मुकुंद संगोराम

महात्मा फुले यांनी १८४८ मध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली, तर १९०८ मध्ये गांधर्व संगीत विद्यालयात महिलांसाठी विशेष वर्ग सुरू झाले. त्याहीनंतर महिला संगीतक्षेत्रात केंद्रस्थानी येऊ शकल्या नाहीत हे खरे; पण परंपरा राखू पाहणाऱ्या भारतीय अभिजात संगीताच्या क्षेत्रात नवनिर्माण तेव्हापासूनच होत राहिले..

भारतीय स्वातंत्र्याच्या काहीच वर्षे आधी संगीताचे जाहीर जलसे होऊ लागले होते. तोवर भारतीय संगीत दरबारांत, देवालयांत नांदत होते. याच काळात विष्णु दिगंबर पलुस्कर यांच्यासारख्या द्रष्टय़ा कलावंताने संगीत अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू केला. परिणामी कलावंतांना राजमान्यतेशिवाय लोकमान्यताही मिळू लागली. संगीत नाटकामुळे अभिजात संगीत आधीच जनसामान्यांपर्यंत पोहोचू लागले होते आणि प्रचंड लोकप्रियही होऊ  लागले होते. एरवी प्रबळ इच्छा असूनही ते ऐकण्याची कोणतीच सार्वजनिक व्यवस्था नव्हती. संगीत परिषदा, जलसे होऊ  लागल्यावर परिस्थिती पालटू लागली. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस संगीत नाटकांचे खेळ सुरू झाले, त्यालाही अनेक सामाजिक-राजकीय  कारणे घडली असावीत. ब्रिटनमधील त्या काळापासून आजपर्यंत मान्यता पावलेल्या ‘इकॉनॉमिस्ट’ या नियतकालिकाचा संस्थापक आणि अर्थशास्त्री जेम्स विल्सन याने या देशात १८६० मध्ये पहिल्यांदा प्राप्तिकर लागू केला. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात झालेल्या प्रचंड  खर्चाची वसुली करण्यासाठी ब्रिटिशांनी हा कर लादला. अधिक उत्पन्न करपात्र करण्याच्या या योजनेने त्या वेळी देशात हलकल्लोळ माजला खरा, मात्र त्याचा उलट परिणाम असाही झाला की, आता गोऱ्यांचे राज्य या देशातून जाण्याची शक्यता अधिकच मावळल्याची भावना जनमानसात पसरू लागली. रोजचे जगणे रुचिकारक करण्यावाचून तेव्हा पर्यायही राहिला नसावा. महाराष्ट्रापुरती संगीत नाटकाच्या उगमाला काही अंशी सामाजिक आणि राजकीय परिस्थितीही कारणीभूत झाली. त्याचा संगीतावर झालेला परिणाम मात्र फारच उपकारक ठरला. तिकडे ग्वाल्हेर प्रांती अभिजात संगीताचा यज्ञकुंड धगधगत होता आणि देशातील अनेक भागातून केवळ संगीताचा व्यासंग करू इच्छिणारे तिकडे जाऊ  लागले होते. पुण्याच्या तुळशीबागेत राहणारे परांजपे नामक कलावंत ग्वाल्हेर घराण्याची अस्सल तालीम घेऊ न तिकडेच स्थायिक झाले. ‘देवजीबुवा’ या नावाने त्यांचा त्या भागातील दरारा चांगलाच वाढू लागला होता. इचलकरंजीहून ग्वाल्हेरला गेलेले बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर संगीताचे शिक्षण घेऊ न महाराष्ट्रात परतले, तोवर संगीत नाटकाने चांगलेच बाळसे धरले होते.

