चित्रकथांची पुस्तके लिहिणारे ब्रिटनमधील जुन्या काळातील लोकप्रिय व सिद्धहस्त लेखक टेरी प्रॅशेट यांच्या एका पुस्तकात मृत्यू नावाचेच एक पात्र आहे. त्या पात्राच्या तोंडी एक वाक्य आहे, ‘मरणे तुला सक्तीचे नाही, जर तुझी इच्छा नसेल तर मृत्यू तुझ्या वाऱ्यालाही उभा राहणार नाही’. पण दुर्दैवाने अल्झायमर म्हणजे स्मृतिभ्रंशाच्या रोगाने वयाच्या ६६ व्या वर्षीच मृत्यूने त्यांना काल्पनिक जगातून बाहेर आणत वास्तवाची जोड दिली.
प्रॅशेट यांची ‘डिस्कवर्ल्ड’ ही काल्पनिक चित्रकथा मालिका त्या वेळी खूप गाजली होती. या मालिकेतील ‘द कलर ऑफ मॅजिक’ हे पहिले पुस्तक १९८३ मध्ये प्रसिद्ध झाले व त्यानंतर ‘द लाइट फँ टास्टिक’ हे दुसरे पुस्तक लगेचच प्रसिद्ध झाले व त्यामुळे त्यांची लोकप्रियता अफाट वाढली. त्यानंतर त्यांची ‘द डिस्कवर्ल्ड कँपॅनियन’ (१९९४), ‘द सायन्स ऑफ डिस्कवर्ल्ड’ (१९९९) ही पुस्तके प्रसिद्ध झाल्यानंतर ब्रिटनमध्ये १९९० च्या सुमारास त्यांच्या पुस्तकांनी खपाचे उच्चांक गाठले. प्रॅशेट यांचा जन्म बकिंगहॅमशायर येथे २८ एप्रिल १९४८ मध्ये झाला.  त्यांच्या मते क्रमिक शिक्षणापेक्षा सुतारकाम करण्यातही जास्त गंमत असते. विशेष म्हणजे ते जे काही बनू शकले त्याचे सगळे श्रेय बिकन्सफील्ड सार्वजनिक वाचनालयाला त्यांनी दिले होते. लिहिण्याच्या आधी तुम्ही बरेच वाचायला हवे अशी त्यांची धारणा होती. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी ‘द हेडस बिझिनेस’ ही पहिली विज्ञान काल्पनिका लिहिली होती. वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी शाळा सोडली व पत्रकारिता सुरू केली. ‘द कार्पेट पीपल’ हे त्यांचे पहिले पुस्तक ‘स्मॉल प्रेस कॉलिन स्मायथ लिमिटेड’ या कंपनीने प्रसिद्ध केले. त्यांच्या लेखनावर पहिल्यांदा केनेथ ग्रॅहॅम व आयझ्ॉक अ‍ॅसिमोव्ह तसेच आर्थर सी क्लार्क यांचा प्रभाव होता. पहिल्यांदा ते विज्ञान-तंत्रज्ञानावर कथा लिहीत असत. नंतरच्या काळातले त्यांचे लेखन हे पी. जी. वुडहाऊस, टॉम शार्प व जेरोम के. जेरोम, रॉय लुईस, अ‍ॅलन कोरेन, जी. के. चेस्टरसन व मार्क ट्वेन यांचा प्रभाव असलेले होते. २००९ मध्ये त्यांना एलिझाबेथ राणीकडून ‘नाइट’ किताब मिळाला. प्रॅशेट यांचा विवाह लिन प्युकवेस यांच्याशी १९६८ मध्ये झाला होता. त्यांना रिहाना नावाची मुलगी असून तिने वडिलांकडून आलेला डिस्कवर्ल्ड मालिकेचा वारसा पुढे नेला. स्मृतिभ्रंश झाल्यानंतर त्यांनी अल्झायमर रिसर्च ट्रस्टला संशोधनासाठी १० लाख डॉलरची देणगी दिली. २०१३ मध्ये त्यांनी डिस्कवर्ल्ड मालिकेतील ‘रेझिंग स्टीम’ ही कादंबरी लिहिली ती शेवटचीच.