काशीनगरी एक अवलिया सुरांत रंगून राही, सनई नव्हे, गळाच उत्तम, तीन सप्तकीं गाई.

श्वासांमध्ये त्यांच्या सनई, उच्छ्वासीही सनई, तीर्थ सनई, क्षेत्र सनई, आयुष्यही सनई.

सूर अद्भुत ठेवून गेला, मिटली त्याची वाट, तरीही गहिवर दाटे अजुनी, ऐसा गंगाकाठ.

नव्हता हाती पैसाअडका, घोडा किंवा गाडी, फकीर होता, बांधेल कैसा, पक्की ऐसी माडी.

मागे उरले सूरच केवळ, आणिक सनया काही, सूरधुपाचे लवलवते फटकारे जग पाही.

खजिना त्याचा सजला होता, वाद्येच होती केवळ, जादूची त्यात होती, मौलिक जरीही पोकळ.

त्यात चांदीच्या चार सुरेल सनया होत्या छान, होती एक काष्ठाची अन, घेई मंजूळ तान.

जपला होता सूरखजिना, आप्तांनी हा त्याचा, पाहती, जपती निगुतीने प्रेमाने तो साचा.

अघटित घडले एके दिवशी, चोर कुणी तो आला, सनयांसवे सूरखजिना चोरी करून गेला.

गेला असता चोरी पैसा, तरीही नसते दुखले, मनास साऱ्यां दु:ख बेसूर ऐसे ते मग खुपले.

वर्दी गेली खाकीपुढती, नोंद दफ्तरी झाली, तक्रारीची शाई काळी, पांढऱ्यावर फुटली.

खाकीला त्या पडली चिंता, चांदीची त्या भारी, काय भाव, काय वजन, कोण हात तो मारी.

ठाऊक नाही, कळले का, चोरी झाले सूर? की चष्म्यातून त्यांच्या केवळ फिर्यादीचा नूर?

काय वदावे, सांप्रतकाळी कुणास अन सांगावे, कुणास काही कळण्याआधी शब्द असे पांगावे.

गवसत नाहीत सूर साजीरे, सहजी आणिक नेक, भूलभुलय्या गाणी केवळ, हुशार त्यांची फेक.

हरवून गेले कुठे सुरीले गाण्याचे ते गाव, जगण्याचा अन कुठे हरवला आनंदाचा ठाव.

दिशांत दाही बहु गलबला, रात्रंदिन तो चाले, जो तो बोले जसे हवेसे जो तो तैसा धावे.

खांद्यावरती ओझे कसले, वाकुनि पुरते गेले, धावधावुनी दिशा सोडुनी पाय आंधळे झाले.

ऐशा वेळी हवीच सनई, येथे जगण्यासाठी, जगण्यामध्ये श्वास सुरांचा नवा फुंकण्यासाठी.

वाटेवरती हवीच सनई, मिळेल मग तो गाव, अस्वस्थाची सरेल मग ती दमणुकीची धाव.

कुणापास त्या असतील सनया, आणुनि कृपया द्या रे, मोल तयांचे आम्हाकडून जाणून थोडे घ्या रे.

काय हवे ते देऊ तुम्हां, नकाच आता दडवू, मंजूळतेवर झुलण्यापासून नकाच आम्हा अडवू.

चोरी जाता सनई झाले, भवताल बेसूर, आमचा आम्हा आता मिळू दे चांदीलिंपण सूर..