स्वातंत्र्याच्या आधीही अभिजात संगीताच्या प्रसारासाठीचे प्रयत्न  सुरूच होते. संगीताचे शिक्षण देण्यासाठी त्या काळात असलेल्या गुरुकुल पद्धतीला छेद देणाऱ्या नव्या शिक्षण व्यवस्थेलाही सुरुवात झाली होती. बाळकृष्णबुवांचे शिष्योत्तम विष्णु दिगंबर (पलुस्कर) यांनी गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली होती आणि त्या काळातील संपूर्ण भारतात त्याच्या शाखाही सुरू केल्या होत्या. अगदी लाहोरमध्येही गांधर्व महाविद्यालय सुरू करण्यासाठी त्यांनी आपले शिष्य धाडले होते. संगीताच्या या औपचारिक शिक्षणासाठी विष्णु दिगंबरांनी पाठय़पुस्तके ही तयार केली. राग परिचयासाठी आणि प्राथमिक शिक्षणासाठी ही पाठय़पुस्तके प्रसिद्ध केली जात होती. त्याचा एक परिणाम असाही झाला, की अभिजात संगीताच्या प्रसाराला वेग आला आणि त्याबद्दलचे जनमानसातील कुतूहलही वाढीस लागले. संगीताची ही प्रयोगशाळा संपूर्णपणे यशस्वी झाली असे म्हणता येणार नाही; मात्र त्याचा संगीतासाठी उपयोगच झाला नाही, असे म्हणणे अन्यायकारकच ठरेल. अभिजात संगीताबद्दल रसिक म्हणून जी जिज्ञासा उत्पन्न व्हायला हवी, ती निर्माण होण्यास या शिक्षण पद्धतीचा उपयोग झालाच झाला. मात्र मैफिली गवय्ये निर्माण होण्यासाठी गुरुमुखी परंपराच अधिक उपयोगाची, ही अनुभवान्ती झालेली धारणा मान्यता पावली. हे सगळे विसाव्या शतकाच्या आरंभापासून घडत आले. संगीताबद्दलची गोडी निर्माण होण्यासाठी सार्वजनिक पातळीवरील शिक्षण आवश्यक होते, तरीही संगीतातील सर्जनाची वाट दाखवण्यासाठी गुरूच्या समोर बसून ‘तालीम’ घेणे याला पर्यायच नव्हता आणि आजही नाही.

परंपरेने आलेल्या संगीतात स्वत:ची मोलाची भर घालून ते  पुढील पिढीकडे सोपवताना, आणखी नवे काही नवसर्जन करण्याची प्रेरणा देणारा असा हा संगीत शिक्षणाचा अद्भुत प्रकार होता. गुरूने शिकवलेले, घोटून घोटून जसेच्या तसे गात राहणे, याला संगीताच्या दुनियेत मान्यता नसते. प्रत्येक कलावंताला रसिकाकडून मनातल्या मनात विचारला जाणारा प्रश्न हाच असतो, की गुरूने काय शिकवले ते कळले; त्यात तुझे योगदान काय? संगीत पुढे जाण्यासाठी कलाकाराकडून नेमके  काय घडले, याचा विचार रसिक करू लागल्याने कलावंतांसमोर एक आव्हान उभे ठाकले. त्यामुळेच संगीत प्रवाही राहिले आणि तरीही त्याने परंपरेशी पूर्णपणे फटकून राहण्याचा जरासुद्धा विचार के ला नाही. परंपरा समजून घेतल्याशिवाय नवतेची उभारणी करता येत नाही, हे सूत्र निदान भारतीय सांगीतिक अवकाशात आजवर तग धरून राहिले आहे. (पाश्चात्त्य संगीताप्रमाणे, परंपरेला कडाडून विरोध करण्यासाठी निर्माण झालेल्या संगीतपरंपरा भारताच्या स्वरावकाशात का निर्माण झाल्या नाहीत, याचे एक उत्तर इथे सापडेल.)

