हे पाहा, मंत्रामध्ये ताकद असते हे तर आता नासानेसुद्धा मान्य केले आहे. अमेरिका, रशिया, झालेच तर बुर्किनो फासो येथे मंत्रांवर संशोधन करण्यात येत आहे.. व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठातून तर यावर असंख्य संशोधन निबंध प्रसिद्ध होत आहेत. फार काय, आपले थोर मांत्रिक परमपूज्य श्री श्री श्री तात्याजी विंचूजी यांच्या आदिमंत्राला जगातील सर्वात प्रभावशाली मंत्र म्हणून युनेस्कोने मान्यता दिली आहे. असे असताना या देशात मात्र मंत्र आणि मांत्रिक याकडे वाईट नजरेने पाहण्याचे नतद्रष्ट फॅड बोकाळले आहे. शिकले तेवढे भकले असे आमचे थोर गुरुवर्य बाबाजी बंगाली म्हणत ते काही खोटे नाही. या शिक्षणामुळेच आपल्या पारंपरिक ज्ञानाला नावे ठेवण्याची वाईट परंपरा येथे निर्माण झाली आहे. पुण्यातील एका रुग्णालयात आमच्या एका मांत्रिकबंधूने केलेल्या उपचारांवर होत असलेली टीका ही त्या परंपरेतूनच आलेली आहे. कीव येते आम्हास त्या टीकेची आणि टीकाकारांची. मंत्रशक्तीवर एवढा अविश्वास? त्यांना काय वाटते, सारे काही विज्ञानामुळेच होते? अज्ञान आहे ते त्यांचे. अशा अज्ञानींची टीका काय मनावर घ्यायची या सात्त्विक विचारानेच आम्ही गप्प आहोत; पण आमच्या संयमाची नैदानिक चाचणी घेऊ नका. आमच्याही हाती लिंबू आणि टाचण्या आहेत. मनात आणले तर आम्ही कधीही ओम फट् स्वाहा करून त्या टीकाकार दुश्मनांची नली तोडू शकतो, हे त्यांनी लक्षात ठेवावे. असो. आमचे म्हणणे एवढेच आहे, की आता पुण्यातील रुग्णालयाने मांत्रिकोपचाराला सहर्ष मान्यता दिलेली आहेच. तेथे एका रुग्णावर वैद्यकीय डॉक्टरांच्या उपस्थितीत रीतसर मंत्र-तंत्रोपचार करण्यात आले. समोरची शक्ती अधिक होती. करणी जरा जास्तच काळी होती. वेळ कमी असल्याने ती उलटवणे शक्य झाले नाही. परिणामी रुग्ण दगावला, ही बाब वेगळी. परंतु आधुनिक वैद्यकशास्त्राचा वापर करूनही रुग्ण दगावतातच. तेव्हा शास्त्र चुकीचे नाही. त्याविरोधात उगाच अंधश्रद्धा म्हणून बोंबाबोंब करून आपल्या पवित्र धर्माच्या विरोधात वागण्याऐवजी सर्वानी त्याकडे सकारात्मक पद्धतीने पाहिले पाहिजे. या शास्त्राचा आपल्या उपचार पद्धतीत समावेश करून घेतला पाहिजे. केंद्रात आयुष मंत्रालयाची स्थापना झालेली आहे. तसे खास ‘जारण-मारण मंत्रालय’ आपल्याला स्थापन करता येईल. स्किल इंडियाअंतर्गत सर्व मांत्रिकांना, बाबा बंगालींना एकत्र आणून त्यांची रुग्णालयांमध्ये नियुक्ती करता येईल. त्याद्वारे देशातील शारीरिक आणि मानसिक आरोग्याचीच नव्हे, मूठकरणी, वशीकरण, प्रेमसंबंध, लग्न न होणे, नोकरी न मिळणे, मूल न होणे अशा कित्येक समस्या शंभर टक्के गॅरंटीपूर्वक दूर केल्या जाऊ शकतील. एक महिन्यात समस्या दूर न झाल्यास सगळे पैसे गॅरंटी के साथ परत देणारी अशी उपचार पद्धती आज अमेरिकेतसुद्धा नाही. ती येथे लागू करता येईल. विज्ञानवाद्यांना हे सारे हास्यास्पद वाटेल. परंतु यज्ञामुळे पर्यावरण शुद्ध करता येते, मोबाइलला गाईचे शेण लावले तर त्यामुळे किरणोत्साराचा धोका नष्ट होतो अशा अनेक गोष्टी तरी त्यांना कुठे पटल्या आहेत? परंतु आज आपण ते मान्य केलेच आहे. त्याचप्रमाणे रुग्णालयांतही आज ना उद्या मानद मांत्रिकांच्या जागा भरल्या जातील आणि देशात एक नवी आरोग्यमंत्रक्रांती होईल यात आम्हाला शंका नाही. पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरातून त्याची सुरुवात झालेली आहेच.