‘‘अहो, मी काय म्हणते, एक दिवसासाठी अंगण वापरू द्या त्यांना, देऊन टाका परवानगी.’’ पत्नीचा प्रस्ताव ऐकून तात्या कडाडलेच. ‘‘अजिबात परवानगी देणार नाही, ही काय वेळ आहे का आंदोलन करण्याची. सारे जग विषाणूविरुद्ध लढत असताना यांना ‘माझे अंगण माझे रणांगण’ अशी यमक जुळवणारी आंदोलने सुचतात कशी? ही महामारी आहे व त्याचा मुकाबला सर्वानी जात, धर्म, पंथ, पक्षभेद विसरून करायला हवा एवढीही समज नाही या भाजपवाल्यांना. आणि परवानगी कोण मागतोय तर वॉर्डाच्या शाखेचा अध्यक्ष, ज्याच्या घरासमोर अंगणच नाही. म्हणजे ‘आयजीच्या जिवावर बायजी उधार’ असाच मामला झाला ना! नेहमी चाणक्याचे नाव घेणाऱ्या या लोकांना युद्ध दुसऱ्याच्या रणांगणावर खेळायचे असते हे बरोबर कळते, पण मी या आग्रहाला अजिबात बळी पडणार नाही. ऊठसूट महाभारत व रामायणाच्या गप्पा मारणारे हे लोक. यांना तेव्हाची धर्मयुद्धे कशी लढली गेली हेही ठाऊक नाही. अरे जरा वाचा. तेव्हा सायंकाळी युद्ध थांबवायचे. नि:शस्त्रावर वार करायचे नाहीत. महामारी आली की युद्ध स्थगित व्हायचे हे तेव्हाचे साधे नियम तुम्ही आता सत्तेच्या हव्यासापोटी विसरायला तयार झालात. अरे किमान जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा रे!

राज्यात सत्ता नाही म्हणून ‘पीएम के अर्स’ला पैसा द्या, मुख्यमंत्री निधीत देऊ नका अशी आवाहने एकीकडे करायची, सत्तेत असलेल्यांना मदत करायची नाही आणि दुसरीकडे आंदोलनाची भाषा करायची. हे कसले घाणेरडे राजकारण! किमान ते माझ्या अंगणात तरी खपवून घेणार नाही. अरे ही महामारी आहे, तिचा सामना करताना अंदाज, आखाडे चुकणारच. मग ते राज्याचे असो वा केंद्राचे. येथे तर दोघांच्याही चुका झालेल्या आहेत, मग एकटय़ा राज्याच्या विरोधात आंदोलन का? लोक मुंगीसारखे पटापट मरत असताना याला आंदोलन सुचतेच कसे?

सत्ता नसली की यांना पटापट आंदोलने सुचू लागतात. अरे किमान जनतेची भयभीत मानसिकता तरी लक्षात घ्या. ते काही नाही. मी माझे अंगण आंदोलनासाठी देणार नाही,’’ असे म्हणत तात्यांनी भल्यामोठय़ा अंगणातून विजयी आविर्भावात एक फे री मारली. बाहेर जायच्या दोन्ही फाटकाला मोठे कु लूप घातले व घरात परतले. त्यांना बोलून बोलून घाम आलेला बघून पत्नी चरकल्या, पण काही बोलल्या नाहीत. अखेर आंदोलनाचा दिवस उजाडला. सकाळी सकाळी आंदोलकांनी तात्यांच्या घरासमोरून जाणाऱ्या रस्त्यावर बराच काळ उभे राहात शंखनाद के ला. तात्यांच्या नावाने शिमगा केला. खिडकीच्या फटीतून बघणाऱ्या तात्यांनी रागाच्या भरात साहेबांना फोन लावला. साहेब कुठे आहेत असे विचारताच पलीकडून ‘कॅरम चालू आहे,’ असे उत्तर मिळाले. ‘काय’ तात्या जोरात ओरडले. पलीकडचा माणूस गर्भगळीत होत म्हणाला, अहो मी कॅरम खेळतोय, साहेब मीटिंगमध्ये आहेत. हे ऐकू न हायसे वाटलेल्या तात्यांनी ‘१४४’ लागू असताना आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई व्हायलाच हवी असा निरोप साहेबांना द्यायला सांगितला आणि फोन ठेवला. ‘एका अंगणामुळे किती हा मनस्ताप’ म्हणत पत्नीने शिवनामाचा जप सुरू केला. तो ऐकू न तात्यांमधला जुना शिवसैनिक जरा सुखावला.