स्वातंत्र्यापूर्वीचे शतक संगीतासाठी खूपच मूलभूत घडामोडींचे ठरले. ख्याल संगीताला मिळत असलेल्या लोकप्रियतेमुळे गायनातील शैली सुंदरता वाढवणाऱ्या विविध घराण्यांच्या गायकांमध्ये निर्माण झालेली कलात्मकतेची स्पर्धा, त्या काळातील अनेक राजेरजवाडय़ांच्या दरबारात ‘दरबारी गायक’ म्हणून मिळणारा सन्मान, आपल्या पदरी उत्तमच कलावंत असावा, यासाठी संस्थानिकांची सुरू असलेली धडपड, गायनाबद्दल जिव्हाळा असणारे संस्थानिक, अशा वातावरणात संगीताच्या अवकाशात बरेच काही घडत राहिले. १८४८ मध्ये महात्मा जोतीराव फुले यांनी सुरू केलेल्या मुलींच्या शिक्षणाच्या प्रयोगामुळे बदलत चाललेल्या समाजकारणामुळे कलांचे क्षेत्र ढवळून निघण्यास मात्र बराच अवधी जावा लागला. म्हणजे, विष्णु दिगंबरांनी १९०८ मध्ये मुंबईतील गांधर्व संगीत विद्यालयात फक्त महिलांसाठी संगीताचे वर्ग सुरू करणे, हा त्या समाजकारणाचा अविभाज्य परिणाम होता. तरीही तेव्हा संगीताच्या जलशांमध्ये स्त्री गायिकांना कला सादर करण्याची परवानगी देण्यास समाजधुरीणांनी स्पष्ट विरोधच दर्शवला होता. गोखीबाई नावाच्या कलावतीला ‘दरबार गायिका’ म्हणून सन्मान मिळाला, तरीही प्रत्यक्ष मैफिलीत मध्यभागी बसून कला सादर करण्यास अटकावच होता. भारतीय संगीतातील अभिजात संगीताची गंगोत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्वाल्हेर घराण्याच्या बरोबरीने त्या काळात किराणा, आग्रा, जयपूर, रामपूर, पतियाळा, दिल्ली अशी संगीतातील अनेक घराणी रसिकांसमोर आपापली कला परजत होती. त्या प्रत्येक घराण्याच्या शैलीतील विविधतेमुळे तो सगळा काळ संगीताच्या दृष्टीने बहराचा होता. असामान्य बुद्धिमत्ता, कलात्मकतेची अपूर्व जाण आणि सौंदर्याच्या नवनवीन कल्पना यामुळे भारतीय आसमंतात दिग्गज कलावंतांची प्रभावळच निर्माण झाली. कलेची जाण आणि रसग्राहकता काळानुसार बदलत जाणारी गोष्ट आहे, हे ख्याल गायनाच्या परंपरेने पुन्हा एकदा सिद्ध केले, ते याच काळात.

धृपदाकडून ख्याल संगीताकडे वाटचाल होत असताना आणि ख्याल गायनाच्या बरोबरीने स्थापन होत असलेल्या ठुमरी गझल यासारख्या ललित संगीतातील स्वरपरंपरांनी पूर्वसुरींचेच ओझे वागवले, हे नाकारण्याचे काहीच कारण नाही. परंतु भारतीय स्वातंत्र्याच्या आधी सुमारे शंभर वर्षांपूर्वी वाजिद अली शाह या नवाबाच्या कारकीर्दीत (१८४८ ते १८५६) ठुमरी या संगीत प्रकाराने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. कव्वालीच्या नंतरचे हे शब्दस्वरांचे अद्भुत गारूड रसिकांसाठी नवसौंदर्याची खाणच ठरले. [सोबतचे चित्र वाजिद अली शाह यांचे] शब्द-स्वरांचा हा शुभसंकर नंतरच्या तीन दशकांत महाराष्ट्री पोहोचला आणि मराठी संगीत नाटकाने या संगीतप्रकाराला उत्कर्षांप्रत नेले. ख्याल गायनाच्या नवनियमांचे पालन करतानाच भावदर्शन आणि अभिजात कलात्मकता यांची सांगड आपापल्या नजरेने घालत सगळ्या कलावंतांनी एका नव्या पायवाटेचा प्रशस्त महामार्ग केला. धृपदासाठी संगत करणाऱ्या पखवाजची जागा ख्याल गायनात तबला—डग्गा यांच्या जोडीने घेतली. तबल्याच्या दुनियेत लयीचा आणि ती पकडून ठेवणाऱ्या मात्रामात्रांचा हिशोब अभिजात संगीताच्या विकासातील एक अतिशय कलात्मक टप्पा ठरला. वेगवेगळ्या मात्रांच्या तालांची ‘लयवर्तुळे’ अभिजात संगीताच्या आविष्कारामध्ये आणखी नवे रंग मिसळवत होती. परिणामी ख्याल गायनाची परंपरा अधिक समृद्ध होत होती. या शतकभराच्या काळात अनेक कारणांनी ख्याल गायनाच्या परंपरेला झळाळी प्राप्त झाली. ठुमरीतील शृंगाराने ललित संगीताची खुमारी वाढत असतानाच, त्याआधीपासून अस्तित्वात असलेल्या टप्पा, तराणा, होरी, कजरी यांसारख्या संगीत प्रकारांनी संगीताची मैफिल सजू लागली होती. तरीही अभिजात परंपरेतील ख्यालाचा वरचष्मा कायमच राहिला होता.

कलेतील परंपरेचे मूलतत्त्व ढळू न देता नव्या परंपरांचे निर्माण होण्यासाठी अभिजाततेचे मूल्य नवतेच्या चौकटीत बसवण्याचे हे कार्य अभूतपूर्व असेच म्हणायला हवे.

mukund.sangoram@expressindia.com