scorecardresearch

साम्ययोग : वैराग्ययुक्त समाजसेवा

आपले जगणे स्वतंत्र हवे असेल तर आपल्या वागण्यात संयम हवा. विनोबांचे ‘विचार पोथी’ एक पुस्तक आहे.

vinoba

अतुल सुलाखे  jayjagat24 @gmail.com

न कर्मारंभ टाळूनि

लाभे नैष्कम्र्य तें कधीं

संन्यासाच्या क्रियेनें चि

कोणी सिद्धि न मेळवी – गीताई, ३-४

..धार्मिक तत्त्वांचा समाजात प्रसार करण्यास कोणत्याही राष्ट्रात विशेषत: परतंत्र राष्ट्रात, नुसती शांकरभाष्ये, अगर त्यावरील प्रवचने उपयोगी न पडता, साक्षात् राजकारणात आणि समाजकारणात उतरून त्यांच्या नित्याच्या व्यवहारात ती आचरून घ्यावी लागतात. उदाहरणार्थ, ज्या समाजात इंग्रजात दीड आत्मा आणि अंत्यजात अर्धा आत्मा दिसतो, त्या समाजाला, ‘सर्वा भूती देख एक आत्मा’ हे तत्त्व पटविण्यास सत्याग्रहासारखे धीट प्रयोग किंवा अस्पृश्यता निवारणासारखी नम्र प्रायश्चित्ते प्रत्यक्ष करवून घेतल्याखेरीज नुसती अद्वैताची प्रवचने उपयोगी पडतील काय?..

विनोबा, रामदासांची भजने, प्रस्तावनेतून.

साम्ययोग जाणून घेताना, विनोबांचे ऐहिक प्रश्नांचे आकलन माहीत हवे. विनोबांच्या आध्यात्मिक विचारविश्वाची आपल्याला थोडीफार कल्पना असते. परंतु विनोबांची लोकाभिमुखता आणि ऐहिक प्रश्नांचे त्यांचे आकलन या विषयावर सहसा बोलले जात नाही. विनोबा म्हणजे अध्यात्म, अशी बहुतेकांची समजूत दिसते. त्यात तथ्य नाही.

अगदी गीता प्रवचनांच्या १६ आणि १७ या दोन अध्यायांवर सहज नजर फिरवली तरी आपल्या जगण्यातील समस्या आणि त्या सोडवण्याचा नेमका मार्ग या गोष्टी समजतात. यातील १७ व्या म्हणजे ‘साधकाचा कार्यक्रम’ या अध्यायातील आरंभीचे साम्यसूत्र पाहिले की जगण्याचा साम्ययोग प्रणीत मार्ग दिसतो. ‘सुबद्ध वर्तनाने वृत्ति मोकळी राहत’ अशी विनोबांची दृष्टी आहे.

आपले जगणे स्वतंत्र हवे असेल तर आपल्या वागण्यात संयम हवा. विनोबांचे ‘विचार पोथी’ एक पुस्तक आहे. त्या पुस्तकातील एक विचार, ‘वर्तनाला बंधन घातले की वृत्ती मोकळी राहते,’ असा आहे. या सूत्रात, गेल्या काही दशकांमधे सातत्याने ढासळत चाललेल्या आपल्या जगण्याचे विश्लेषण आणि ते दुरुस्त करण्याच्या गोष्टी दिसतात. तत्पूर्वी सोळाव्या अध्यायात त्यांनी दैवी आसुरी संपत्तीचा संघर्ष नव्या संदर्भात सांगितल्याचे दिसते. विनोबांनी सहा दशकांपूर्वी मांडलेल्या समस्या आज अधिकच तीव्र बनल्याचे जाणवते.

विनोबांच्या या आकलनाला परंपरेने विशेषत: संतांच्या शिकवणीने दिशा दिली. त्यांच्या मते, सर्व संतांची मुख्य प्रेरणा धर्म जागरणाची होती. त्या कार्याचा एक भाग म्हणून संतांनी ऐहिक जीवनाचे महत्त्व सांगितले.

संतांची ही शिकवण विनोबांनी इतकी आत्मसात की समर्थ रामदासांकडून त्यांनी प्रपंच त्यागाची प्रेरणा घेतली, तो थाटण्याची नव्हे. समर्थाचे मुख्य कार्य धर्मजागरणाचे होते हे त्यांनी विस्ताराने वरील प्रस्तावनेतही नोंदवले आहे.

ऐहिक की पारमार्थिक, आरंभ कुठल्या उन्नतीपासून करायचा असा प्रश्न विनोबांना कधी पडलाच नाही. कारण दोन्ही प्रकारचा उत्कर्ष एकाच वेळी साधायचा असतो हे सूत्र त्यांना वेळीच गवसले होते. इथेही त्यांना आईच गुरुस्थानी होती.

रुक्मिणीबाईंनी विनोबांना एक विचार दिला. ‘देश सेवेच्या जोडीने भजनही हवे.’ समर्थप्रणीत ‘चळवळीचे सामर्थ्य आणि धर्माचे अधिष्ठान’ यांचे ऐक्य, त्या सामान्य म्हटल्या जाणाऱ्या स्त्रीने, आपल्या मुलासमोर अगदी सहजपणे ठेवले.

व्यास, आचार्य शंकर, ज्ञानदेव, समर्थ रामदास यांचा आदर्श असणारा हा युवक गांधीजींच्याकडे कसा आणि का आकर्षित झाला हेही शोधायला हवे.

मराठीतील सर्व साम्ययोग ( Samyayog ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta samyog loksatta samyog acharya vinoba bhave spiritual thought zws