतर।’’

मराठीतील सर्व साम्ययोग ( Samyayog ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta samyog acharya vinoba bhave thought zws

ताज्या बातम्या