भविष्यात येऊ घातलेल्या ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’सारख्या शोधांनी कामगारच नव्हे तर पांढरपेशे व्यावसायिकदेखील ‘अतिरिक्त’ ठरतील, असे स्टीफन हॉकिंग यांचे म्हणणे होते.. ‘ बुडती हे जन, पाहवे ना डोळा ’ असे सांगणाऱ्या तुकारामाच्या करुणेत आणि आपल्या मृत्यूपूर्वी जगाला अंतापासून वाचवू पाहणाऱ्या हॉकिंग यांच्या वैज्ञानिक आवाहनात काहीच फरक नाही. प्रश्न हा आहे की आपण त्यांचे म्हणणे कितपत गांभीर्याने घेणार आहोत?

स्टीफन हॉकिंग या प्रज्ञावंत विश्वरचनाशास्त्रज्ञाचे नुकतेच निधन झाले. त्याला झालेला एएलएस हा दुर्धर आजार आणि आपल्या विलक्षण मनोबलाच्या साह्य़ाने त्याने त्याच्याशी दिलेली अर्धशतकी झुंज हा मानवी जीवनाचा गौरव वाढविणारा अध्याय आहे. मानवाला त्याच्या जन्मापासून पडलेल्या प्रश्नांचा –  ‘या सृष्टीची निर्मिती कशी झाली, ज्ञात विश्वाच्या पलीकडे आणखी विश्वे आहेत का, या विश्वाचे स्वरूप आणि रचना कशी आहे आणि ते अनंत काळापर्यंत टिकेल की त्याचाही अंत होईल..’  वेध घेऊन त्यांची उत्तरे शोधण्याचा यशस्वी प्रयत्न त्याने केला.  मराठीत (‘लोकसत्ता’सह अन्य काही) याविषयी बराच महत्त्वाचा मजकूर प्रकाशित झाला आहे. या सदराचा केंद्रिबदू ‘विज्ञान आणि समाज यांचे परस्परसंबंध’ हा आहे. म्हणून आपण आज स्टीफन हॉकिंग ‘यांचे केवळ या विषयावरील चिंतन समजून घेणार आहोत. कारण ज्या प्रश्नाची चर्चा’ या स्तंभातून घडते आहे, ते नीट समजून घेण्यासाठी हॉकिंग यांच्या मतांचा आपल्याला खूप उपयोग होणार आहे.

वैज्ञानिक आणि हस्तिदंती मनोरा

आपल्या ७५व्या वाढदिवशी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत हॉकिंग आपण एका अतिशय विशेषाधिकारप्राप्त समूहाचे घटक असल्याचे मोकळेपणाने मान्य करतात. वैज्ञानिकांचे जग, त्यातही केम्ब्रिजसारख्या शेकडो वर्षांची परंपरा असणाऱ्या मान्यवर विद्यापीठात खगोल भौतिकीसारख्या विषयात संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांची दुनिया ही आगळीवेगळी असते. आपल्याकडे ‘अभिजन’ हा शब्द काहीशा आकसाने वापरला जातो. पण जगभरात निष्ठेने ज्ञानोपासना (किंवा कलानिर्मिती) करणाऱ्यांना काही विशेष सुविधा, काम करण्याची मोकळीक व प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य या गोष्टी आवश्यक असतात. या गोष्टी ज्यांना मिळतात, असे अभिजन आपण आहोत हे मान्य करण्यात हॉकिंगना संकोच वाटत नाही हे ध्यानात घेण्यासारखे आहे. त्याचबरोबर ‘आम्हाला हे मिळायलाच हवे, त्यात काय मोठे?’ असा त्यांचा आविर्भाव नाही. ब्रिटनमध्ये ब्रेग्झिट व अमेरिकेत ट्रम्प यांचा विजय यांविषयी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणतात की सर्वसामान्य नागरिकांनी आमच्यासारख्या अभिजन, विशेषज्ञ अशा लोकांविरुद्ध दिलेला हा कौल आहे. माझ्यासारख्या हस्तिदंती मनोऱ्यात राहणाऱ्या व्यक्तीने तो समजून घ्यायला हवा. ब्रिटनने जागतिकीकरणाच्या विरोधात दिलेला कौल, हा विज्ञानाच्या विकासाच्या विरोधात आहे, त्यामुळे विज्ञानाचे, पर्यायाने समाजाचे नुकसान होईल, असे माझ्यासारखे शास्त्रज्ञ वारंवार सांगत होते. तसेच ‘ट्रम्प यांची निवड हा सुज्ञ जणांचा पराभव ठरेल’ असे सांगूनही अमेरिकेतल्या जनतेने त्यांना निवडून दिले. कारण आतापर्यंत ज्यांचा आवाज दडपला गेला होता, अशा समाजघटकांनी आजच्या वास्तवाला दिलेली ही प्रतिक्रिया आहे हे विश्लेषण हॉकिंग मान्य करतात. पण त्यामुळे आपल्यासारख्या अभिजनांनी जर सर्वसामान्य मतदारांना अज्ञ ठरवून त्यांची उपेक्षा केली तर ती गंभीर चूक ठरेल असा इशाराही ते पुढे देतात आणि सामान्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर आपले मत मांडतात.

