अतुल सुलाखे jayjagat24@gmail.com

गीताईच्या प्रस्थान त्रयीतील तिसरा ग्रंथ म्हणजे ‘गीताई चिंतनिका’. ती विवरणासहदेखील उपलब्ध आहे. हा ग्रंथ म्हणजे एका बृहत् कोशाची निराळी मांडणी आहे. गीताईच्या अध्ययनात या ग्रंथाला असणारे महत्त्व लक्षात घेता विनोबांमधील संशोधक माहीत असेल तर ते उपयुक्त होईल.

विनोबांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोश वाङ्मयात केलेले कार्य अद्भुत आहे. गीता, ज्ञानेश्वरी, पाच प्रमुख संतांच्या वाङ्मयाची निवड, त्या अनुषंगाने लिहिलेल्या प्रस्तावना, कठीण शब्दांचे अर्थ, संतांच्या कृतींमधील साहित्य गुण दाखवणारे कोश, असा हा पैस आहे. उपासना, अभ्यास आणि आचरण या तिन्ही पातळय़ांवर विनोबादि अध्यात्मकेंद्री संशोधनाचा आदर्श ठेवला आहे. याला संशोधनाची शिस्त दिसते. उदाहरणार्थ, ज्ञानेश्वरीमध्ये हिंसासूचक एकही शब्द नाही अशा आशयाचे विधान, विनोबांनी केले. शिवाजीराव भावे यांनी या अंगाने ज्ञानेश्वरीचे संशोधन केले आणि विनोबांना असे एक स्थळ दाखवले.

गीतेच्या बाराव्या अध्यायात भक्त लक्षणे सांगितली आहेत. त्यात – ‘जो न लोकांस कंटाळे ज्यास कंटाळती न ते,’ असे दुहेरी लक्षण आहे. त्यावर भाष्य करताना ज्ञानदेवांनी, ‘सागराच्या भरतीने तिथल्या जीवांना भय वाटत नाही आणि त्या जलचरांमुळे समुद्र जसा कंटाळत नाही’, ‘त्याचप्रमाणे उन्मत्त जगामुळे ज्याला खेद होत नाही आणि ज्याच्यामुळे लोकांना त्रास होत नाही.’ या आशयाच्या दोन ओव्या लिहिल्या आहेत.

शिवाजीरावांनी विनोबांना या ओव्या दाखवल्या आणि म्हटले की ‘ज्ञानदेवांनी जगाला जे ‘उन्मत्त’ विशेषण जोडले आहे, त्यातून समाजाने ज्ञानदेवांसोबत केलेले वर्तन सूचित होते’. विनोबा चकित झाले आणि हे शोधन मार्मिक असल्याचेही त्यांनी मान्य केले. परंतु त्यांनी स्वत:चा अर्थही सांगितला : समुद्र नेहमी खळबळ करणार. मात्र जलचरांना त्याचा त्रास होत नाही. ते मुक्त संचार करतात आणि समुद्रालाही त्याचे काही वाटत नाही.

तद्वत जगाने ज्ञानदेवादि भावंडांसोबत ‘उन्मत्त’ व्यवहार केला असला तरी माउलींनी तो तसा मानला नाही. उलट जगाचे ते स्वाभाविक वर्तन मानून आपली करुणा वृत्ती कायम राखली. त्यामुळे ही ओवी ‘कटाक्ष-सूचक’ नसून ‘कारुण्य-सूचक’ म्हणावी लागेल.

दुसऱ्या व्यक्तीच्या अभ्यासाचा आदर करायचा, प्रसंगी तिने धाडसी विधान केले तरी स्वत:ची भूमिका अभ्यासपूर्वक मांडायची. एवढेच नव्हे तर ती भूमिका मान्य झाली तरच स्वीकार असेही सांगायचे. अभ्यासाची ही रीत शास्त्रीय पद्धतीने संशोधनाची आहे. विनोबांवर शंकराचार्य, ज्ञानदेव, तुकाराम आदींच्या शिकवणुकीचा जसा प्रभाव दिसतो तसाच बडोद्याच्या ग्रंथालयात केलेला ज्ञानसंचय, इतिहासाचार्य राजवाडे यांच्या साहित्याचे परिशीलन, प्राज्ञ पाठशाळा, इत्यादींचा ठसा, भारतीय दर्शनांची छाप यातून त्यांच्यातील संशोधकाची घडण दिसते. गीता प्रवचने, स्थितप्रज्ञ दर्शन, गीताई चिंतनिका या ग्रंथांमधून तो अगदी सहज दिसतो. खुद्द गीताईसुद्धा सोपी नाही. कारण तिच्याही पाठीशी व्यासंग आहे. विनोबांचे अध्ययन माहीत नसेल तर त्यांचे वाङ्मय अवघड वाटते. त्यांच्या संशोधनाला उपासना, अभ्यास आणि आचरण या तिन्ही तत्त्वांचा आधार आहे. संशोधनाचा हा त्रिकोण एकदा ध्यानी आला की विनोबांचे साहित्य आपली सोबत करते.