अतुल सुलाखे  jayjagat24@gmail.com

दानं स्वधर्मो नियमो यमश्च

श्रुतं च कर्माणि च सद्व्रतानि ।

सर्वे मनोनिग्रहलक्षणान्ता:

परो हि योगो मनस: समाधि: ॥

दान, स्वधर्माचरण, यम, नियम, वेदाध्ययन आणि सत्कर्म आणि उत्तम व्रते या सर्वाचे अंतिम फलित म्हणजे मन एकाग्र होणे. मन साम्यावस्थेत राहणे हा खरोखर परम योग होय.

भागवत धर्म सार – अ. २३ श्लोक – ४५

समत्व, साम्य आदी शब्द समोर आले. सामाजिक, आर्थिक, अशी विविध प्रकारची विषमता दूर करून समत्वाची स्थापना डोळय़ांसमोर येते. या समतेचे क्रांती, नवीन समाधिष्ठित व्यवस्था, शोषणमुक्ती आदी संकल्पनांनी वर्णन केले जाते. साम्ययोगात प्राय: तीन साम्यांचा विचार दिसतो. त्यापलीकडे परम साम्याची स्थिती आहे हे लक्षात घ्यावे.

आर्थिक साम्य प्रत्येक व्यक्तीला व्यवहारात सहायक ठरते. सामाजिक साम्य असेल तर व्यवस्था टिकून राहाते. या दोन्ही साम्यावस्थांना पोटात घेणारी अवस्था मानसिक साम्याची आहे. मानसिक साम्यामुळे मनाचे संतुलन कायम राहाते. मनाचे संतुलन नसेल तर अतिसुखामुळे आणि अति दु:खामुळे बसणारे हादरे सारखेच असतात. त्यामुळे मानवी जीवन केवळ अस्थिर होते. ही अस्थिरता दूर करायची तर मानसिक साम्य हवे. इतकेच नव्हे तर आर्थिक आणि सामाजिक साम्यापेक्षाही मानसिक साम्य गरजेचे आहे.परम साम्य विश्लेषित करताना विनोबांनी भागवतातील, शुकाचार्याचे वचन उद्धृत केले आहे.

‘परो हि योगो मनस: समाधि:’, ‘सर्वे हि योगा मनोनिग्रहांता:’ सर्व योगांमधे मनोयोग श्रेष्ठ आहे असा या वचनांचा साधारण अर्थ आहे. आर्थिक, सामाजिक आणि मानसिक साम्याची स्थापना झाली की परम साम्य आपोआपच हाती येईल असे वाटणे स्वाभाविक आहे. परंतु विनोबांची परम साम्याची व्याख्या निराळी आहे.

तिची थोडी ओळख साने गुरुजींच्या इस्लाम धर्माचा परिचय करून देणाऱ्या पुस्तकात आली आहे. कोणत्याही विषयाचे तत्त्वज्ञानाच्या पातळीवर जे आकलन होते त्यापेक्षा आध्यात्मिक पातळीवर होणारे आकलन अधिक सूक्ष्म आणि सुंदर असते, हे गुरुजींचे निरीक्षण परम साम्याच्या विनोबांच्या स्पष्टीकरणात प्रत्ययास येते.

तिन्ही साम्ये कवेत घेणारे आणखी एक साम्य आहे आणि ते म्हणजे बह्म. परम साम्य म्हणजे ब्रह्म. थोडक्यात ब्रह्म प्राप्ती हे मानवी जीवनाचे अभिध्येय आहे. ब्रह्म प्राप्ती म्हणजे सर्वव्यापी तत्त्वाशी एकरूप होणे. ब्रह्म या शब्दाचा अर्थ आत्यंतिक व्यापक हा आहे. विज्ञान आणि नैतिकता यांच्या कक्षेबाहेरचे हे साम्य आहे. म्हणूनच त्याला परम साम्य म्हटले आहे. इथे एक पेच उद्भवतो. परम साम्य म्हणजे ब्रह्म प्राप्ती असे असेल तर विनोबांनी साम्य शब्द का वापरला असावा? भारतीय धर्म चिंतनामधे ब्रह्मसूत्रांना अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. ‘अथातो ब्रह्म जिज्ञासा’ ही ब्रह्म सूत्रांची सुरुवात आहे. ती लक्षात घेता साम्य शब्दाऐवजी ब्रह्म शब्दाचा उपयोग सयुक्तिक ठरला असता. अथातो साम्य जिज्ञासा असेही म्हणता आले असते. परंतु साम्य आणि अभिध्येय या दोन शब्दांची योजना करून विनोबा त्यांचे नाते ब्रह्माशी जोडतात.

हा परस्परसंबंध ओढून ताणून आणलेला आहे की स्वाभाविक आहे?