साधक आणि सिद्ध यांचा थोडा विचार आता करू. साधना करतो तो साधक, असं आपण मानतो. आपणही काहीबाही उपासना, साधना करीत असतो आणि म्हणून आपणही आपल्याला साधक मानतोच. प्रत्यक्षात साधक कसा असला पाहिजे, हे समर्थ रामदासांनी ‘दासबोधा’त पाचव्या दशकातील नवव्या समासात सांगितलं आहे. साधकाचे त्यांनी सांगितलेले मापदंड शब्दार्थानं पाहाता आपला काही टिकाव लागणार नाही, असंच आपलाला वाटेल! साधक कसा असावा, हे सांगणाऱ्या पहिल्या ओवीतल्या पहिल्या चरणाशीच आपण अडखळून पडू! समर्थ सांगतात, ‘‘अवगुणाचा करूनि त्याग। जेणें धरिला संतसंग। तयासी बोलिजे मग। साधक ऐसा।।’’ अवगुणाचा त्याग करायचा. आपल्याला वाटेल की, या एकाच गोष्टीत अवघा जन्म सरेल पण अवगुण संपणार नाहीत. समर्थ तर सांगतात, अवगुणाचा त्याग करून संतांचा संग धरल्यानंतर अर्थात त्या सत्संगात अखंड राहिल्यानंतर मग त्याला साधक म्हणावे! आधी अवगुणाच्या त्यागाचं शिवधनुष्य पेलायचं आणि मग सत्संगात अखंड राहायचं शिवधनुष्य पेलायचं. मग साधक होणं काही आपल्या आवाक्यातलं नाही, असंच आपल्याला वाटेल. याच समासातल्या साधकाचे मापदंड सांगणाऱ्या ओव्या नुसत्या वाचल्या तरी मनात खळबळ निर्माण होईल. पण म्हणूनच त्या शब्दार्थानं न वाचता खोलवर जाऊन वाचल्या तर त्यांचं मर्म उलगडेल. हा ‘अवगुण’ कोणता ते उलगडेल. पहिली ओवी ही साधकाचं अवघं जीवन सांगणारी आहे. पुढील ओव्यांत अवगुण त्यागाची प्रक्रियाही सांगितली आहे. त्यासाठी मुळात हा अवगुण कोणता, ते समजायला हवं. आपला एकमेव अवगुण म्हणजे जे अशाश्वत आहे तेच आपल्याला शाश्वत वाटतं आणि त्याच्याच प्राप्तीसाठी आपण आयुष्यभर धडपडत राहातो. जे शाश्वत आहे त्याच्यापासून आपण विन्मुख होतो. हा अवगुण जन्मोजन्मी हाडीमांसी इतका खिळला आहे की त्याचा त्याग काही एका झटक्यात होणारा नाही. याच समासात समर्थ सांगतात, ‘‘अवगुण त्यागी दिवसेंदिवस। करी उत्तम गुणाचा अभ्यास। स्वरूपीं लावी निजध्यास। या नाव साधक।।’’ दररोज प्रयत्नपूर्वक या अवगुणाचा त्याग करायचा अभ्यास करायला हवा. जगण्यात शाश्वत काय आहे, वास्तविक काय आहे, याचं भान जोपासण्याचा प्रयत्न करायला हवा. असं भान जोपासणं हाच उत्तम गुण आहे! त्याचा अभ्यास सातत्यानं करायला हवा. जे शाश्वत आहे त्याचाच ध्यास मनात उत्पन्न व्हायला हवा. आता हा ध्यास म्हणजे काय? श्रीनिसर्गदत्त महाराजांनी ध्यानाची व्याख्या करताना, ‘ध्यास म्हणजेच ध्यान’ असं म्हटलं आहे. ध्यान ही स्थिती आहे, कृती नव्हे, हे खरं. तरी ध्यानाचा अर्थ आपण काय मानतो? तर डोळे मिटून, आजूबाजूचा विचार मनातून काढून टाकून, आजूबाजूच्या गोष्टींना नजरेआड करून परमात्मचिंतनात मग्न व्हायचा प्रयत्नं करणं म्हणजे ध्यान करणं, असं आपण मानतो. समर्थ सांगतात त्याप्रमाणे स्वरूप प्राप्तीचा ध्यास ज्याच्या मनात उत्पन्न झाला आहे, त्यालाच साधक म्हटलं पाहिजे!

lucky number by date of birth
पैसा, पद, प्रतिष्ठा तुम्हाला कधी मिळणार? भाग्यांकावरून पाहा तुमचे लकी वर्ष
peter higgs marathi articles loksatta,
पदार्थ विज्ञानातील जादूगार…
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!
Loksatta vyaktivedh economics Nobel Prize Standards Daniel Kahneman
व्यक्तिवेध: डॅनिएल कानेमान