आजच्या जगासमोरील प्रश्न

‘जागतिकीकरण व तंत्रज्ञानाचा सुसाट वेग’ या दोन घटनांमुळे आजच्या जगासमोर अनेक प्रश्न उभे केले आहेत, असे नोंदवून हॉकिंग म्हणतात की, नव्या तंत्रज्ञानामुळे आज उत्पादनासाठी मानवी श्रमाची गरज अतिशय कमी झाली आहे. भविष्यात येऊ घातलेल्या ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’सारख्या शोधांनी तर ही गरज अतिशय कमी होईल. कामगारच नव्हे तर पांढरपेशे व्यावसायिकदेखील ‘अतिरिक्त’ ठरतील. त्यामुळे बेरोजगारीची समस्या अधिकच तीव्र होणार आहे. मूठभर अतिविशेषज्ञ व वित्त व्यावसायिक गडगंज पसा कमावतील व बाकीच्या व्यक्तींचा जीवनस्तर मात्र घसरत जाईल,यातून आर्थिक विषमता वाढेल. द. आफ्रिकेत पेयजलापेक्षा मोबाइल फोन अधिक सहजतेने उपलब्ध आहेत, असे नमूद करून ‘समाजमाध्यमे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे’ यांमुळे आता हे वास्तव सर्वासमोर येईल असे ते आपल्याला सांगतात. बेरोजगारी टाळण्यासाठी खेडय़ांतून शहरांकडे, त्यांतून महानगरांकडे आणि अखेरीस परदेशात स्थलांतर होणे अटळ आहे. त्यातून गावांचे भकासपण, शहरांची बकाली आणि सांस्कृतिक अस्मितांची टक्कर होणेही अपरिहार्य आहे.

आजच्या जगासमोरील दुसरे महत्त्वाचे आव्हान पर्यावरणाचा ऱ्हास हे आहे. मानवाच्या आत्यंतिक हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. त्यातून तापमान बदल, नापिकी, समुद्राच्या पाण्याचे आम्लीकरण होऊन त्यातील जीवसृष्टीला धोका निर्माण होणे, लोकसंख्येचा विस्फोट, अनेक प्रजाती अस्तंगत होणे, आम्लवर्षां अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, असे हॉकिंग आपल्याला बजावून सांगतात. विज्ञानामुळे आपण आज या समस्यांचा वेध घेऊ शकतो आणि त्यावर उपायही शोधू शकतो. पण ट्रम्पसारखे राजकारणी जेव्हा क्षुद्र स्वार्थाच्या रक्षणासाठी तापमानवाढीचे वैज्ञानिक निष्कर्षच केराच्या टोपलीत टाकतात, तेव्हा त्यांच्याविरुद्ध नि:संदिग्ध भूमिका घेण्यास हॉकिंग कचरत नाहीत. पॅरिस करारातून अमेरिकेने माघार घेतल्यास तापमानवाढीचे संकट अधिकच गडद होईल. आपल्याला त्यामुळे परतीची वाट सापडणार नाही. ही प्रक्रिया अशीच सुरू राहिली तर पृथ्वी हा शुक्रासारखा उष्ण ग्रह होऊन येथील तापमान २५० अंशावर जाईल, सल्फ्युरिक आम्लाचा पाऊस पडेल आणि येथील जीवसृष्टी कायमची नष्ट होईल असा इशारा ते देतात.

