सायंकाळी सहा वाजता राष्ट्राला उद्देशून संबोधन आहे हे कळताच तात्यांच्या घरातल्या घरातील येरझारा वाढल्या. आठची वेळ तशी सोयीची, मग सहा कशी काय झाली असेल? लगेच त्यांना सध्या सुरू असलेले आयपीएल आठवले. हा माणूस मोठाच हुशार! स्वत:च्या लोकप्रियतेला अजिबात धक्का लागू देत नाही असे मनाशी म्हणत तात्या हसले. तरीही त्यांच्या मनातली धाकधूक अजिबात कमी झालेली नव्हती. साडेपाचच्या सुमारास काकूंनी त्यांच्या औषधाचा डबा टीव्हीच्या बाजूला आणून ठेवला. तो बघून तात्यांना जरा हायसे वाटले. चार वर्षांपूर्वी अचानक कानावर आदळलेली ‘ती’ घोषणा ऐकून तात्यांचा साखर व रक्तदाब दोन्ही कमालीचे वाढले होते, इतके की काही दिवस त्यांना रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. तिथे झोपेतही त्यांना तो हळूच पडदा सरकवून भेदक नजरेने बघणारा चेहराच दिसायचा. आपण नेता निवडला की धक्का देणारा जादूगार असे विचार तेव्हा त्यांच्या मनात यायचे. पुढील काळात तात्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली पण रक्तदाब व साखर त्यांना कायम चिकटलेच. नंतर त्यांनी त्यांची अनेक भाषणे ऐकली. टीका झाली म्हणून वारंवार वेळा बदलणे सुद्धा अनुभवले, पण मनावर झालेला धक्कातंत्राचा प्रभाव कायम राहिला. टाळेबंदीच्या वेळी तर त्यात आणखी भरच पडली. रात्री आठ वाजताचे भाषण संपल्यावर वाणसामानासाठी करावी लागलेली धावाधाव, तेव्हा व्याधींनी दिलेला त्रासही आठवला. मग सारा राग काकूवर निघाला. बाहेर बोलणार तरी कुठे? बोललो तर झुंडबळीची शिकार होण्याची शक्यताच जास्त. हे सारे आठवून तात्यांच्या अंगावर शहारा आला. त्यांनी पटकन रक्तदाब मोजला. तो ‘नॉर्मल’ निघाला. त्यांनी समोर बघितले तर काकू दारावरील पडद्याच्या फटीतून बघत उभ्या. असे चोरून पण भेदक नजरेने बघू नको. मला तेच २०१६ चे दृश्य आठवते असे म्हणत तात्या जोरात ओरडले. एकटय़ाने निर्णय घ्यायचे. ते सांगण्याआधी प्रचंड उत्सुकता निर्माण करायची व गर्जना केल्याच्या थाटात धक्का द्यायचा, याला लोकशाही म्हणायचे काय, असा प्रश्नही त्यांच्या मनात तरळून गेला. तेवढय़ात भाषण सुरू झाले. आरंभापासून शेवटापर्यंत ‘काळजी घ्या, काळजी घ्या, बंदी संपली, सण आले’ असे ऐकून तात्यांना जांभया येऊ लागल्या. तिकडे काकूचाही चेहरा खुलला. भाषणात ना जोश, ना धक्का. ते कधी संपले तेही कळले नाही. रिवाजाप्रमाणे तात्यांनी साखर व रक्तदाब मोजला. तो ‘न्यू नॉर्मल’च्या आसपास होता. टीव्ही बंद करून तात्या मनसोक्त हसले. तेवढय़ात त्यांना एक कथा आठवली. पाच भावांचे एकत्रित कुटुंब असलेले कोकणातील एक घर. पैकी एक भाऊ लहानपणीच पळून गेलेला. मध्येमध्ये तो घरी उगवे, तेव्हा इतर भावांच्या उरात धडकी भरे- हा हिस्सा मागतो की काय ! दोनचार दिवस राहून हा काहीच न मागता निघून जाई. जाताना छद्मी हसे. भावांच्या मनातली धास्ती त्याला कळायची. अशीच २० वर्षे लोटली. पुन्हा तो भाऊ उगवला. चाराचे आठ दिवस झाले तरी जायचे नाव घेईना! इतर चौघांमध्ये पुन्हा धास्तीचा आगडोंब. अखेर नवव्या दिवशी तो म्हणाला, ‘मी पळून पळून दमलो. आता माझ्यात ताकद उरली नाही. हिस्सा वगैरे काही नको. राहायला तेवढा आसरा द्या’, हे ऐकून साऱ्यांनी समाधानाचा सुस्कारा टाकला. आज भाषण देणाऱ्यांची हीच गत झालेली दिसते, असा विचार मनात येताच तात्या सुखावले. चॅनेल बदलून आयपीएल पाहू लागले!