‘देवियों और सज्जनों, क्रिप्या अपने कुर्सी की पेटी बाँध लीजिए..’ ही उद्घोषणा सुरू झाल्यावर, सराईतपणे  त्याने  आधीच डोक्यावरील वाचनदिवा – रीडिंग लाइट- पेटवला, मग पट्टा जुळवला, ओढून घट्टही केला आणि तितक्यात त्याच्या डोक्यावरील तो इवलासा पण प्रकाशयुक्त दिवाच झाकोळला गेला! काय झाले दिव्याला, म्हणून वर पाहातो तर त्याच्या डोक्यावर कुणीतरी अख्खी थाळी धरलेली होती..  ती थाळी धरणारा हात मागल्या आसनरांगेतल्या स्त्रीचा आहे, हे कळण्याच्या आत त्याला आधी जाणीव झाली ती वासाची. डाळीच्या पिठाचा खमंग पदार्थ.. हो ढोकळाच! पाठोपाठ त्या स्त्रीचा आवाज : ‘मेहुलभाई, जिनलने खवडावो, तमेपण खावो. फाफडा छे ने तमारे पासे?’ – मेहुलभाईंनी उठून मागे वळून  ‘थेन्क्यू क्रीतीबेन’ म्हणत ती थाळी घेतली. डोक्यावरचा प्रकाश पुन्हा परतला. तितक्यात हवाई सेविकेचा आवाज- ‘सर प्लीज बी सीटेड, मॅम बैठ जाइये मॅम..’ आणि मग ती सेविकाच त्याच्या पुढल्या रांगेतल्या सीटवर ढोकळे खाणाऱ्या मेहुलभाईंना समजावू लागली. सर विमानात खायला बंदी आहे. मास्क लावा सर. त्यावर मेहुलभाईंचं उत्तर : ‘अ्रठा साल की बच्ची है, ना खानेसे तकलीप होती है उसको, फ्लाइट है ने’.. सेविका आता त्याच रांगेत खिडकीच्या सीटवर बसलेल्या त्या मुलीकडे- बहुधा तीच जिनल- पाहात विनवणीच्या सुरात दटावत होती, प्लीज टेकऑफ  होऊद्या, मास्क आणि फेसशील्ड उतरवू नका. त्या सुरातली दटावणी नेमकी ओळखून मेहुलभाई हुज्जतच घालू लागले.  आम्ही एकोणीस जणांनी याच विमानसेवेची तिकिटं काढली ती खानपानसेवा इथं आहे म्हणून, पण तेवढय़ात सरकारी निर्देश आले, दोन तासांहून कमी वेळाच्या कोणत्याही विमानफेरीत खायला देणार नाहीत. मग काय करणार, आम्ही ढोकळा, फाफडा, जलेबी घेऊन आलो- आम्ही आमचं खातोय, तुमचं खातोय का? मग तुमची का हरकत? – असं मेहुलभाईंचं आत्मनिर्भर म्हणणं. त्यावर हवाईसेविका फक्त ‘मास्क इज कम्पल्सरी सर’ एवढंच म्हणत राहिली. मास्क काढू नये म्हणून तर  हा ‘न खाने देंगे’चा नवा निर्देश सरकारनं दिला आहे, हे तिनं सांगितलंच नाही. त्यामुळे मेहुलभाईंना तिचा मुखपट्टीसक्तीचा धोषा उर्मटपणाचा वाटला. विरोधकांकडे साफ दुर्लक्षच करून थेट लोकसंवाद साधण्याची युक्ती करीत, त्याच रांगेत पण पॅसेजच्या पलीकडल्या सीटवर बसलेल्या प्रवाशाला मेहुलभाई स्वत:च्या मनाची बात सांगू लागले, तीही अर्थात आसपासच्या साऱ्या रांगांना ऐकू जाईल अशा आवाजात. ‘देखो आमची तर दुकान आहे फरसाणची. विमानातल्या सर्व प्रवाशांची सरबराई करू शकतो, मनात आणलं तर. आणि चेहऱ्यावर तो पारदर्शक प्लास्टिक तुकडा लावलाय ना फेसशील्ड म्हणून, मग काय हरकत आहे खायला?’ असा एकंदर, विमानास उद्देशून त्यांनी दिलेल्या संदेशाचा आशय. यावर त्या पल्याडच्या सीटवरचा प्रवासीही प्रतिसाद म्हणून, ‘पैसाच नाही ना यांच्याकडे, हे एकदा प्रायव्हेट होऊंदे मग किती मज्जा येते पाहा’, म्हणताच मेहुलभाईंनी ‘च्, मज्जा आवसे’ अशा उद्गाराची दाद दिली.  अहो खासगी विमानसेवांतली , खाद्यपदार्थ  विक्रीही बंदच आहे, असे आता कॅप्टन येऊन सांगत होता!

या गोंधळात तो, पुस्तक वाचायचे विसरून इकडेतिकडेच पाहात होता. विमानातले झुरळ त्याला दिसत होते आणि ‘बरे झाले तू भारताच्याच राष्ट्रीय विमानकंपनीत आहेस.. चीनच्या नाहीस’ असे त्या झुरळाला मूकपणे सांगू पाहात होता!