कलेचा युरोप-केंद्रित इतिहास अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात आपल्या बाजूने वळवला, त्या इतिहासातील एक महत्त्वाचे चित्रकार- शिल्पकार म्हणजे फ्रँक स्टेला. शनिवारी न्यू यॉर्कमधील राहात्या घरी ८७ व्या वर्षी त्यांचे निधन झाले, तेव्हा त्या इतिहासाचा आणखी एक दुवा लोपला. जगाच्या आधुनिक कलेत अमेरिकेतील अमूर्त अभिव्यक्तिवाद (ॲबस्ट्रॅक्ट एक्स्प्रेशनिझम), अल्पवाद (मिनिमलिझम), नवजन कला (पॉप आर्ट) या चळवळींची भर पडली ती दुसऱ्या महायुद्धानंतरच – तोवर अमेरिका सर्वच क्षेत्रांमध्ये आपली ‘सॉफ्ट पॉवर’ सिद्ध करू लागली होती आणि आधीचे फोटोरिॲलिझम वगैरेची – म्हणजे दैनंदिन जीवनाचे हुबेहूब चित्रण करणाऱ्या रंगचित्रांची- डाळ युरोपपुढे शिजणार नाही, हेही उघड होत होते. अमेरिकेच्या ‘ॲबस्ट्रॅक्ट एक्स्प्रेशनिझम’ला जरी जर्मन अभिव्यक्तिवादातल्या निव्वळ रंग-हाताळणीचा संदर्भ असला, तरी जॅक्सन पोलॉकने रंग ओतून-शिंपडून स्वत:ची ‘ॲबस्ट्रॅक्ट एक्स्प्रेशनिस्ट’ शैली पुढे नेली होती.

हेही वाचा >>> व्यक्तिवेध : पॉल ऑस्टर

loksatta editorial on one year of women paraded naked in manipur incident
अग्रलेख: समर्थांची संशयास्पद संवेदना
Hate speech by pm Modi
लालकिल्ला : भाजपची भाषा बदलू लागली!
loksatta editorial bjp bring pakistan issue in lok sabha election campaign for targeting congress
अग्रलेख : शेजार‘धर्म’!
loksatta editorial on rare russian books vanishing from libraries across europe
अग्रलेख : पुष्किनचे रहस्य
Loksatta editorial Salman Khan house attacked by two assailants on a bike
अग्रलेख: सलमानी सुल्तानी!
(L-R) Prajwal Revanna with father H D Revanna. (Photo: H D Revanna/ X)
अग्रलेख : अमंगलाचे मंगलसूत्र
hp buy memory chip from japanese companies
 चिप-चरित्र : जीवघेण्या स्पर्धेचं दशक
Loksatta editorial political party Speeches of political leaders criticizing each other
अग्रलेख: घंटागाडी बरी…

यासारख्या घडामोडींमुळे अमेरिकी कलेचा बोलबाला वाढत होता. अशा काळात, पोलॉकइतकाच मोठा धक्का देणारा ‘मिनिमलिस्ट’ चित्रकार ठरण्याचे श्रेय फँक स्टेला यांना वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी (सन १९५९) मिळाले. तोवर अमेरिकेतल्या मिनिमलिझमलाही आधार होता तो नाझीपूर्व काळातल्या ‘बाउहाउस’ या जर्मन कलासंस्थेच्या विचारांचा. रंगछटांचे चौरस एकावर एक मांडणारा जोसेफ आल्बर्स हा हिटलरी छळामुळे अमेरिकेत आला, पण तो मूळचा बाउहाउसचा. त्याच्या कलाकृतींत दृश्य अगदी अल्प. पण मांडणी गंभीर. आल्बर्सचा प्रभाव तरुण स्टेलावर होता. पण १९५९ मधल्या ‘१६ अमेरिकन्स’ या प्रदर्शनात बाकीच्या १५ चित्रकारांपेक्षा स्टेलाला महत्त्व मिळाले, कारण त्याचे कॅनव्हास फक्त काळ्याच छटेतले होते… ब्लॅक ऑन ब्लॅक! त्यातून भौमितिक आकार आणि रेषाही दिसत होत्या, पण दृश्य मुद्दाम ‘दाखवण्या’ला नकार देण्याची स्टेलाची रीत समीक्षकांना भावली. त्याचे कौतुक झाले. ‘पोस्ट पेंटरली ॲबस्ट्रॅक्शन’ असे या रीतीचे नावही पडले. पण स्टेला यांचे मोठेपण असे की, ‘ज्याचे कौतुक झाले तेच आपण यापुढे करायचे’ असा धोपटमार्ग न स्वीकारता रंगांच्या विविध छटा वापरल्या. मग कॅनव्हासवरले सपाट रंगलेपनही सोडले आणि ॲल्युमिनियम वा तांब्याच्या पट्ट्यांवर रेडियमयुक्त रंगांचा वापर केला. पुढे तर ‘मिनिमलिझम’ सोडून ‘मॅग्झिमलिझम’ची (उधळणवाद) वाटही त्यांनी धरली. संगणकाच्या मदतीने शिल्पे केली. ‘माझा संबंध चित्रातल्या व बाहेरच्या अवकाशाशी आहे- १६व्या शतकात छायाप्रकाश योग्यरीत्या वापरणाऱ्या काराव्हाजिओचा संबंध अवकाशाशीच होता’ असे हार्वर्ड विद्यापीठातल्या ‘नॉर्टन व्याख्याना’त त्यांनी सांगितले होते. त्यांच्या निधनाने अमेरिकी चित्रकलेची इमारत अधिकच खचली आहे.