फेसबुकवर स्वत:चे खाते नाही, त्यामुळे त्यावर रोज काय केले किंवा केले नाही, हे सांगण्याची गरज नाही. ट्विटर हँडलही नाही, त्यामुळे आपण काय करतो आहोत, हे जगाला सांगायची सोय नाही; मोबाइल, संगणक यापासून तर बऱ्यापैकी अंतर राखून. तरीही जगात संस्कृत भाषा, महाभारत किंवा अवेस्ता हा पारशी धर्मग्रंथ हे विषय कोणाच्याही नजरेसमोर आले, तर एक नाव हटकून आठवते, ते म्हणजे डॉ. म. अ. मेहेंदळे. प्रकांडपंडित या शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा असेलच, तर वयाची शंभरी पार केलेल्या मेहेंदळे यांचे दर्शन घ्यायलाच हवे. गप्पा मारायला लागलात, तर तुम्हाला लाजवेल असा उत्साह पाहायला मिळेल.

पुण्याच्या डेक्कन कॉलेज आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत गेली अनेक दशके ते संशोधनाचे काम अव्याहतपणे करीत राहिले आहेत आणि या कामाचा कोणताही बडिवार न माजवता, ते नम्रपणे आपल्या अभ्यासात व्यग्र आहेत. त्यामुळे साहित्य अकादमीने जाहीर केलेला भाषा सन्मान पुरस्कार ही त्यांच्यासाठी फार मोठी आणि नावीन्याची गोष्ट असण्याचे कारण नाही.

स्थितप्रज्ञतेने आयुष्यभर कार्यरत राहणे, याचा डॉ. मेहेंदळे हे एक वस्तुपाठ आहेत. मुंबईच्या एशियाटिक सोसायटीने त्यांना नुकतेच सन्माननीय सदस्यत्व बहाल केले. असे करून संस्थेचाच सन्मान वाढला, यात शंका नाही. संस्कृत, प्राकृत, महाभारत, अवेस्ता अशा विषयांवर त्यांनी केलेल्या एकूण संशोधनकार्याची माहिती हाच एक ग्रंथाचा ऐवज आहे. ‘कल्चरल इंडेक्स ऑफ महाभारत’ आणि ‘डिक्शनरी ऑफ संस्कृत ऑन हिस्टॉरिकल प्रिन्सिपल्स’ एवढे दोन ग्रंथही जगविख्यात होण्यास पुरेसे ठरावेत, असे हे प्रचंड काम डॉ. मेहेंदळे यांनी करून ठेवले आहे. मराठी, इंग्रजी आणि संस्कृत अशा तिन्ही भाषांतील ग्रंथलेखन, संशोधन निबंध करणाऱ्या मेहेंदळे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धिपराङ्मुख राहण्यातच अधिक आनंद वाटला. १९४३ साली डेक्कन कॉलेजमधून त्यांनी पीएच.डी. ही पदवी संपादन केली आणि काहीच वर्षांत त्यांचा प्रबंध त्याच कॉलेजने प्रसिद्ध केला. हे सारे वयाच्या तिशीतच संपादन केलेले यश त्यांच्यासाठी आजपर्यंत त्याच दर्जाने काम करण्यासाठी निश्चितच उपयोगी पडले. डेक्कन कॉलेजमधून निवृत्त झाल्यानंतर डॉ. रा. ना. दांडेकर यांच्या आग्रहावरून भांडारकर संस्थेत ते रुजू झाले आणि त्यांच्या हातून महाभारतावरील संशोधनाचे एक अफाट आणि अचाट म्हणता येईल, असे काम पूर्ण झाले. कोणताही मोबदला न घेता  त्यांनी केलेले हे काम जगातील सगळ्याच पंडितांना आजही सतत आपल्या बौद्धिक उंचीची जाणीव करून देत असते. भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या रामायण आणि महाभारत या दोन ग्रंथांबद्दल डॉ. दांडेकर यांना विशेष जिव्हाळा. महाभारताचे काम करता करता, रामायणाचा अभ्यास राहून गेल्याची त्यांची खंत आजच्या संशोधकांना कदाचित समजणारही नाही. परंतु ‘मराठीचा भाषिक अभ्यास’, ‘वरुणविषयक विचार’, ‘प्राचीन भारत – समाज आणि संस्कृती’ ही मराठी पुस्तके किंवा ‘रिफ्लेक्शन्स ऑफ संस्कृत ऑन हिस्टॉरिकल प्रिन्सिपल्स’, ‘हिस्टॉरिकल ग्रामर ऑफ इन्स्क्रिप्शनल प्राकृत’, ‘वेदा मॅन्युस्क्रिप्ट्स’ ही इंग्रजी पुस्तके चाळली तरी डॉ. मेहेंदळे यांच्या संशोधनाचा भला मोठा आवाका सहज ध्यानी येतो. आज शंभरीतही ते कृतार्थ आहेत, याचे कारणच स्थितप्रज्ञतेने सारे आयुष्य केवळ संशोधनात व्यतीत केले, हे आहे.