आपण मानवी इतिहासाच्या सर्वात धोकादायक टप्प्यावर उभे आहोत. हा ग्रह नष्ट करण्याचे तंत्रज्ञान आपल्याजवळ आहे, पण तो धोका टाळण्याचे तंत्रज्ञान किंवा हा ग्रह सोडून सर्वाना परग्रहावर नेऊन वसविण्याचे तंत्रज्ञान आज आपल्याकडे नाही. आपल्याजवळ आता एकच उपाय आहे – ‘सर्वानी मिळून’ या संकटावर मात करणे. त्यासाठी आपल्याला बंधुभावाने एकत्र यावे लागेल, बेरोजगारी आणि गरिबीच्या झळा सोसणाऱ्या सर्वाना मदत करावी लागेल. निसर्गाचे संतुलन टिकवावे लागेल आणि त्यासाठी वैज्ञानिकांच्या सल्ल्याची दखल घ्यावी लागेल, असे ते ‘राजकारणी आणि सर्वसामान्य’ यांना कळवळून सांगतात.

‘बुडती हे जन, पाहवे ना डोळा’ असे सांगणाऱ्या तुकारामाच्या करुणेत आणि आपल्या मृत्यूपूर्वी जगाला अंतापासून वाचवू पाहणाऱ्या हॉकिंग यांच्या वैज्ञानिक आवाहनात काहीच फरक नाही. प्रश्न हा आहे की आपण त्यांचे म्हणणे कितपत गांभीर्याने घेणार आहोत?

भारतीय संदर्भात, विशेषत: ‘या लेखमालेच्या संदर्भात’ या विवेचनातून आणखी काही प्रश्न उभे राहतात –

सत्ताधारी वर्गाने किंवा राजकीय नेत्यांनी वैज्ञानिक पुरावा अमान्य करून कृतक – विज्ञानाचा आग्रह धरला किंवा आम्हाला तुमचे विज्ञान मान्य नाही, अशी भूमिका घेतली तर आपण काय करावे?

आज जगभरात ‘विकास’ हा परवलीचा शब्द बनला आहे. आफ्रिकेतील जंगलापासून कायमच्या दुष्काळग्रस्त मराठवाडय़ापर्यंत सर्वाना विकास हवा आहे. विकास म्हणजे चकचकीत गाडय़ा, आठपदरी रस्ते आणि ओसंडून वाहणारे सुपरमॉल. असा विकास सर्वाना उपलब्ध होऊ शकेल का, त्याची पर्यावरणीय किंमत काय असेल, तिचा भार पृथ्वीला पेलणार आहे का, असे प्रश्न विचारल्यास ‘आधी आम्हाला विकासाची फळे चाखू द्या, पर्यावरणाचा विचार करण्याची श्रीमंती  गरीब देशांना परवडणार नाही. जरा चीनकडे बघा,’ असे सांगितले जाते. पर्यावरण हा प्रश्न खरोखर गंभीर आहे का? मुळात पर्यावरणशास्त्र हे विज्ञान आहे की मूठभर कार्यकर्त्यांनी उभे केलेले खूळ आहे?

तापमानवाढ म्हणजे काय? अवकाळी पाऊस, मध्येच येणाऱ्या थंडीच्या लाटा, मान्सूनचा लहरीपणा यांच्याशी त्याचा काही संबंध आहे का?

या आणि यापूर्वीच्या लेखातून समोर आलेल्या प्रश्नांची चर्चा पुढच्या काही लेखांतून करू. दरम्यान, प्रश्न विचारणे थांबवू नका. ती आपल्या मनाच्या जिवंतपणाची खूण आहे.

लेखक समाज-विज्ञान यांच्या आंतर संबंधांचे अभ्यासक व कार्यकर्ते आहेत. ई-मेल :

रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ  ravindrarp@gmail.com