सत्तेची साठमारी हा एक खुमासदार खेळ. कधीकधी तो एवढा रंगतो, की आपणही एक खेळाडू होऊन जावे असे अनेकांना वाटू लागते. सारे जण आपापली अक्कल पणास लावून ईर्षेने एकमेकांवर तुटून पडतात आणि बघ्यांची भूमिका बजावण्यासाठी कोणीच शिल्लक राहात नाही. असे झाले की, स्वत:स माध्यम मानणाऱ्यांची मजाच मजा असते. कारण त्यांनाही भूमिका बजावावी लागते. काही माध्यमे हाती झेंडा घेऊनच जन्मास आलेली असल्याने त्यांची भूमिका ठरलेली, तर काही माध्यमे ‘तळ्यातमळ्यात’ भूमिकेबद्दल प्रसिद्ध.. त्यांना वाऱ्याची दिशा पाहून पाठ फिरवावी लागते. त्यांच्या शब्दांना धार असली, तरी ते शब्द कोणत्या वेळी कोणावर चालवायचे, हे त्या त्या वेळेनुसार ठरवावे लागते. असे शब्द कधी हार होऊन कुणाच्या गळ्यात पडतात, तर कधी प्रहार होऊन कुणाच्या डोक्यावर घाव घालतात. काल ज्यांच्या गळ्यात ते हार होऊन पडलेले असतील, त्यांच्याच डोक्यावर आज ते प्रहारही करू शकतात. काही माध्यमे ज्वलंत विचारांचा पुरस्कार करण्यासाठीच जन्म घेतात. त्यांच्या हातात नेहमी एक झेंडा असतो. काही निर्भीड आणि राष्ट्रवादी विचारांशी बांधिलकी मानतात व त्यासाठी जागरूक राहणे हेच आपले ध्येय समजतात. अशा माध्यमांना साठमारीच्या खेळात बघ्याची भूमिका घेणे जमत नाही. खेळ रंगात आलेला असताना आपणही त्यात उतरले पाहिजे, असे त्यांना वाटू लागते. मग धारदार शब्द प्रतिस्पर्ध्यावर प्रहार करू लागतात.. तरीही, आपण ते करीत आहोत याची तसूभरही जाणीव जनतेस होऊ नये याची काळजी घेण्यासाठी, तळ्यातमळ्यात करणेही गरजेचे असते. काही जणांना मात्र, आपली भूमिका बजावण्याची हीच ती वेळ आहे, असे वाटू लागते आणि झेंडा फडकावत ही माध्यमेही मैदानात उतरतात. तसेही, कायम मैदानात उतरल्याच्या आवेशातच ती वावरत असतात. ज्याप्रमाणे युद्ध सुरू झाल्यावर आवेशात मर्द मावळा मैदानात उतरतो, सावज समोर दिसू लागताच ‘छावा’ किंवा ‘ढाण्या वाघ’ दबा धरून चाल करण्याची तयारी करू लागतो, तसा त्यांच्या अंगी सरसावतो आणि याचसाठी आपला जन्म झाला आहे, याचा त्यांना साक्षात्कार होतो. काही माध्यमे ‘उलट तपासणी’ सुरू करून, प्रतिस्पर्ध्यांची कोंडी करू पाहतात. अशा तऱ्हेने साठमारीच्या खेळात आपापले रंग भरून सारे जण आपल्या भूमिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात. मग साठमारीचा खेळ इतका रंगात येतो की, कोणत्या बाजूने कोणाकडे पाहावे हेच बघ्यांना समजेनासे होते. इकडून तिकडे वळणाऱ्या मानांना रग लागते. डोकेही दुखू लागते आणि चहूबाजूंना पाहून शिणलेल्या डोळ्यांचा ताण एवढा वाढतो, की काही काळाने काहीच दिसेनासे होते. बघ्याची भूमिका बजावणाऱ्या मोजक्या जनतेला कंटाळा आला तरी आपल्या भूमिकांपासून तसूभरही दूर न होणे हे यांचे कर्तव्य असते. ते भूमिका बजावतच असतात आणि सत्तेच्या साठमारीबरोबरच, भूमिका बजावणाऱ्या यांच्या गटांतही भूमिका वठविण्याच्या स्पर्धेची साठमारी सुरू होते.. कधी तरी अचानक सत्तेच्या साठमारीचाच नूर बदलतो. मग या वातकुक्कुटांची दिशाही बदलते. वाऱ्याच्या दिशेने पाठ वळवून ते जोरात आरवू लागतात आणि नवी पहाट फुटणार याची चाहूल लागते. पुन्हा बघ्यांना जाग येते. ते नव्या दमाने चहूकडे पाहू लागतात आणि क्षणापूर्वी लागलेली चाहूल ही हूल होती, हे क्षणात समजून चुकते.. यांना मात्र, आपली भूमिका बजावत राहावेच लागते..