आरोग्य क्षेत्रातला सेवाभाव हरवत चालला आहे, खासगी महाविद्यालयांत डोनेशन भरून वैद्यकीय शाखेची पदवी घेतल्याने त्याच्या वसुलीसाठी रुग्णांची  प्रचंड पिळवणूक चालली असल्याची ओरड आपल्याकडे होतच असते. नोटाबंदीच्या काळात मुंबईतील एका महिला डॉक्टरने पालकांनी जुन्या नोटा आणल्या म्हणून एका लहानग्यावर उपचार करण्यासही नकार दिला होता. संवेदनाहीन बनत चाललेल्या या क्षेत्रात डॉ. अरुण बाळ, डॉ. हिंमतराव बावस्कर यांच्यासारखे सामाजिक बांधिलकी जपणारे डॉक्टर वैद्यकीय क्षेत्रातील कट प्रॅक्टिस बंद व्हावी, यासाठी लढताना दिसतात तेव्हा सर्व काही संपलेले नाही, हे जाणवते.  एमबीबीएस पदवी मिळवलेल्या मध्य प्रदेशातील पहिल्या महिला डॉक्टर भक्ती यादव याही अशाच सामाजिक भान असलेल्या वैद्यक व्यावसायिक म्हणून ओळखल्या जात. आपल्या ६४ वर्षांच्या वैद्यक व्यवसायात सुरुवातीला नाममात्र दरात आणि गेली २० वर्षे तर रुग्णांवर अगदी मोफत उपचार करून देशात आपली स्वतंत्र ओळख त्यांनी निर्माण केली.

डॉ. भक्ती यांचा जन्म ३ एप्रिल १९२६ चा. उज्जन जिल्ह्य़ातील महिदपूर हे त्यांचे मूळ गाव. लहानपणापासूनच डॉक्टर बनण्याचे त्यांचे ध्येय होते. पण तो काळ आतासारखा नव्हता. मुलीला शिक्षण देण्यापेक्षा लवकरात लवकर तिचे हात पिवळे केले जात. पण भक्ती यांनी घरातील मंडळींशी संघर्ष केला. १९४८ मध्ये त्यांना गुणवत्तेवर इंदूर येथील महात्मा गांधी मेमोरियल मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. त्या काळी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. १९४८ ते ५२ या चार वर्षांच्या काळात त्यांचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाले. पुढे त्या एमएसही झाल्या.

24 hours water supply stop to Kalyan-Dombivli Taloja and Ulhasnagar
कल्याण-डोंबिवली, तळोजा, उल्हासनगरचा पाणी पुरवठा चोवीस तास बंद
Investment Opportunities in the Capital Goods Sector Top Companies
गुंतवणूक संधीचे क्षेत्र आणि न दिसणारे व्यवसाय: भांडवली वस्तू
Loksatta kutuhal Scope of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीची व्याप्ती
fund Analysis Nippon India Growth Fund Fund assets
Money Mantra: फंड विश्लेषण: निपॉन इंडिया ग्रोथ फंड

१९५७ मध्ये एमबीबीएसला त्यांच्याच वर्गात शिकणारे डॉ. चंद्रसिंग यादव यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. डॉ. यादव यांना सरकारी रुग्णालयात नोकरीसाठी वारंवार बोलवले जात होते. पण त्यांनी आयुष्यभर कामगार विमा रुग्णालयात नोकरी केली. त्यांचाच आदर्श वारसा डॉ. भक्ती यांनी पुढे चालवला. इंदूरच्या एका मिल व्यावसायिकाने तेव्हा प्रसूतिगृह सुरू केले. तेथे डॉ. भक्ती या स्त्रीरोग व प्रसूतितज्ज्ञ म्हणून रुजू झाल्या. त्या काळी रुग्णालयात आजच्यासारखी अत्याधुनिक साधने सोडाच, पण वीज, पंखा यांसारख्या आवश्यक सोयीसुविधाही सहज उपलब्ध होत नव्हत्या. वीज नसताना मेणबत्ती वा कंदिलाच्या उजेडातही डॉ. भक्ती यांनी अनेकदा महिलांचे बाळंतपण केले. १९७८ मध्ये हे प्रसूतिगृह बंद करण्यात आले. मग त्यांनी आपल्या घरातच प्रसूतिगृह सुरू केले. मध्यमवर्गीयांकडून अत्यंत माफक शुल्क तर गोरगरिबांवर तेथे मोफत उपचार होत असल्याने बाहेरगावाहूनही महिला रुग्ण त्यांच्याकडे येत. ‘डॉक्टरदादी’ याच नावाने त्या ओळखल्या जात.

चेतन व रमण ही त्यांची दोन्ही मुलेही डॉक्टर झाली. डॉ. भक्ती यांनी सुरू केलेल्या वात्सल्य नर्सिग होमची जबाबदारी गेल्या काही वर्षांपासून हे दोघे सांभाळत असले तरी जुने रुग्ण दादींनाच दाखवायचे आहे, असा हट्ट धरीत. आपल्या ६४ वर्षांच्या वैद्यक व्यवसायात लाखाहून अधिक महिलांची प्रसूती डॉ. भक्ती यांनी केली. वैद्यक क्षेत्रातील निरलस सेवेबद्दल गेल्याच वर्षी त्यांना ‘पद्मश्री’ देऊन गौरवण्यात आले. अलीकडच्या काळात वैद्यक क्षेत्रात चालू असलेल्या अनागोंदीबद्दल त्या कमालीच्या व्यथित होत. फॅमिली डॉक्टर ही संकल्पना मोडीत निघाल्याची त्यांना खंत होती. ९१ वर्षांचे कृतार्थ आयुष्य जगल्यानंतर परवा त्यांनी या जगाचा निरोप घेतला आणि इंदूरमधील एक सेवाभावी पर्व संपले..